अथेन्स/अंकारा – तुर्कीचे जहाज ग्रीक बेटाच्या किनारपट्टीपासून अवघ्या १४ किलोमीटर्सवर दाखल झाले असतानाच, ग्रीसच्या नौदलाने तातडीने ‘अलर्ट’ जारी केला आहे. एजिअन सीमध्ये असलेल्या ग्रीक बेटांभोवती ‘संरक्षक भिंत’ उभी करण्यात आल्याची माहिती ग्रीसच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. ग्रीसने तब्बल ६० युद्धनौका व जहाजे तुर्कीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात केल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात ग्रीस व तुर्कीमध्ये संघर्षाची ठिणगी उडण्याचे संकेत मिळत आहेत.
ऑगस्ट महिन्यात, तुर्कीने ‘नॅव्हटेक्स अलर्ट’ जारी करून आपले ‘ओरुक रेईस’ हे ‘रिसर्च शिप’ दोन जहाजांसह भूमध्य सागरी क्षेत्रात संशोधनासाठी धाडले होते. भूमध्य सागरातील शांतता व स्थैर्याला धोका पोहोचविणाऱ्या बेकायदेशीर कारवाया तुर्कीने ताबडतोब थांबवाव्यात, असा इशारा ग्रीसने दिला होता. अमेरिकेसह युरोपीय महासंघ व नाटोनेही तुर्कीच्या हालचालींवर नाराजी व्यक्त केली होती. अमेरिका व युरोपने ग्रीसचे समर्थन करीत तुर्कीवर दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे गेल्या महिन्यात तुर्कीने आपले जहाज भूमध्य सागरी क्षेत्रातून माघारी घेऊन ग्रीसबरोबर चर्चेस सुरुवात केली होती.
मात्र गेल्या आठवड्यात तुर्कीने पुन्हा आपली जहाजे पाठवून चिथावणी दिल्याचे दिसत आहे. तुर्की नौदलाने ‘नॅव्हटेक्स अलर्ट’ जारी करून ‘ओरुक रेईस’ ही ‘रिसर्च शिप’, ‘अतामान’ व ‘सेंगीज हान’ या दोन जहाजांसह ‘कॅस्टेलोरिझो’ या ग्रीक बेटानजिक रवाना केली होती. ही तिन्ही जहाजे २२ ऑक्टोबरपर्यंत या क्षेत्रात सक्रिय असतील, असेही सांगण्यात आले होते. आता तुर्कीने ही मोहीम २७ ऑक्टोबरपर्यंत वाढविल्याचे जाहीर केले आहे.
तुर्कीच्या या कारवायांमुळे ग्रीसने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. बुधवारीं ग्रीसने सायप्रस व इजिप्तबरोबर बैठक घेऊन तुर्कीवर जोरदार टीका केली. तुर्कीने आपल्या कारवाया थांबवून सागरी हद्दीसंदर्भात दिलेला वाटाघाटीचा प्रस्ताव स्वीकारावा, असे तिन्ही देशांच्या संयुक्त निवेदनात बजावण्यात आले. त्यापाठोपाठ ग्रीसच्या नौदलाने ‘कोड ऑरेंज अलर्ट’ जारी करून आपल्या युद्धनौकांना तुर्कीनजिक असलेल्या क्षेत्रात रवाना केले आहे. ‘कॅस्टेलॉरिझो’ व जवळच्या ग्रीक बेटांभोवती कडे करण्याचे आदेश ग्रीक युद्धनौकांना देण्यात आले आहेत. या बेटांनजिक तुर्कीकडून होणारी कोणत्याही स्वरूपाची कारवाई रोखण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तुर्कीने आपल्या रिसर्च शिप्सबरोबर युद्धनौका व पाणबुड्याही पाठविल्याचे समोर आल्याने ही दक्षता घेण्यात येत असल्याचे ग्रीक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
तुर्कीच्या विस्तारवादी कारवाया व ग्रीसने आक्रमक तैनातीच्या रुपात दिलेले प्रत्युत्तर, यामुळे भूमध्य सागरातील तणावाचे रूपांतर युद्धात होण्याची शक्यता वाढली आहे. ग्रीस व तुर्की हे दोन्ही नाटो सदस्य देश असल्याने या संभाव्य संघर्षातून अधिकच गुंतागुंत निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |