अफगाणिस्तानातील माघारीनंतरही अमेरिकेचे हवाई हल्ले सुरू राहतील – वरिष्ठ अधिकार्‍यांचा इशारा

काबुल – ‘अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या अखेरच्या जवानाने माघार घेतली तरी, अमेरिकेचे या देशातील दहशतवाद्यांवरील हवाई हल्ले सुरू राहतील’, अशी घोषणा अमेरिकेचे अफगाणिस्तानातील कमांडर जनरल ऑस्टिन एस. मिलर यांनी केली. त्याचबरोबर अफगाणिस्तानात गृहयुद्धाचा भडका उडण्याचा इशारा जनरल मिलर यांनी दिला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी 11 सप्टेंबरपर्यंत अफगाणिस्तानातून पूर्ण माघार घेण्याची घोषणा केली होती. पण त्याआधी येत्या रविवारी 4 जुलैपर्यंत ही माघार पूर्ण होईल व माघारीनंतरही अमेरिकेचे जवान अफगाणिस्तानात तैनात असतील, याचे संकेत अमेरिकेच्या लष्करी अधिकार्‍यांनी चार दिवसांपूर्वी दिले होते. पण अमेरिकेचे अफगाणिस्तानातील कमांडर जनरल मिलर यांनी याबाबतचा खुलासा केला.

अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्यमाघार घेतली तरी, तालिबान, अल-कायदा आणि इतर दहशतवादी संघटनांवरील अमेरिकेचे हवाई हल्ले सुरू राहतील, अशी माहिती जनरल मिलर यांनी दिली. अमेरिकेच्या सेंटकॉमचे प्रमुख जनरल केनिथ मॅकेन्झी यांच्या नेतृत्त्वाखाली अफगाणिस्तानच्या बाहेरील हवाईतळांवरुन ही कारवाई केली जाईल, असे जनरल मिलर म्हणाले.

त्याचबरोबर काबुलमधील अमेरिकेच्या दूतावासात 650 अमेरिकी जवान अनिश्चित काळासाठी तैनात असतील. तर काबुलमधील विमानतळाच्या सुरक्षेसाठी तीनशेहून अधिक जवान सप्टेंबर महिन्यापर्यंत तैनात राहणार असल्याचे जनरल मिलर म्हणाले. गेल्या काही आठवड्यांपासून अफगाणिस्तानातील तालिबानच्या वाढत्या हल्ल्यांवर जनरल मिलर यांनी चिंता व्यक्त केली.

‘अफगाणिस्तानातील जिल्ह्यांचा तालिबान मिळवित असलेला ताबा अमेरिका तसेच जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे. कारण अफगाणिस्तानातील हिंसाचार सुरू राहिला तर तालिबानविरोधात शस्त्रसज्ज होणार्‍या अफगाणी टोळ्या आणि तालिबान यांच्यात संघर्ष पेटून, येत्या काळात येथे गृहयुद्ध भडकेल’, असा इशारा जनरल मिलर यांनी दिला.

अफगाणिस्तानात एकूण 403 जिल्हे आहेत. यापैकी 180 हून अधिक जिल्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी अफगाणी लष्कर आणि तालिबानमध्ये घनघोर संघर्ष सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत तालिबानने जवळपास शंभरहून जिल्ह्यांचा ताबा घेतल्याचा दावा केला जातो. गेल्या दोन महिन्यांमध्येच तालिबानने 64 जिल्ह्यांवर नियंत्रण मिळविल्याचा दावा करण्यात आला होता.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info