पॅरिस – ‘युरोपमध्ये तुर्कीच्या इस्लामचा प्रभाव रोखायचा असेल तर नागोर्नो-कॅराबखमध्ये अझरबैजानच्या आक्रमणाला विरोध करणे आवश्यक आहे. त्यासाठीच नागोर्नो-कॅराबखला मान्यता देण्याची गरज असून, यासंदर्भातील विधेयक फ्रान्सच्या संसदेत मांडणार आहे. या माध्यमातून तुर्की व अझरबैजानच्या कारवायांचा निषेधही करण्यात येईल’, अशा शब्दात फ्रेंच सिनेटर व्हॅलरी बोयर यांनी आर्मेनिया-अझरबैजान युद्धात फ्रान्स आक्रमक भूमिका घेईल, असे संकेत दिले आहेत. आर्मेनिया व अझरबैजानमध्ये युद्धाचा भडका उडाल्यानंतर तुर्कीविरोधात टीकास्त्र सोडणाऱ्या फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी, आपला देश आर्मेनियासंदर्भात योग्य भूमिका घेईल, असे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर फ्रेंच संसदेत येणारे विधेयक लक्ष वेधून घेणारे ठरते.
गेल्या तीन आठवडयांहून अधिक काळ मध्य आशियातील आर्मेनिया व अझरबैजानमध्ये जबरदस्त युद्ध सुरू आहे. या युद्धात हजारो जणांचे बळी गेले असून संघर्ष थांबण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. आंतरराष्ट्रीय समुदायाने संघर्षबंदीसाठी केलेले दोन प्रयत्न अपयशी ठरले आहेत. दोन्ही देशांकडून परस्परांवर युद्धाला तोंड फोडल्याचे आरोप होत असून कोणीही माघार घेण्यास तयार नाही. उलट गेल्या काही दिवसात युद्धाची तीव्रता अधिकच वाढली असून लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे, ड्रोन्स, तोफा, रणगाडे यांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे.
आर्मेनिया-अझरबैजान युद्धात तुर्कीने अझरबैजानला पूर्ण समर्थन देताना जागतिक पातळीवरही आक्रमक भूमिका घेतली आहे. आर्मेनियाने जबरदस्तीने ‘नागोर्नो-कॅराबख’वर ताबा मिळविला असून, हा भाग स्वतंत्र करेपर्यंत माघार घेणार नसल्याची धमकी दिली आहे. अझरबैजानला मोठ्या प्रमाणात लष्करी सहाय्य पुरविणाऱ्या तुर्कीने, आपल्या ‘स्पेशल फोर्सेस’च्या तुकड्यांसह सिरियातील शेकडो दहशतवादीही युद्धात उतरविले आहेत. रशिया व अमेरिकेसह युरोपिय देशांनी तुर्कीच्या या कारवायांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. आर्मेनियानेही गेल्या महिन्यात भडकलेल्या युद्धामागे तुर्कीचाच हात असल्याचा आरोप केला आहे. फ्रान्सनेही आर्मेनियाची बाजू उचलून धरीत तुर्कीला लक्ष्य केले असून संसदेत दाखल होणारे विधेयक त्याचाच भाग दिसत आहे.
दरम्यान, तुर्कीकडून अझरबैजानमध्ये कायमस्वरूपी संरक्षणतळ उभारण्याच्या हालचाली सुरू असल्याचे दावे प्रसारमाध्यमांनी केले आहेत. काही दिवसांपूर्वी तुर्कीची लढाऊ विमाने अझरबैजानमधील हवाईतळावर तैनात असल्याचे उघड झाले होते. गेल्या दोन वर्षात तुर्की व अझरबैजानमध्ये अनेक संरक्षण सहकार्य करारही झाल्याचे समोर आले आहे. अझरबैजानच्या राष्ट्राध्यक्षांनी तुर्कीच्या तळा बाबतचे दावे नाकारले असले तरी दोन देशांमध्ये व्यापक संरक्षण सहकार्य असल्याची कबुली दिली आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |