अझरबैजान अजून ३० वर्षे वाट पाहणार नाही – तुर्कीचा इशारा

अझरबैजान अजून ३० वर्षे वाट पाहणार नाही – तुर्कीचा इशारा

मॉस्को/अंकारा/येरेवान – ‘तुर्कीने अझरबैजानला दिलेले समर्थन अतिक्रमण झालेला भूभाग परत मिळविण्यासाठी आहे. आता यापुढे अझरबैजान नागोर्नो-कॅराबखमधील संघर्षावर तोडगा निघावा म्हणून अजून ३० वर्षे वाट पाहणार नाही’, असा इशारा तुर्कीने दिला आहे. त्याचवेळी आर्मेनियाने अझरबैजानच्या भूमीतून आपल्या फौजा तात्काळ मागे घ्याव्यात, अशी मागणीही तुर्कीकडून करण्यात आली आहे. आर्मेनिया-अझरबैजान मुद्यावर तुर्की आक्रमक पवित्रा स्वीकारत असतानाच, दोन देशांमधील संघर्षबंदीसाठी सुरू असणाऱ्या वाटाघाटीं मध्ये तुर्कीचा समावेश करण्यास रशियाने नकार दिला आहे.

वाट पाहणार नाही

शुक्रवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या पुढाकाराने, राजधानी मॉस्कोमध्ये आर्मेनिया-अझरबैजानमध्ये संघर्षबंदी घडविण्यासाठी चर्चा आयोजित करण्यात आली होती. चर्चेत मान्य झालेली संघर्षबंदी लागू होण्यापूर्वीच दोन्ही देशांमध्ये पुन्हा संघर्षाचा भडका उडाला आहे. शनिवारपासून दोन्ही देशांनी परस्परांच्या भूभागावर जोरदार हल्ले चढविले असून प्रतिस्पर्ध्यांची मोठी हानी केल्याचेही दावे केले आहेत. अझरबैजानकडून नागोर्नो-कॅराबखची राजधानी असणाऱ्या स्टेपनकेर्ट तसेच त्यापासून जवळ असणाऱ्या हादरुतमध्ये ड्रोन्स तसेच क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने हल्ले चढविण्यात आले. आर्मेनियन लष्कराचा ‘टी-७२’ रणगाडा तसेच ‘ग्रॅड रॉकेट लॉन्चर सिस्टिम्स’ उद्ध्वस्त केल्याचा दावाही अझरबैजानच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. त्याचवेळी आर्मेनियाने अझरबैजानच्या शहरांवर हल्ले करणे सुरू ठेवले असून गांजापाठोपाठ बर्दा शहराला लक्ष्य करण्यात आले आहे.

वाट पाहणार नाही

हा संघर्ष सुरू असतानाच तुर्कीने अझरबैजानमध्ये सिरियन दहशतवादी पाठविल्याचे उघड करणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये तुर्कीने प्रशिक्षण दिलेले सिरियन दहशतवादी ‘नागोर्नो-कॅराबख’ प्रांतात सक्रिय असल्याचे दाखविण्यात आले आहे. हे दहशतवादी आर्मेनियाचे नाव असलेल्या बोर्डसमोर उभे राहून धमकावत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या पार्श्वभूमीवर, ‘नागोर्नो-कॅराबख’मधील सदस्यांनी, रशिया व इराणसह आर्मेनियाने ‘अँटी टेरर युनिट’ उभारावे, अशी मागणी केली आहे. नागोर्नो-कॅराबखमध्ये घुसखोरी केलेल्या दहशतवाद्यांसाह त्यांचे तळ उद्ध्वस्त करावेत, असेही या मागणीत म्हटले आहे. तुर्कीने या भागात जवळपास १२०० हून अधिक दहशतवादी पाठविल्याचे दावे समोर आले असून, रशिया व फ्रान्ससह आंतरराष्ट्रीय समुदायाने त्यावर जबरदस्त टीका केली आहे. मात्र तुर्कीने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

वाट पाहणार नाही

दरम्यान, आर्मेनिया-अझरबैजान युद्धात तुर्की अधिकाधिक आक्रमक पवित्रा घेत असल्याचे समोर येत आहे. गेल्या महिन्यात दोन देशांमध्ये भडकलेल्या युद्धापूर्वीच तुर्कीने अझरबैजानला मोठ्या प्रमाणात लष्करी सहाय्य पुरविले होते. युद्धादरम्यान लष्करी सहाय्याबरोबरच राजनैतिक समर्थनही देण्यात येत असल्याचे दिसत आहे. संघर्षबंदीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये आपलाही समावेश असावा, अशी मागणी तुर्कीकडून करण्यात आली आहे. तुर्कीची ही मागणी अझरबैजानच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियाबरोबर झालेल्या चर्चेत व्यक्त केल्याचे समोर आले. मात्र रशियाकडून ही मागणी स्पष्ट शब्दात फेटाळण्यात आली आहे. रशियाच्या पुढाकाराने सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये इतर कोणत्याही देशाचा समावेश करण्याचा इरादा नाही, असे रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केले.

रशिया पूर्वीपासून आर्मेनियाच्या बाजूने उभा राहिला असून, यावेळीही रशियाची भूमिका कायम असल्याचे परराष्ट्रमंत्र्यांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे. त्याचवेळी तुर्की मात्र अधिक आक्रमक होत असल्याचे रशिया व तुर्कीच्या संरक्षणमंत्र्यांमध्ये झालेल्या चर्चेतून समोर आले. तुर्कीचे संरक्षणमंत्री हुलुसी अकार यांनी, कोणत्याही परिस्थितीत आर्मेनियाने ‘नागोर्नो-कॅराबख’मधून लष्कर मागे घ्यायलाच हवे, अशी आग्रही मागणी केल्याचे सांगण्यात येते. त्याचवेळी हा भाग आर्मेनियाच्या ताब्यातून मुक्त होईपर्यंत तुर्की अझरबैजानला सहाय्य कायम ठेवेल, असा इशाराही दिल्याचे तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. तुर्कीच्या या हेकेखोर भूमिकेमुळे नजिकच्या काळात आर्मेनिया-अझरबैजान युद्ध मिटण्याची शक्यता धूसर झाल्याचे दिसत आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info