वॉशिंग्टन – अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीला काही दिवस शिल्लक असताना ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आखातातील आपल्या हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेने उभारलेल्या ‘सेंट्रल कमांड – सेंटकॉम’च्या सुरक्षाकड्यात यापुढे इस्रायलचाही समावेश असेल. अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय ‘पेंटॅगॉन’ने याची माहिती प्रसिद्ध केली. सेंटकॉममधील इस्रायलचा समावेश हा अमेरिकेच्या इराणविरोधी धोरणाचा महत्त्वाचा भाग ठरेल, असा दावा अमेरिकी तसेच आखाती माध्यमे करीत आहेत.
जगभरात तैनात असलेल्या आपल्या संरक्षणदलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकेने दशकांपूर्वी ‘कॉम्बॅट कमांड’ची स्थापना केली होती. पुढे क्षेत्रीय स्तरावर या कॉम्बॅट कमांडची आठ भागात विभागणी करण्यात आली. यामध्ये आफ्रिकी देशांसाठी ‘आफ्रिकॉम’, आखाती देशांसाठी ‘सेंटकॉम’, युरोपिय देशांसाठी ‘युकॉम’, इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी ‘इंडोपॅकॉम’, उत्तर अमेरिकी देशांसाठी ‘नॉर्दन’ तर दक्षिण अमेरिकी देशांसाठी ‘सदर्न’ आणि गेल्या वर्षी अंतराळ क्षेत्रासाठी ‘स्पेस कमांड’ची स्थापना करण्यात आली.
आत्तापर्यंत युरोपिय देशांसाठीच्या ‘युकॉम’मध्ये इस्रायलचा समावेश होता. इस्रायल भौगोलिकदृष्ट्या आखातातील देश असूनही फक्त अरब देशांबरोबर चांगले संबंध नसल्यामुळे इस्रायलचा समावेश सेंटकॉममध्ये केला नव्हता. पण गेल्या काही महिन्यांमध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीने संयुक्त अरब अमिरात (युएई) आणि बाहरिन या आखाती देशांनी ऐतिहासिक ‘अब्राहम करारा’वर स्वाक्षरी करून इस्रायलबरोबर सहकार्य प्रस्थापित केले आहेत. तर याआधी इजिप्त, जॉर्डन या देशांबरोबर इस्रायलचे सहकार्य प्रस्थापित होते.
इस्रायल आणि अरब देशांमध्ये निर्माण झालेल्या या सहकार्याच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पेंटॅगॉनला इस्रायलचा सेंटकॉममध्ये समावेश करण्याची सूचना केली. काही तासांपूर्वी अमेरिकेतील आघाडीच्या दैनिकाने ही बातमी प्रसिद्ध केली. त्यानंतर पेंटॅगॉनने देखील सेंटकॉममधील इस्रायलच्या समावेशाची घोषणा केली. ‘अब्राहम करारामुळे इस्रायल आणि अरब शेजारी देशांमधील कमी झालेला तणाव आखातातील अमेरिकेच्या सामरिक धोरणांसाठी सहाय्यक ठरेल. यामुळे आखाताच्या सुरक्षेला असलेल्या समान धोक्याविरोधात अमेरिकेचे मित्रदेश एकजूट होतील’, असा विश्वास पेंटॅगॉनने व्यक्त केला. पेंटॅगॉनने थेट उल्लेख करण्याचे टाळले असले तरी इराणला उद्देशून ही प्रतिक्रिया दिल्याचे बोलले जाते.
दरम्यान, ट्रम्प प्रशासनाप्रमाणे अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि इस्रायल यांच्यात मैत्रीपूर्ण सहकार्य नसेल, असा दावा जगभरातील विश्लेषक करीत आहेत. या पार्श्वभूमीवर, विद्यमान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या दिवसांमध्ये इस्रायलचा सेंटकॉममध्ये समावेश करून मोठी खेळी खेळल्याचा दावा केला जातो.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |