अमेरिकेच्या छुप्या सायबरहल्ल्यांविरोधात रशियाची ‘वॉर्निंग’

अमेरिकेच्या छुप्या सायबरहल्ल्यांविरोधात रशियाची ‘वॉर्निंग’

मॉस्को/वॉशिंग्टन – अमेरिकेने रशियावर छुपे सायबरहल्ले चढविल्यास ही बाब उघडपणे आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारीचा भाग ठरेल, असा इशारा रशियाने दिला आहे. गेल्या वर्षी अमेरिकेच्या सरकारी विभागांवर झालेल्या मोठ्या सायबरहल्ल्यामागे रशियाचा हात असल्याचे उघड झाले होते. रशियाच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी अमेरिकी प्रशासनाने केली असून रशियन नेटवर्क्सवर छुपे सायबरहल्ले चढविले जातील, असे संकेत अमेरिकी अधिकार्‍यांकडून देण्यात आले आहेत. अमेरिकी अधिकार्‍यांच्या वक्तव्यानंतर रशियातील काही सरकारी वेबसाईट्स ‘डाऊन’ झाल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले आहे.

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी रशियाविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. गेल्या महिन्यात अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचा आराखडा जाहीर करताना बायडेन यांनी, माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी रशियाबाबत घेतलेल्या गुळमुळीत भूमिकेवर टीकास्त्र सोडले होते. आपण आपल्या पूर्वसुरींप्रमाणे रशियासमोर लोळण घेणार नाही, असा दावा करून रशियासारखा देश आपली लोकशाही उधळण्यासाठी हालचाली करीत आहे, असा आरोप अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी केला होता.

त्यानंतर बायडेन प्रशासनाने एकापाठोपाठ एक रशियाविरोधी निर्णयांचा धडाका सुरू केला आहे. रशियाच्या क्रिमिआवरील ताब्याला कधीच मान्यता देणार नसल्याचे सांगून, अमेरिकेने युक्रेनला संरक्षणसहाय्याची घोषणा केली. त्यानंतर नॅव्हॅल्नी प्रकरणावरून रशियाविरोधात कठोर निर्बंध लादण्यात आले. त्यापाठोपाठ आता सायबरहल्ल्यांच्या मुद्यावरून रशियाविरोधात मोठी कारवाई करण्याची तयारीही सुरू झाली आहे.

अमेरिकेतील ‘मायक्रोसॉफ्ट’, ‘फायर आय’ व ‘सोलरविंड्स’सारख्या खाजगी कंपन्या रशियन सायबरहल्ल्याचे लक्ष्य झाल्याचे गेल्या वर्षी समोर आले होते. या कंपन्यांच्या माध्यमातून रशियन हॅकर्सनी अमेरिकेतील महत्त्वाच्या सरकारी विभागांच्या नेटवर्क्सवर सायबरहल्ले चढविले होते. त्यात संरक्षण, ऊर्जा, अर्थ व व्यापार विभागाचा समावेश होता. अमेरिकेतील ‘न्यूक्लिअर नेटवर्क्स’नाही त्याचा फटका बसल्याची खळबळजनक माहिती समोर आली होती.

जानेवारी महिन्यात राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतलेल्या ज्यो बायडेन यांनी प्रशासनाला प्रत्युत्तर देण्याची योजना सादर करण्याचे निर्देश दिले होते. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिव्हन व राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार अ‍ॅन न्यूबर्गर यांच्याकडे यासंदर्भातील जबाबदारी सोपविण्यात आली आहे. रशियातील महत्त्वाच्या नेटवर्क्सना लक्ष्य करण्यात येणार असून, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन तसेच गुप्तचर यंत्रणा व लष्कराशी संबंधित यंत्रणांचा त्यात समावेश असेल, असे संकेत अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिले होते. अमेरिकेच्या माध्यमांमध्ये यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर रशियाकडून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे प्रवक्ते असणार्‍या दिमित्रि पेस्कोव्ह यांनी, अमेरिकेची ही कारवाई सायबरगुन्हेगारीचा भाग ठरेल, असे बजावले आहे. रशिया त्याला प्रत्युत्तर देईल, असे संकेतही त्यांनी दिले असले तरी त्याबाबत अधिक माहिती देण्याचे टाळले. रशियन प्रवक्त्यांकडून अमेरिकेला ‘वॉर्निंग’ दिली जात असतानाच रशियातील काही सरकारी वेबसाईट्स ‘डाऊन’ झाल्याची माहिती समोर आली आहे. यात रशियन सरकारच्या ‘क्रेमलिन’, रशियन पंतप्रधानांची वेबसाईट तसेच रशियाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या वेबसाईटचा समावेश आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info