दमास्कस/बैरूत – इस्रायलच्या लढाऊ विमानांनी सिरियाच्या पूर्वेकडील देर अल-झोर प्रांतात हल्ले चढवून इथल्या इराणच्या लष्करी तळ व ठिकाणांना लक्ष्य केले. या हल्ल्यात इराणसंलग्न गटाचे किमान ३१ दहशतवादी ठार झाल्याचा दावा केला जातो. इराणच्या अणुकार्यक्रमासाठी लागणार्या काही आवश्यक साहित्याचा पुरवठा या तळांमधील भुयारी मार्गाने केला जात होता, असा दावा अमेरिकी गुप्तचर यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकार्याने केला आहे. त्यामुळे याचे महत्त्व वाढले आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी इस्रायली गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’चे प्रमुख योसी कोहेन यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांची भेट घेतली होती. या भेटीत इस्रायलच्या सदर कारवाईवर चर्चा झालेली होती, असा दावा केला जातो.
इस्रायलच्या लढाऊ विमानांनी बुधवारी पहाटे देर अल-झोर आणि अल-बुकमल या दोन ठिकाणांवर तुफानी हल्ले चढविल्याचे सिरियन वृत्तवाहिनी ‘सना’ने स्पष्ट केले. सिरियातील अस्साद राजवटीशी संलग्न असलेल्या या वृत्तवाहिनीने यावर अधिक माहिती देण्याचे टाळले. पण सिरियातील मानवाधिकार संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, येथील किमान १८ लष्करी तळांवर इस्रायली लढाऊ विमानांनी कारवाई केली. गेल्या दोन आठवड्यात इस्रायलने सिरियात केलेली ही चौथी कारवाई ठरते. तर २०१८ सालानंतर पहिल्यांदाच इस्रायलने एवढ्या मोठ्या प्रमाणात सिरियात हल्ले चढविल्याचा दावा मानवाधिकार संघटना करीत आहेत.
देर अल-झोर आणि अल-बुकमल येथे इराणचे लष्करी तळ व ठिकाणे आहेत. इराकच्या सीमेजवळ असल्यामुळे या ठिकाणाहून सिरियामध्ये शस्त्रास्त्रांची तस्करी केली जाते. याआधीही इस्रायल तसेच अमेरिकेने इराणच्या या तळांवर हल्ले चढविल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण इस्रायलच्या लढाऊ विमानांनी बुधवारी पहाटेच्या कारवाईत इराणच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित ठिकाणाला लक्ष्य केल्याचा दावा केला जातो. या लष्करी तळाच्या गोदामातील पाईपलाईनचा वापर इराणच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित साहित्याच्या पुरवठ्यासाठी केला जात होता, अशी माहिती अमेरिकी गुप्तचर यंत्रणेच्या अधिकार्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली.
याआधी २००७ साली देर अल-झोर येथे सिरिया उभारत असलेल्या अणुप्रकल्पावर इस्रायलने हवाई हल्ले चढविले होते. या हल्ल्यात सदर निर्माणाधीन अणुप्रकल्प नष्ट झाले. त्याचबरोबर १० उत्तर कोरियन शास्त्रज्ञ देखील ठार झाल्याचे बोलले जाते. इस्रायल तसेच सिरियन माध्यमांमध्ये यासंदर्भात बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण दहा वर्षानंतर इस्रायलने या हल्ल्याची कबुली दिली. बुधवारच्या हल्ल्यासाठी अमेरिकी गुप्तचर यंत्रणेने इस्रायलला माहिती पुरविल्याचा दावा केला जातो.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अमेरिकेच्या वॉशिंग्टन शहरातील कॅफे मिलानो येथे आयोजित कार्यक्रमात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ आणि मोसादचे प्रमुख कोहेन यांची भेट झाली. या भेटीत देर अल-झोरमधील हल्ल्याबाबत चर्चा झाल्याचा दावा सदर अधिकार्याने केला. या हल्ल्याच्या काही तास आधी इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी सिरियाच्या सीमेजवळील इस्रायलच्या ताब्यातील गोलान टेकड्यांचा दौरा केला होता.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |