बायडेन यांच्या बंदीनंतरही अमेरिकन कंपनीचे सौदीबरोबर संरक्षण सहकार्य

बायडेन यांच्या बंदीनंतरही अमेरिकन कंपनीचे सौदीबरोबर संरक्षण सहकार्य

रियाध – अमेरिकेच्या संरक्षण साहित्यनिर्मितीच्या क्षेत्रातील ‘लॉकहिड मार्टिन’ या आघाडीच्या कंपनीने सौदी अरेबियाबरोबर अब्जावधी डॉलर्सचा करार केला. या करारांतर्गत अमेरिकन कंपनी सौदीला क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा पुरविणार आहे. दोन आठवड्यांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी येमेनमधील मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याचा आरोप करून सौदीच्या शस्त्रविक्रीवर बंदीची घोषणा केली होती.

संरक्षण

अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीत अमेरिकन कंपनीने सौदीबरोबर ११० अब्ज डॉलर्सच्या संरक्षण सहकार्याची घोषणा केली होती. याअंतर्गत लॉकहिड मार्टिन सौदीला ‘एफ-३५’ अतिप्रगत लढाऊ विमाने तसेच क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा पुरविणार आहे. यापैकी क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेचा करार रविवारी ‘सौदी अरेबियन मिलिटरी इंडस्ट्रिज्’ (सामी) आणि लॉकहिड मार्टिनमध्ये पार पडला. याअंतर्गत अमेरिकी कंपनी सौदीला क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेचे तंत्रज्ञान पुरविणार असून कर्मचार्‍यांना प्रशिक्षणही देणार आहे. त्याआधी सौदीने शनिवारी २० अब्ज डॉलर्सच्या शस्त्रास्त्रांची निर्मिती करणार असल्याची घोषणा केली. पुढील दशकभरात हे उद्दिष्ट गाठणार असल्याचे सौदीने स्पष्ट केले. २०३० सालापर्यंत सौदी स्वदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्रांच्या निर्मितीसाठी १० अब्ज डॉलर्सहून अधिक गुंतवणूक करणार आहे. या व्यतिरिक्त सौदीच्या लष्कराने आपल्या धोरणात रविवारी मोठ्या बदलांची घोषणा केली. येत्या काळात सौदीच्या लष्कर, हवाईदल आणि नौदलात महिलांची देखील भरती होईल, असे सौदीच्या लष्कराने जाहीर केले.

दरम्यान, अमेरिकेच्या कंपन्यांनी सौदीबरोबर केलेल्या संरक्षण सहकार्याकडे आश्‍चर्याने पाहिले जाते. दोन आठवड्यांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी सौदीला शस्त्रसहकार्य करणार नसल्याचा निर्णय घोषित केला होता. येमेनमधील हिंसाचारासाठी सौदी जबाबदार असल्याचा तसेच अमेरिकेच्या शस्त्रास्त्रांचा येमेनच्या युद्धासाठी वापर केल्याचा आरोप बायडेन यांनी केला होता. बायडेन यांची ही घोषणा सौदीसाठी इशारा असून येत्या काळात अमेरिका आणि सौदीतील संबंध बिघडतील, असा दावा लष्करी विश्‍लेषकांनी केला होता.

मात्र, बायडेन प्रशासनाने लष्करी सहकार्य तोडले तरी याचा सौदीवर काही परिणाम होणार नसल्याचा दावा अमेरिकी विश्‍लेषिकेने केला आहे. असे झाले तर सौदी इस्रायलसह आखातातील नाटो तयार करील. तसेच भारत, रशिया आणि दक्षिण कोरियासह लष्करी सहकार्य वाढविल, असा दावा या विश्‍लेषिकेने केला आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info