जेरूसलेम/वॉशिंग्टन/तेहरान – ‘अणुकरार करून अमेरिका इराणच्या अण्वस्त्रसज्जतेचा मार्ग प्रशस्त करीत आहे. मात्र, काही झाले तरी इस्रायल इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नाही. इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्याबाबतच्या इस्रायलच्या भूमिकेत तसूभरही बदल झालेला नाही’, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी दिला. त्यांची ही प्रतिक्रिया येण्याच्या काही तास आधी अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने इराणबरोबरील 2015 सालचा अणुकरार पुनर्जिवित करण्याची घोषणा केली होती.
‘2015 सालच्या अणुकरारात सहभागी होण्यासाठी दिलेला प्रस्ताव अमेरिकेस मान्य आहे. यासाठी इराणसह सुरक्षा परिषदेच्या इतर स्थायी सदस्यांबरोबर चर्चा करण्यासही अमेरिकेची तयारी आहे’, अशी घोषणा अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी केली. यानंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी ब्रिटन, फ्रान्स व जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेची माहिती देताना, इराणबरोबरचा अणुकरार हे अमेरिकेच्या मुत्सद्दीपणाला मिळालेले मोठे यश असल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर इराणने देखील आपल्या आण्विक हालचाली कमी करून अणुकराराचे पालन करावे, असे आवाहन ब्लिंकन यांनी केले.
इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ यांनी अणुकरारात सामील होण्याच्या अमेरिकेच्या घोषणेचे स्वागत केले. पण अमेरिकेने आपल्या देशावरील पूर्ण निर्बंध तत्काळ मागे घेतल्याखेरीज इराण कुठल्याही चर्चेत सहभागी होणार नसल्याचे परराष्ट्रमंत्री झरिफ यांनी जाहीर केले. त्यामुळे बायडेन प्रशासन इराणबरोबर अणुकरार करण्यास तयार झाले असले तरी इराण आपल्या अणुप्रकल्पातील आक्रमक हालचाली बंद करण्यास तयार नाही. आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी बायडेन प्रशासनाकडे येत्या रविवार, 21 फेब्रुवारीपर्यंतची मुदत असल्याची घोषणा इराणने याआधीच केली आहे.
इराणबरोबरच्या अणुकरारात सहभागी होण्याबाबत बायडेन प्रशासनाने केलेल्या या घोषणेवर इस्रायलकडून प्रतिक्रिया उमटली आहे. या अणुकरारात सामील होऊन बायडेन प्रशासन इराणला अण्वस्त्रसज्जतेसाठी प्रशस्त मार्ग करून देत असल्याचा आरोप इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी केला. बायडेन प्रशासनाने आपल्या या निर्णयातून माघार घ्यावी, यासाठी इस्रायल अमेरिकेच्या संपर्कात असल्याचे नेत्यान्याहू म्हणाले. पण त्याचबरोबर काही झाले तरी इस्रायल इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नाही, असेही पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी ठासून सांगितले.
दरम्यान, अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी अणुकराराविषयीच्या घोषणेबाबत सौदी अरेबियाचे संरक्षणमंत्री आणि क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. अणुकरारासंबंधातील कुठल्याही चर्चेत आपल्यालाही सहभागी करून घेण्याची मागणी सौदीने काही दिवसांपूर्वी केली होती. पण बायडेन प्रशासनाने सौदीच्या या मागणीवर समाधानकारक उत्तर देण्याचे टाळले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |