Breaking News

अमेरिकेत बायडेन यांच्या शपथग्रहणानंतर इस्रायलचे सिरियाच्या ‘हमा’वर हवाई हल्ले

दमास्कस – अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सूत्रे हाती घेऊन काही तास उलटले नाहीत, तोच इस्रायलने सिरियाच्या हमा प्रांतात हवाई हल्ले चढविले. इस्रायलच्या या हल्ल्यात चार नागरिकांचा बळी गेल्याचा आरोप सिरियन लष्कराने केला आहे. अमेरिकेतील सत्ताबदलानंतर इस्रायलने सिरियात चढविलेला हा पहिला हल्ला ठरतो.

सिरियन लष्कर आणि ‘सना’ वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास हमा प्रांतात क्षेपणास्त्रे डागली गेली. लेबेनॉनच्या सीमेवरील त्रिपोली शहरातून हे हल्ले चढविले गेले. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी लेबेनॉनच्या हवाई हद्दीत घुसून क्षेपणास्त्रे डागल्याचा आरोप सिरियन लष्कर व वृत्तवाहिनी करीत आहे. सिरियन लष्कराच्या हवाई सुरक्षा यंत्रणांनी इस्रायलने डागलेली बहुतांश क्षेपणास्त्रे यशस्वीरित्या भेदल्याचा दावाही सिरियन वृत्तवाहिनीने केला. तर काही क्षेपणास्त्रे येथील नागरी भागात कोसळली. यामध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा बळी गेला असून यात दोन मुलांचा समावेश असल्याचे सिरियन लष्कराने म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वीच सिरियाच्या पूर्वेकडील देर अल-झोर भागात इस्रायलने हवाई हल्ले चढविल्याचा आरोप सिरियन लष्कर व सरकारी वृत्तवाहिनीने केला होता. या हल्ल्यात किती वाताहात झाली, याबाबत बोलण्याचे सिरियन लष्कराने टाळले होते. पण सिरियातील मानवाधिकार संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, येथील किमान १८ लष्करी तळांवर चढविलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये इराणच्या कुद्स फोर्सेसचे जवान व इराणसंलग्न दहशतवादी संघटनांच्या ५७ जण ठार झाले होते.

या व्यतिरिक्त इस्रायलच्या लढाऊ विमानांनी इराणच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित ठिकाणाला लक्ष्य केल्याचा दावा करण्यात आला होता. आतापर्यंतची इस्रायलने सिरियातील इराणच्या लष्करी तळांवर केलेली ही सर्वात मोठी कारवाई ठरल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. इराणने या बातम्यांवर प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते. पण गेल्याच आठवड्यात इराणचे जवान व इराणसंलग्न दहशतवादी ‘देर अल-झोर’ येथील आपले लष्करी तळ रिकामे करून अल-बुकमल, मयादिन येथील नागरी वस्त्यांमध्ये लपून बसल्याची माहिती समोर आली होती. इस्रायलच्या हवाई हल्ल्याच्या धास्तीने इराणने ही हालचाल केल्याचा दावा केला जातो.

शुक्रवारी पहाटे सिरियाच्या हमा प्रांतात झालेल्या या हल्ल्याबाबत इस्रायलच्या लष्कराने प्रतिक्रिया दिलेली नाही. पण अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सूत्रे हातात घेतल्यानंतर इस्रायलने सिरियात केलेली ही पहिली कारवाई ठरते. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी इराणबाबत सलोख्याची भूमिका स्वीकारण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिकेच्या अटी मान्य केल्यास इराणसोबत नवा अणुकरार केला जाईल, असे बायडेन यांनी स्पष्ट केले आहे. अमेरिकेच्या या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना बायडेन प्रशासनाने इराणवरील निर्बंध मागे घेण्याची चूक करू नये, असा खरमरीत इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी दिला होता.

दरम्यान, इस्रायलने सिरियातील इराणच्या ठिकाणांवर हवाई हल्ले चढवू नये. सिरिया इस्रायल आणि इराणच्या संघर्षाची युद्धभूमी ठरू नये, अशी घोषणा रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी चार दिवसांपूर्वी केली होती. सिरियातील इराणच्या धोकादायक लष्करी तळांबाबत इस्रायलने रशियाला कळवावे, रशिया त्यावर कारवाई करील, असे आवाहन रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी केले होते.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info