मोगादिशु/कंपाला – युगांडाच्या संरक्षणदलांनी केलेल्या हवाईहल्ल्यांमध्ये ‘अल शबाब’ या दहशतवादी संघटनेच्या सुमारे दोनशे दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याचे वृत्त आहे. सोमालियाच्या ‘लोअर शॅबेल’ प्रांतात ही कारवाई करण्यात आली. ‘अल शबाब’ या दहशतवादी संघटनेविरोधात एका दिवसात राबविण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. अमेरिका सोमालियातून सैन्य माघारी घेत असतानाच झालेली ही कारवाई लक्ष वेधून घेणारी ठरते.
युगांडाच्या संरक्षणदलाचे उपप्रवक्ते लेफ्टनंट कर्नल देओ अकिकी यांनी सोमालियातील कारवाईची माहिती दिली. ‘आमच्या संरक्षणदलांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये अल शबाबचे १८९हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत. अल शबाबच्या तळावर असणारा शस्त्रसाठा व यंत्रणाही उद्ध्वस्त करण्यात आला’, असे लेफ्टनंट कर्नल देओ अकिकी यांनी सांगितले. युगांडाच्या संरक्षणदलाने प्रसिद्ध केलेल्या स्वतंत्र निवेदनात ‘अल-शबाब’ची बैठक चालू असताना हल्ला केल्याचे व अनेक दहशतवादी जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
सोमालियातील ‘लोअर शॅबेल’ प्रांताचे गव्हर्नर अब्दुलकादिर मोहमद नूर सिदि यांनीही कारवाईच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शुक्रवारी रात्री व शनिवारी पहाटे हवाईहल्ल्यांसह लष्करी तुकड्यांकडून कारवाई करण्यात आली. यावेळी युगांडाच्या संरक्षणदलांकडून ‘अटॅक हेलिकॉप्टर्स’चा वापर करण्यात आला. ‘आफ्रिकन युनियन मिशन इन सोमालिया’च्या नेतृत्त्वाखाली ही कारवाई पार पडल्याचे नूर सिदि यांनी सांगितले. जनाले डिस्ट्रिक्ट व जवळच्या भागात ही मोहीम राबविण्यात आली, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या वर्षभरात सोमालियातील ‘अल शबाब’विरोधात झालेली ही दुसरी मोठी कारवाई असून एका दिवसात झालेली सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. यापूर्वी २०२०सालच्या मार्च महिन्यात सोमाली लष्कराने जनालेमध्ये हल्ले चढवून १४०हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले होते. सोमालियात राजधानी मोगादिशुसह ‘लोअर शॅबेल’ भागात ‘अल शबाब’चा प्रभाव असल्याचे मानले जाते. सोमाली लष्कर, आफ्रिकन युनियन व अमेरिकेकडून सातत्याने सुरू असणार्या कारवायांनंतरही हा प्रभाव अद्याप कमी झालेला नाही.
उलट ‘अल शबाब’ सोमालियापाठोपाठ केनिया तसेच युगांडासारख्या देशांमध्ये आपले तळ स्थापन करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे गेल्या काही वर्षात दिसून आले आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये अल शबाबच्या दहशतवाद्यांनी थेट अमेरिकेवर दहशतवादी हल्ल्यांची योजना आखल्याचेही उघड झाले होते. असे कट आखलेल्या दोन दहशतवाद्यांना अमेरिकी यंत्रणांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे.
अल शबाबचा प्रभाव अशा रितीने वाढत असतानाच अमेरिकेने गेल्या वर्षी सोमालियातील आपले सैन्य माघारी घेण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या महिन्यापासून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली असून सोमालियातील जवानांना आफ्रिकेतील इतर तळांवर तैनात करण्यात येत आहे. त्याचवेळी तुर्कीने सोमालियात लष्करी तळ उभारला असून, सोमालियन लष्कराला प्रशिक्षण देण्यासाठीही पुढाकार घेतला आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |