अमेरिकेच्या न्यूक्लिअर बॉम्बर्सची बाल्टिक देशांमध्ये गस्त – रशियानेही आपली लढाऊ विमाने धाडली

अमेरिकेच्या न्यूक्लिअर बॉम्बर्सची बाल्टिक देशांमध्ये गस्त – रशियानेही आपली लढाऊ विमाने धाडली

वॉशिंग्टन – नॅव्हॅल्नी प्रकरणावरून रशियाविरोधात निर्बंधांची घोषणा केल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या अवधीत अमेरिकन बॉम्बर्सनी रशियन सीमेनजिक असणार्‍या बाल्टिक क्षेत्रात गस्त घातल्याचे उघड झाले. बुधवारी अमेरिकेच्या ‘बी-१ न्यूक्लिअर बॉम्बर्स’नी बाल्टिक क्षेत्रातील लिथुआनिया, लाटव्हिया व इस्टोनियाच्या हद्दीतून उड्डाण केल्याची माहिती अमेरिकी हवाईदलाने दिली. अमेरिकी बॉम्बर्सची ही मोहीम रशियाला रोखून युरोपिय देशांना बळ पुरविण्यासाठी आखण्यात आलेल्या मोहिमेचा भाग मानला जातो.

आर्क्टिक क्षेत्रातील रशियाचे वाढते संरक्षणतळ व आक्रमक हालचाली रोखण्यासाठी अमेरिकेने नॉर्वेतील हवाईतळावर ‘बी-१ बॉम्बर्स’ तैनात करण्याचा निर्णय घेतला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी यासंदर्भात आदेश दिल्याचे समोर आले होते. फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेची चार ‘बी-१ न्यूक्लिअर बॉम्बर्स’ नॉर्वेतील ‘ऑरलँड’ तळावर दाखल झाली आहेत. या बॉम्बर्सबरोबर अमेरिकेच्या २०० जवानांची एक तुकडीही नॉर्वेत तैनात करण्यात आली आहे. अमेरिकेने नॉर्वेत ‘बॉम्बर्स’ व जवान तैनात करण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

बुधवारी बाल्टिक क्षेत्रातील देशांमध्ये धाडण्यात आलेली बॉम्बर्स नॉर्वेतील तळावरून पाठविण्यात आली होती. ‘नाटोतील सहकारी देशांप्रती असलेली अमेरिकेची वचनबद्धता कधीही भंगणार नाही. बाल्टिक देशांमधील मोहीम त्यासंदर्भात दिलेला सुस्पष्ट संदेश आहे. अमेरिका युरोपातील नाटो सहकारी देशांबरोबर एकजुटीने उभी आहे’, या शब्दात अमेरिकी हवाईदलाचे युरोपातील वरिष्ठ अधिकारी जनरल जेफ हॅरिगिअन यांनी अमेरिकेच्या बाल्टिकमधील मोहिमेची माहिती दिली.

अमेरिकेच्या न्यूक्लिअर बॉम्बर्सवर लक्ष ठेवण्यासाठी रशियानेही आपली लढाऊ विमाने बाल्टिकमध्ये धाडल्याचे समोर आले. रशियाने बुधवारी आपले ‘सुखोई एसयु-२७’ हे लढाऊ विमान बाल्टिक सागरी क्षेत्रात पाठविले होते. अमेरिकी बॉम्बर्सना रशियन हद्दीपासून सुरक्षितरित्या दूर पाठविल्यानंतर रशियन लढाऊ विमान माघारी परत आल्याची माहिती रशियाच्या ‘नॅशनल डिफेन्स मॅनेजमेंट सेंटर’ने दिली. अमेरिकी बॉम्बर्स रशियन हद्दीत आले नव्हते, असा खुलासाही रशियाकडून करण्यात आला.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘अमेरिका फर्स्ट पॉलिसी’ स्वीकारून चीनसह इराण, युरोपिय देश व मित्रदेशांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्याचवेळी ट्रम्प यांची रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी असलेली जवळीकही वादाचा विषय ठरली होती. बायडेन यांनी मात्र आपले रशिया धोरण पूर्वीच्या राष्ट्राध्यक्षांप्रमाणे गुळमुळीत राहणार नसून आक्रमक भूमिका स्वीकारण्याचा इशारा दिला होता. गेल्या ४८ तासांमध्ये रशियावर लादलेले कडक निर्बंध आणि त्यापाठोपाठ रशियन हद्दीनजिक धाडलेली बॉम्बर्स त्याचाच भाग ठरतो.

रशियाने गेल्या काही वर्षात आर्क्टिकमधील संरक्षणतळांची संख्या व त्यावरील तैनाती मोठ्या प्रमाणात वाढवली होती. रशियन लढाऊ विमाने व पाणबुड्यांचा वाढता वावर युरोपिय देशांसाठी चिंतेचा विषय ठरला होता. या पार्श्‍वभूमीवर, बायडेन यांनी आक्रमक धोरणाचे संकेत देऊन रशियाला लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info