डोन्बास क्षेत्रातील सेव्हेरोडोनेत्स्कसाठी रशिया व युक्रेनमध्ये निर्णायक संघर्ष

मॉस्को/किव्ह – डोन्बासमधील मोक्याचे शहर मानल्या जाणाऱ्या सेव्हेरोडोनेत्स्कसाठी रशिया व युक्रेनमध्ये निर्णायक संघर्षाला तोंड फुटले आहे. 24 तासांपूर्वी रशियाकडून काही भाग ताब्यात घेतल्याचे दावे युक्रेनी अधिकाऱ्यांनी केले होते. मात्र त्यानंतर परिस्थिती बदलली असून युक्रेनी फौजांसाठी स्थिती अधिक बिकट झाल्याची माहिती युक्रेनच्या स्थानिक यंत्रणांनी दिली. रशियाने सेव्हेरोडोनेत्स्कसह लिशिचान्स्क व या शहराला जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गांवर तीव्र बॉम्बफेक करण्याबरोबरच रॉकेट हल्लेही चढविले आहेत. याच पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी डोन्बासमधील युक्रेनी लष्कराच्या तुकड्यांना भेट दिल्याचा दावा केला आहे.

सेव्हेरोडोनेत्स्कसाठी

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यासह आघाडीचे नेते तसेच लष्करी अधिकाऱ्यांनी डोन्बासवरील नियंत्रण रशियन मोहिमेसाठी निर्णायक असल्याचे वारंवार सांगितले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या भागावर ताबा मिळविण्यासाठी रशियन फौजा निकराचे प्रयत्न करीत आहेत. जून महिन्याच्या अखेरपर्यंत डोन्बास क्षेत्रावर ताबा मिळविण्याचे रशियाचे इरादे असल्याचे सांगण्यात येत आहे. लुहान्स्क प्रांतावर संपूर्ण नियंत्रण महत्त्वाचे असून त्यासाठी गेल्या दोन आठवड्यात रशियाने सर्व सामर्थ्य पणाला लावल्याचे दिसत आहे. युक्रेनसह या देशाला समर्थन देणाऱ्या पाश्चिमात्य देशांनाही डोन्बासमध्ये रशियाला सामरिक यश मिळत असल्याचे मान्य करावे लागले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष तसेच वरिष्ठ अधिकारी डोन्बासच्या लढाईत लष्कराची मोठी हानी होत असल्याची कबुलीही देत आहेत. मात्र तरीही सेव्हेरोडोनेत्स्क व इतर शहरांमधून सहज माघार घेण्यास युक्रेनने नकार दिला आहे. त्यामुळे या भागात रशिया व युक्रेनमध्ये निर्णायक संघर्ष पेटल्याचे समोर येत आहे. डोन्बास क्षेत्रात सध्या दोन देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचे वर्णन युक्रेनी अधिकाऱ्यांनी ‘हॉटेस्ट वॉर’ असे केले आहे. त्याचवेळी दिवसेंदिवस युक्रेनी लष्करासाठी परिस्थिती वाईट होत चालल्याचेही नमूद केले.

सेव्हेरोडोनेत्स्कसाठी

रशियाकडून सेव्हेरोडोनेत्स्कसह लिशिचान्स्क, बाखमत व स्लोव्हिआन्स्क या शहरांवर तुफानी हल्ले सुरू आहेत. या हल्ल्यांसाठी लढाऊ विमाने, रणगाडे, रॉकेट सिस्टिम्स, तोफा, ड्रोन्स अशांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. रशियन हल्ले युक्रेनी शहरांना भाजून काढत असल्याचा दावा युक्रेनी अधिकाऱ्यांनी केला. गेल्या 24 तासांमध्ये रशियाने केलेल्या हल्ल्यांमध्ये 400हून अधिक युक्रेनी जवानांचा बळी गेला असून परदेशी शस्त्रसाठा मोठ्या प्रमाणात नष्ट करण्यात आल्याचा दावा रशियन संरक्षण विभागाने केला आहे.

डोन्बासबरोबर रशियाने दक्षिण युक्रेनलाही लक्ष्य केले असून मायकोलेव्ह शहरात सातत्याने क्षेपणास्त्रे हल्ले सुरू आहेत. त्याचवेळी ओडेसा शहरावर रशिया सागरी मार्गाने कारवाई करून युक्रेनला धक्का देऊ शकतो, असे वृत्त समोर आले आहे.

English    मराठी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info