सिरियातून झालेल्या रॉकेट हल्ल्यांना इस्रायलकडून हवाई हल्ल्याद्वारे प्रत्युत्तर

जेरूसलेम – सिरियातून इस्रायलवर सहा रॉकेट्सचा मारा करण्यात आला. शनिवारची रात्र व रविवारच्या सकाळपर्यंतच्या काळात झालेल्या या रॉकेट हल्ल्यांमध्ये इस्रायलची हानी झालेली नाही. मात्र याला प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलने सिरियाच्या दक्षिणेकडील भागात हवाई हल्ले चढवून तोफा व ड्रोन्सचा मारा केला. इस्रायली संरक्षणदलांनी ही माहिती दिली. शुक्रवारी पॅलेस्टाईनच्या गाझापट्टी व लेबेनॉनमधून इस्रायलवर सुमारे 78 रॉकेट्सचा मारा झाला होता. त्यानंतर सिरियातूनही इस्रायलवर रॉकेट्चा मारा सुरू झाला असून यामुळे एकाच वेळी अनेक आघाड्यांवरून इस्रायलवर हल्ले सुरू होतील, ही इस्रायली नेते व विश्लेषकांनी व्यक्त केलेली चिंता प्रत्यक्षात उतरू लागल्याचे दिसत आहे.

सिरियातून

सिरियाच्या गोलन सीमेजवळील भागावर इराणसंलग्न हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांचे तळ असून इथून इस्रायलवर हल्ल्याची तयारी केली जात असल्याचे आरोप इस्रायलने केले होते. शनिवारी व रविवारी सिरियातून झालेल्या रॉकेटहल्ल्यानंतर इस्रायली माध्यमांनी पुन्हा एकदा यासाठी सिरियन सरकारला धारेवर धरले. इस्रायलवर हल्ले चढविणाऱ्या संघटनांवर कारवाई करण्याचे टाळून सिरियाची अस्साद राजवट खतरनाक खेळ खेळत असल्याचा ठपका इस्रायली माध्यमांनी ठेवला आहे. त्याचवेळी इस्रायली संरक्षणदलांनी दक्षिण सिरियावर तोफा व ड्रोन्सचा मारा करून आपल्यावरील रॉकेटहल्ल्याला प्रत्युत्तर दिले. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात सिरियन लष्कराला लक्ष्य करण्यात आल्याचेही संरक्षणदलांनी म्हटले आहे.

सिरियातून

याआधीही इस्रायलने अनेकवार सिरियात हवाई हल्ले चढवून या देशातील शस्त्रास्त्रांची कोठारे व तळ नष्ट केले होते. सिरियाने इस्रायलच्या या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याच्या धमक्याही दिल्या होत्या. पण शनिवारी व रविवारी सिरियातून इस्रायलवर झालेला रॉकेट्सचा मारा ही सर्वसाधारण बाब ठरत नाही, त्यामागे इस्रायलच्या सुरक्षेला आव्हान देण्याचे कारस्थान असल्याचा दावा इस्रायलच्या काही वर्तमानपत्रांनी केला आहे. हमास व इस्लामिक जिहाद या पॅलेस्टिनी संघटना, लेबेनॉन व सिरियामध्ये तळ असलेली हिजबुल्लाह या साऱ्यांचा वापर करून इराणच इस्रायलवरील हल्ल्यांचा कट आखत असल्याचे इस्रायलच्या वर्तमानपत्राचे म्हणणे आहे.

सिरियातून

हमासचा नेता इस्माईल हनिया व हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्ला यांची लेबेनॉनमध्ये नुकतीच भेट झाली. या भेटीत दोघांनीही इस्रायलच्या विरोधातील कारवाया तीव्र करण्याचा निर्धार केला. त्यानंतर इस्रायलवर गाझापट्टी, लेबेनॉनची सीमा आणि आता सिरियाच्या सीमेवरूनही हल्ले सुरू झाले आहेत, ही लक्षणीय बाब ठरते.

दरम्यान, सध्या पूर्व जेरूसलेममध्ये असलेल्या प्रार्थनास्थळावरून इस्रायल व पॅलेस्टाईनमध्ये गंभीर वाद निर्माण झाले असून त्यामुळे इस्रायलवर हल्ले सुरू झाल्याचे दावे जगभरातील माध्यमांनी केले आहेत. पूर्व जेरूसलेममधील परिस्थिती संवेदनशील बनली असून इथल्या वादाचे पडसाद संपूर्ण आखाती क्षेत्रात उमटण्याचे दाट शक्यता वर्तविली जाते. अशा परिस्थितीत इस्रायलच्या सुरक्षेला सर्वच आघाड्यांवर आव्हाने मिळत असल्याचे सांगून परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी बजावले आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info