वॉशिंग्टन – ‘२०१५ सालच्या अणुकरारात सामील होऊन अमेरिका आखातातील चुका सुधारण्याचा प्रयत्न करीत आहे’, अशी घोषणा करून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आपल्या इराणबाबतच्या भूमिकेचे समर्थन केले. पण बायडेन प्रशासनाच्या या निर्णयावर अमेरिकेत जोरदार टीका होत आहे. पाच वर्षांपूर्वीच्या अणुकरारात सामील होऊन बायडेन प्रशासन इराणला अण्वस्त्रसज्जतेची हमी देत आहेत, असा आरोप अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी केला.
बायडेन प्रशासनाने गुरुवारी संध्याकाळी इराणबरोबरच्या अणुकरारासाठी तयार असल्याची घोषणा केली. युरोपिय महासंघाने दिलेल्या प्रस्तावाचा स्वीकार करुन अमेरिका इराणबरोबर अणुकरारावर चर्चा करणार असल्याचे व्हाईट हाऊसचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी जाहीर केले. पुढच्या काही तासात राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी देखील म्युनिक सुरक्षा परिषदेमध्ये बोलताना इराणबरोबर अणुकरार करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा कौन्सिलच्या चौकटीत ही चर्चा होईल. तसेच गेल्या काही वर्षांमध्ये आखातातील अस्थैर्यासाठी कारणीभूत ठरलेल्या चुका या अणुकरारामुळे सुधारल्या जातील, असा दावा बायडेन यांनी केला.
पण बायडेन प्रशासन इराणबरोबर अणुकरार करण्याची घाई करीत असल्याची टीका अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे नेते करीत आहेत. अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी अमेरिकी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, बायडेन प्रशासनाला इशारा दिला. ‘इराणमधील आयातुल्लांच्या राजवटीशी जुळवून घेणे, हे युरोपियन देशांचे मॉडेल आहे. बायडेन प्रशासनाने देखील इराणच्या राजवटीशी जुळवून घेतले तर इराणला अण्वस्त्रसज्जतेची हमी देणारा मार्ग मोकळा होईल’, असे पॉम्पिओ म्हणाले.
त्याचबरोबर अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांनी युरोपिय देशांवर हल्ला चढविला. ‘युरोपियन देशांनी याआधी इराणमधील आयातुल्लांच्या राजवटीला कुरवळण्याचा प्रयत्न केला होता. पण ट्रम्प प्रशासनाने हे कधीही होऊ दिले नाही. इराणच्या या राजवटीला फक्त कारवाईची भाषा कळते. ट्रम्प प्रशासनाने अमेरिकन जनता आणि इस्रायलच्या सुरक्षेसाठी हीच भूमिका स्वीकारली होती’, अशा शब्दात पॉम्पिओ यांनी इराणबरोबर चर्चा न करता निर्बंध अधिक कठोर करण्याचे आवाहन केले.
बायडेन प्रशासनाने इराणविरोधात कठोर भूमिका स्वीकारली नाही तर अमेरिकेची कमजोरी ओळखून इराण अधिक शक्तीशाली होईल आणि हल्लेही चढविल, असा इशारा चार दिवसांपूर्वीच पॉम्पिओ यांनी अमेरिकेतील वृत्तवाहिनीशी बोलताना दिला होता. यासाठी इराण हिजबुल्लाह तसेच इराकमधील इराणसंलग्न दहशतवादी संघटनांचा वापर करील, असे पॉम्पिओ यांनी बजावले होते. बायडेन प्रशासनाने देखील ट्रम्प प्रशासनाच्या भूमिकेचे अनुकरण करावे, असे पॉम्पिओ म्हणाले होते. पण बायडेन प्रशासनाने इराणबरोबर अणुकरार करण्यासाठी हालचाली सुरू केल्यामुळे पॉम्पिओ यांनी चार दिवसांपूर्वीच्या इशार्याची आठवण करून दिली.
पॉम्पिओ यांच्या प्रमाणे अमेरिकन काँग्रेसमधील काही सिनेटर्सनी देखील बायडेन यांच्या निर्णयावर ताशेरे ओढत आहेत. तसेच इराणवरील निर्बंध कायम ठेवण्याची मागणी करीत आहेत. पण इराणबरोबर कितीही राजनैतिक तणाव असला तरी अमेरिकेचे बायडेन प्रशासन इराणला निर्बंधात अडकवू शकत नसल्याचा दावा इराणच्या रोहानी सरकारचे प्रवक्ते अली राबिए यांनी केला.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |