किव्ह/ब्रुसेल्स – युक्रेन आणि रशियाच्या सीमेवर सुरू असलेल्या लष्करी हालचाली पाहता, ‘युरोपियन वॉर’ किंवा महायुद्ध पेट घेऊ शकेल, असा इशारा रशियन विश्लेषकांनी दिला होता. नाटो आणि युक्रेनने ‘कोझॅक मेस’ नावाच्या युद्धसरावाची घोषणा करून हा इशारा प्रत्यक्षात उतरविण्याच्या दिशेने पावले टाकल्याचे दिसत आहे. या युद्धसरावात ब्रिटनसह पाच नाटो सदस्य देशांचे एक हजारांहून अधिक जवान सहभागी होणार आहेत. नाटोने युक्रेनमध्ये अतिरिक्त तैनाती केल्यास रशियाला याच्या विरोधात आवश्यक ती पावले उचलावी लागतील, असे रशियाने याआधीच बजावले होते. त्यामुळे या संयुक्त सरावाला रशियाकडून तितकेच आक्रमक प्रत्युत्तर लवकरच दिले जाऊ शकते.
अमेरिका व युरोपबरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाने युक्रेन सीमेवर मोठ्या हालचाली सुरू केल्याचे समोर येत आहे. रशियाने युक्रेन सीमेनजिक चार हजार जवान तैनात केले आहेत. त्याचबरोबर ‘एस-४००’ ही प्रगत क्षेपणास्त्र यंत्रणा, हेलिकॉप्टर्स, रणगाडे व सशस्त्र वाहनेही युक्रेन सीमेवर पाठविण्यात आली आहेत. या हालचालींचे फोटोग्राफ्स तसेच व्हिडिओ माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. ही तैनाती युद्धसरावासाठी असल्याचा दावा रशियाकडून करण्यात आला असून कोणालाही धमकावण्याचा उद्देश नसल्याचे रशियाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मात्र रशियाच्या या तैनातीविरोधात नाटो व युक्रेनने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. कोझॅक मेस या युद्धसरावाची घोषणा त्याचाच भाग ठरतो. युक्रेनच्या संरक्षणदलाने या सरावाची माहिती जाहीर केली आहे. ‘आक्रमक शेजारी देशाकडून झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आखण्यात येणारे डावपेच व कारवायांवर यात भर देण्यात येईल. ब्रिटनसह किमान पाच नाटो सदस्य देशांचे एक हजारांहून अधिक जवान यात सहभागी होणार आहेत’, असे युक्रेनकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. ब्रिटनने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
कोझॅक मेस या सरावाबरोबरच युक्रेन पुढील काही महिन्यांमध्ये नाटो सदस्य देशांबरोबर सहा लष्करी सरावांचे आयोजन करणार असल्याचे समोर आले आहे. यात अमेरिका, ब्रिटन, रोमानिया व पोलंडबरोबरच्या सरावांचा समावेश आहे. युद्धसरावाची घोषणा करण्यापूर्वी युक्रेनने रशियावर निर्बंध लादल्याचे समोर आले आहे.
या निर्बंधांमध्ये रशियन कंपन्यांसह रशियाच्या इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीला लक्ष्य करण्यात आले आहे. या निर्बंधाविरोधात रशियाकडून प्रतिक्रिया उमटली असून, प्रत्युत्तरादाखल रशियाही कारवाई करेल, असे रशियाचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी बजावले आहे. या नव्या निर्बंधांपूर्वी युक्रेन सरकारने देशातील रशियन माध्यमांवरही बंदी टाकण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, शनिवारी डोनेत्स्क शहराजवळ झालेल्या एका सुरुंग स्फोटात युक्रेनच्या सैनिकाचा बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. गेल्याच आठवड्यात रशिया-युक्रेन सीमेवरील डोन्बासमध्ये उडालेल्या एका चकमकीत युक्रेनच्या चार जवानांचा बळी गेल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला होता. २०१४ सालापासून पूर्व युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षात सुमारे १४ हजार जणांचा बळी गेला असून १४ लाखांहून अधिक जण विस्थापित झाले आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |