उत्तर कोरियाकडून पाणबुडीतून क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण

- अमेरिका, दक्षिण कोरियामधील युद्धसराव सुरू

सेऊल – प्रत्यक्ष युद्धाची वेळ जवळ आली असून लष्कराने त्याची तयारी करावी, अशी घोषणा करणाऱ्या उत्तर कोरियाने नव्याने क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. यावेळी उत्तर कोरियाने पाणबुडीतून स्ट्रॅटेजिक क्रूझ्‌‍ क्षेपणास्त्रे डागल्याचे जाहीर केले. या चाचणीद्वारे आपली क्षेपणास्त्रे आण्विक स्फोटके वाहून नेण्याची क्षमता राखून असल्याचे संकेत उत्तर कोरियाने दिल्याचा दावा केला जातो. सोमवारपासून अमेरिका व दक्षिण कोरियातील सर्वात मोठ्या युद्धसरावाची सुरुवात झाली. त्याआधी ही क्षेपणास्त्र चाचणी घेऊन उत्तर कोरियाने अमेरिका व दक्षिण कोरियाला इशारा दिल्याचे दिसत आहे.

पाणबुडीतून

उत्तर कोरियन हुकूमशहा किम जाँग-उन यांनी शनिवारी आपल्या लष्कराला अमेरिका व दक्षिण कोरियाविरोधी युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले होते. येत्या काळातील युद्ध सर्वात विध्वंसक असेल, असा दावा किम जाँग यांनी केला होता. यावेळी उत्तर कोरिया व शत्रूदेशांमध्ये प्रत्यक्ष युद्ध भडकेल, असे उत्तर कोरियाचे हुकूमशहा म्हणाले होते. यानंतर रविवारी उत्तर कोरियाच्या लष्कराने पाणबुडीतून दोन क्षेपणास्त्रे डागली. उत्तर कोरियाच्या लष्कराने या दोन्ही चाचण्यांचे व्हिडिओज्‌‍, फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले.

पाणबुडीतून

ही दोन्ही सामरिक क्रूझ्‌‍ क्षेपणास्त्रे असल्याचे उत्तर कोरियन वृत्तवाहिनीने जाहीर केले. पाणबुडीतून डागलेल्या क्षेपणास्त्रांसाठी स्ट्रॅटेजिक अर्थात सामरिक असा उल्लेख करून उत्तर कोरियन राजवटीने निराळे संकेत दिल्याचे लष्करी विश्लेषकांचे म्हणणे आहे. लष्करी स्तरावर आण्विक क्षमतेचा उल्लेख करण्यासाठी ‘स्ट्रॅटेजिक’ या शब्दाचा वापर केला जातो. त्यामुळे उत्तर कोरियाने पाणबुडीतून आण्विक स्फोटके डागण्याची क्षमता आपल्याकडे असल्याचा इशारा दिल्याचे विश्लेषक सांगत आहेत. अमेरिका व दक्षिण कोरियामधील युद्धसराव सुरू होण्यासाठी अवघे काही तास सुरू असताना ही चाचणी घेऊन उत्तर कोरियाने या दोन्ही देशांना धमकावल्याचे दिसत आहे.

सोमवारपासून अमेरिका व दक्षिण कोरियाच्या लष्करात ११ दिवसांचा युद्धसराव सुरू झाला आहे. यामध्ये बेट देशावर हल्ले चढविण्याबरोबरच आण्विक हल्ल्याविरोधातील सरावाचाही समावेश असल्याचा दावा केला जातो.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info