वॉशिंग्टन – इराणच्या नेत्यांनी दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर ‘युएसएस निमित्झ’ विमानवाहू युद्धनौका आपल्या इतर युद्धनौकांसह पर्शियन आखातातच तैनात असेल, अशी घोषणा अमेरिकेचे हंगामी संरक्षणमंत्री ख्रिस्तोफर मिलर यांनी केली. गेल्या दीड महिन्यात अमेरिकेने या क्षेत्रात अण्वस्त्रसज्ज बॉम्बर विमाने, आण्विक पाणबुडी यांची तैनाती केली आहे. त्या पाठोपाठ विमानवाहू युद्धनौकाही पर्शियन आखातात तैनात करून अमेरिकेने याआधी इराणला दिलेले इशारे प्रत्यक्षात उतरविण्याची तयारी केल्याचे संकेत मिळत आहेत.
अमेरिकेच्या नौदलातील महाकाय विमानवाहू युद्धनौका असलेली ‘युएसएस निमित्झ’ जुलै महिन्यापासून ओमानच्या आखातात तैनात होती. त्यानंतर या युद्धनौकेने हिंदी महासागर क्षेत्रात भारताबरोबरच्या युद्धसरावात सहभाग घेतला होता. तर गेल्याच आठवड्यात सोमालियाच्या दौर्यावर गेलेल्या या विमानवाहू युद्धनौकेला मायदेशी परतण्याची सूचनाही हंगामी संरक्षणमंत्री मिलर यांनी केली होती. त्यामुळे सहा महिन्यानंतर पहिल्यांदाच अमेरिकेची आखाती क्षेत्रातील ‘सेंट्रल कमांड’ विमानवाहू युद्धनौकेशिवाय राहणार होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून इराणकडून अमेरिका तसेच अमेरिकेच्या मित्रदेशांना दिल्या जाणार्या धमक्यांची तीव्रता वाढली आहे. वर्षभरापूर्वी अमेरिकेने ड्रोन हल्ल्यात सुलेमानी यांची केलेली हत्या म्हणजे दहशतवादी हल्लाच होता, असा आरोप इराणने केला आहे. त्याचबरोबर या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असणार्या प्रत्येकाला याचे परिणाम भोगावे लागतील, असे सांगून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प देखील यापासून अलिप्त राहणार नसल्याची धमकी इराणने दिली होती. अमेरिकी जनताच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर सूड उगवतील, असा दावा इराणच्या कुद्स फोर्सेसच्या प्रमुखांनी केला होता.
त्याचबरोबर इराणच्या या सागरी क्षेत्रातील लष्करी हालचाली देखील तीव्र झाल्या आहेत. इराणच्या या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘युएसएस निमित्झ’ला पर्शियन आखातातच तैनात राहण्याचे आदेश दिल्याची माहिती हंगामी संरक्षणमंत्री मिलर यांनी दिली. आखाती क्षेत्राच्या सुरक्षेबाबत अमेरिकेच्या वचनबद्धतेबाबत कुणालाही शंका असू नये, म्हणून ही तैनाती आवश्यक असल्याचे अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले. अमेरिकेच्या या विमानवाहू युद्धनौकेबरोबर अॅम्फिबियस युद्धनौका तसेच दोन विनाशिकांचाही समावेश आहे.
अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत आपले कठोर धोरण सुरू ठेवलेले असताना, भावी राष्ट्राध्यक्ष देखील इराणला ढिलाई देणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. भावी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी राष्ट्रीय सल्लागार म्हणून निवड केलेले जेक सुलिवॅन यांनी अमेरिकी वृत्तवाहिनीशी बोलताना इराणच्या क्षेपणास्त्रनिर्मिती कार्यक्रमावर आक्षेप घेतला. बायडेन यांनी नव्याने अणुकरार झाला तरी इराणची क्षेपणास्त्र निर्मिती रोखण्याबाबत चर्चा करण्याचे आणि या चर्चेत क्षेत्रीय देशांनाही सहभागी करण्याचे सुलिवॅन म्हणाले.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |