‘एव्हरग्रॅन्ड’चे संकट म्हणजे चीनची सुनियोजित खेळी – भारतीय विश्‍लेषिकेचा दावा

बीजिंग/वॉशिंग्टन – चीनच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘एव्हरग्रॅन्ड’चे संकट हे चीनच्या कम्युनिस्ट राजवटीकडून करण्यात आलेली सुनियोजित खेळी आहे, असा दावा भारतीय विश्‍लेषिका देविना मेहरा यांनी केला आहे. ‘एव्हरग्रॅन्ड’चे संकट नियंत्रित स्फोटासारखे असून चीनसारख्या सरकारकडून नियंत्रित करण्यात येणार्‍या अर्थव्यवस्थेत ही बाब शक्य असल्याचेही मेहरा यांनी बजावले आहे. या संकटाचा सर्वात मोठा फटका बॅकिंग क्षेत्राला बसेल, असेही त्यांनी बजावले. दरम्यान, ‘एव्हरग्रॅन्ड’ची घसरण व त्याचे पडसाद समोर येत असतानाच चीनच्या मध्यवर्ती बँकेने अर्थव्यवस्थेत तब्बल १८ अब्ज डॉलसहून अधिक रोकड उपलब्ध करून दिल्याचे समोर आले आहे.

‘एव्हरग्रॅन्ड’चे संकट

गेल्या वर्षभरात चीनच्या मालमत्ता व बांधकाम क्षेत्रातील आघाडीची कंपनी असणारी ‘एव्हरग्रॅन्ड’चे समभाग ८० टक्क्यांहून अधिक कोसळले आहेत. या कंपनीवर तब्बल ३०५ अब्ज डॉलर्सची कर्जे असून ती फेडण्यास कंपनी सक्षम नसल्याचे दावे करण्यात येत आहेत. गुरुवारी कंपनीला ८.३ कोटी डॉलर्सची देणी चुकती करायची आहेत. कंपनीने देणी चुकती न केल्यास त्याचे धक्के थेट जागतिक अर्थव्यवस्थेला बसण्याची भीती व्यक्त करण्यात येते. देणे चुकते न झाल्यास कंपनी दिवाळखोरीत जाऊ शकते. अमेरिकेच्या ‘द स्ट्रीट’ या वेबसाईटने ‘एव्हरग्रॅन्ड’चे संकट चीनसाठी ‘लेहमन मुमेन्ट’ ठरु शकते, असे बजावले आहे.

या पार्श्‍वभूमीवर, ‘फर्स्ट ग्लोबल’ या वित्तसंस्थेच्या विश्‍लेषिका देविना मेहरा यांनी, ‘एव्हरग्रॅन्ड’चे संकट चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने जाणुबुजून घडविले असावे, असा दावा केला आहे. अर्थव्यवस्थेतील अधिक मोठी समस्या अथवा संकट रोखण्यासाठी चीनची राजवट ‘एव्हरग्रॅन्ड’ला दिवाळखोरीत जाणे भाग पाडेल, असे मेहरा एका मुलाखतीत म्हणाल्या. ‘एव्हरग्रॅन्ड’पाठोपाठ चीन इतरही काही बड्या कंपन्यांना अपयशी ठरण्यास भाग पाडू शकतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. ‘एव्हरग्रॅन्ड’च्या संकटाची तुलना त्यांनी नियंत्रित स्फोटाशी केली आहे. चीनची अर्थव्यवस्था पूर्णपणे सत्ताधारी राजवटीच्या पकडीत असून अशा प्रकारच्या अर्थव्यवस्थेत हे घडू शकते, असेही त्यांनी बजावले.

गेल्या आठवड्यात ‘एव्हरग्रॅन्ड’ची मोठी घसरण सुरू असताना अनेक परदेशी विश्‍लेषकांनी चीनची राजवट कंपनी कोसळू देईल, असे दावे केले होते. मेहरा यांचे वक्तव्यही त्याला दुजोरा देणारे आहे. मात्र अमेरिका व युरोपमधील वित्तीय बाजारपेठ तसेच गुंतवणुकदारांमध्ये भीतीचे वातावरण अद्यापही कायम आहे. अमेरिका तसेच युरोपमधील विश्‍लेषकांनी ‘एव्हरग्रॅन्ड’चे संकट आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेला धक्का देणारे ठरु शकते, अशी भीती वर्तविली आहे. ‘एव्हरग्रॅन्ड’ दिवाळखोरीत गेल्यास कर्जरोख्यांच्या बाजारपेठेत अराजकसदृश स्थिती निर्माण होईल, असे ब्रिटीश विश्‍लेषकांनी बजावले आहे. लंडनमधील वित्त क्षेत्रात चीनमधील गुंतवणूक व अर्थव्यवस्थेची स्थिती याबाबत ‘पॅनिक’ तयार झाल्याचा दावाही करण्यात आला आहे.

अमेरिकेच्या ‘फॉक्स न्यूज’ या वृत्तवाहिनीवरील विश्‍लेषक लॅरी कुडलो यांनी, ‘एव्हरग्रॅन्ड’चे संकट हा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी खाजगी क्षेत्राविरोधात सुरू केलेल्या मोहिमेचा भाग असू शकतो, असे वक्तव्य केले आहे. अमेरिकी गुंतवणुकदार व विश्‍लेषक जिम चॅनोस यांनी ‘एव्हरग्रॅन्ड’चे संकट अमेरिकेच्या ‘लेहमन ब्रदर्स’पेक्षा अधिक मोठा धक्का देणारे असू शकते, असे बजावले आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info