ऑस्ट्रेलिया-चीन तणाव चिघळला

ऑस्ट्रेलिया-चीन तणाव चिघळला

• चीनच्या राजवटीकडून ऑस्ट्रेलियात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना ‘वॉर्निंग’

• ऑस्ट्रेलियन वृत्तनिवेदिका चेंग लेईला हेरगिरी प्रकरणात अटक

कॅनबेरा/बीजिंग – अमेरिकेतील सत्ताबदलानंतर ऑस्ट्रेलियाला धमकावणार्‍या चीनने आपला पवित्रा अधिकच आक्रमक केला आहे. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने ऑस्ट्रेलियात शिकणार्‍या चिनी विद्यार्थ्यांना त्या देशात शिक्षण घेण्यापूर्वी संभाव्य धोक्यांची माहिती करून घ्या, अशी ‘वॉर्निंग’ दिली आहे. त्यापाठोपाठ चिनी वृत्तवाहिनीसाठी काम करणार्‍या ऑस्ट्रेलियन वृत्तनिवेदिका चेंग लेई यांना हेरगिरी प्रकरणात अटक केल्याची माहितीही देण्यात आली आहे.

गेल्या दोन वर्षात ऑस्ट्रेलिया व चीनमधील संबंध अधिकाधिक बिघडत चालल्याचे समोर येत आहे. चीनची सत्ताधारी राजवट ऑस्ट्रेलियात मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप करीत असल्याच्या घटना उघड झाल्या असून अर्थ, व्यापार, गुंतवणूक, शिक्षण यासह थेट राजकीय क्षेत्रातही चीनच्या वाढत्या प्रभावाचे परिणाम उघड झाले होते. चीन हा ऑस्ट्रेलियाच्या सर्वात मोठ्या भागीदार देशांपैकी एक असल्याने ऑस्ट्रेलियन नेतृत्त्वाने सुरुवातीच्या काळात गुळमुळीत भूमिका घेतली होती. मात्र पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या नेतृत्त्वाखाली ऑस्ट्रेलियन प्रशासनाने चीनविरोधात उघड दंड थोपटून आग्रही व आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली.

चीनचा हस्तक्षेप रोखण्यासाठी ऑस्ट्रेलिया सरकारने अनेक कायदे केले असून ५जीपासून ते कोरोना साथीपर्यंत चीनच्या कारवायांना थेट विरोध दर्शविण्यास सुरुवात केली आहे. मॉरिसन सरकारच्या या आक्रमकतेला अमेरिकेसह इतर देशांकडून साथ मिळाली होती. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मॉरिसन सरकारच्या चीनविरोधी निर्णयांचे समर्थन करून त्याची प्रशंसाही केली होती. त्यामुळे बिथरलेल्या चीनने ऑस्ट्रेलियावर दडपण आणण्यास सुरुवात केली होती. अमेरिकेत सत्ताबदल झाल्यानंतर चीनचा पवित्रा अधिकच आक्रमक झाल्याचे गेल्या तीन दिवसांमधील घटनांवरून दिसून येते.

शुक्रवारी चीनच्या शिक्षण विभागाने ऑस्ट्रेलियात शिकणार्‍या चिनी विद्यार्थ्यांसाठी ‘वॉर्निंग’ जारी केली. ‘ऑस्ट्रेलियातील अनेक शहरांमध्ये परदेशी विद्यार्थ्यांवर हल्ले होण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्याचवेळी कोरोनाच्या साथीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रवास अजूनही पूर्णपणे सुरक्षित नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियात शिक्षणासाठी जाणार्‍या किंवा आधीच शिक्षण घेत असलेल्या व चीनमधून माघारी ऑस्ट्रेलियात परतण्याची इच्छा असणार्‍या विद्यार्थ्यांनी संभाव्य धोक्यांची नीट खात्री करून घ्यावी’, असे बजावण्यात आले आहे. गेल्या आठ महिन्यात चीनकडून ऑस्ट्रेलियासंदर्भात असा इशारा दिला जाण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी जून महिन्यातही चीनच्या पर्यटन मंत्रालयाने ऑस्ट्रेलियात वांशिक भेदभाव व हिंसाचार वाढल्याचे कारण पुढे करून आपल्या नागरिकांनी ऑस्ट्रेलियाचा प्रवास टाळावा, असा ‘अ‍ॅलर्ट’ जारी केला होता. ऑस्ट्रेलियाने चीनचे सर्व दावे निराधार असल्याचे प्रत्युत्तर दिले होते. शुक्रवारी जारी केलेल्या ‘वॉर्निंग’वरही ऑस्ट्रेलियाने तीव्र प्रतिक्रिया दिली असून चीनची राजवट अपप्रचार करीत असल्याची टीका केली आहे.

या टीकेनंतर चीनने ऑस्ट्रेलियाला अजून एक धक्का दिल्याचे सोमवारी उघड झाले. ऑगस्ट महिन्यात चीनच्या यंत्रणांनी ताब्यात घेतलेल्या ऑस्ट्रेलियन वृत्तनिवेदिका चेंग लेई यांना हेरगिरीच्या प्रकरणात अटक केल्याची माहिती चीनकडून देण्यात आली. ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री मारिस पेन यांनी सोमवारी यासंदर्भात खुलासा केला. ‘सरकारी गुपिते परदेशात पुरविल्याच्या संशयावरून चेंग लेई यांना अटक केल्याची माहिती चिनी यंत्रणांनी दिली’, असे परराष्ट्रमंत्री पेन यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात दिलेल्या माहिती लेई यांना नजरकैदेत ठेवल्याचे चीनकडून सांगण्यात आले होते.

चीनमधील ऑस्ट्रेलियन अधिकार्‍यांनी २७ जानेवारीला चेंग लेई यांची भेट घेतल्याची माहितीही ऑस्ट्रेलियन परराष्ट्रमंत्र्यांनी दिली. चीनच्या भूमिकेबद्दल ऑस्ट्रेलियाने तीव्र चिंता व्यक्त केल्याचेही परराष्ट्रमंत्री पेन यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून चेंग लेई चिनी वृत्तवाहिनी ‘सीजीटीएन’च्या इंग्रजी आवृत्तीसाठी काम करीत होत्या.
गेल्या वर्षी चीनने डॉ. यांग हेंगजून या ऑस्ट्रेलियन नागरिकाला ताब्यात घेऊन त्यांच्यावर हेरगिरीचा आरोप ठेवला होता. त्यानंतर आता लेई यांच्यावर कारवाई झाल्याने ऑस्ट्रेलिया व चीनमध्ये निर्माण झालेला तणाव अधिकच चिघळण्याचे संकेत मिळत आहेत.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info