इराण-इस्रायलमधल्या अघोषित युद्धाची तीव्रता वाढत चालली आहे – आंतरराष्ट्रीय माध्यमांची चिंता

इराण-इस्रायलमधल्या अघोषित युद्धाची तीव्रता वाढत चालली आहे – आंतरराष्ट्रीय माध्यमांची चिंता

इराण

दुबई – पाच दिवसांपूर्वी ‘रेड सी’च्या क्षेत्रात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचा तरंगता तळ असलेल्या ‘एमव्ही साविझ’ जहाजावर हल्ला झाला. या एका घटनेमुळे, गेल्या काही वर्षांपासून आखाती क्षेत्रात इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या अघोषित छुप्या युद्धाने आता पेट घेतला आहे. येत्या काळात या दोन्ही देशांमधील हल्ले-प्रतिहल्ल्यांमुळे या क्षेत्रातील तणाव वाढून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते, असा इशारा आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिला आहे.

२०१९ सालापासून पर्शियन आखात, ओमानचे आखात या सागरी क्षेत्रात परदेशी जहाजांवर संशयास्पद हल्ल्यांचे सत्र सुरू झाले आहे. सौदी, युएई तसेच परदेशी इंधन आणि मालवाहू जहाजांवरील हल्ल्यांसाठी इराण जबाबदार असल्याचा आरोप केला जात होता. याशिवाय इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने परदेशी जहाजांचे अपहरण केल्याचेही उघड झाले होते.

अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अणुकरारातून माघार घेतल्यानंतर इराणवर निर्बंध लादले होते. त्यावर प्रतिक्रिया म्हणून इराण परदेशी जहाजांवर हल्ले करीत असल्याचे बोलले जात होते. इराणचे रिव्होल्युशनरी गार्ड्स यापैकी एका हल्ल्यामध्ये सहभागी असल्याचा व्हिडिओही समोर आला होता.

महिन्याभरापूर्वी ओमानच्या आखातात इस्रायलच्या मालवाहू जहाजावर देखील हल्ला झाला. इस्रायलने या हल्ल्यासाठी थेट इराणवर ठपका ठेवला होता. त्यानंतर भूमध्य समुद्रात इराणच्या जहाजांवरही हल्ले होत असल्याची बातमी समोर आली होती. यापैकी काही हल्ल्यांमध्ये इस्रायल सहभागी असल्याचा आरोप अमेरिकेच्या आघाडीच्या वर्तमानपत्राने केला होता.

अशारितीने गेली काही वर्षे इस्रायल आणि इराणमध्ये छुपे युद्ध सुरू होते. या युद्धात आतापर्यंत इंधनवाहू आणि मालवाहू जहाजांना लक्ष्य केले जात होते. पण गेल्या मंगळवारी रेड सीच्या क्षेत्रात इराणच्या जहाजावर हल्ला झाल्यामुळे, या अघोषित युद्धाने पेट घेतल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय विश्‍लेषक देत आहेत.

गेल्या दोन वर्षांमध्ये जहाजांवर हल्ले चढविण्यासाठी ‘लिम्पेट माईन’चा सर्वाधिक वापर झाला. जहाजांच्या दृश्य भागावर ही स्फोटके बसवून हल्ले चढविण्यात आले होते. पण साविझ जहाजाच्या पाण्याखालील भागावर लिम्पेट माईन बसवून स्फोट घडविण्यात आला. यामुळे इराणच्या जहाजाचे मोठे नुकसान झाले असून इंजिन रूममध्ये पाणी शिरले आहे. रेड सी’च्या क्षेत्रात रिव्होल्युशनरी गार्ड्सचा तरंगता तळ असलेल्या साविझ जहाजाचे नुकसान इराणला मोठा हादरा देणारे ठरते.

सदर जहाजाच्या सहाय्याने इराणने सौदी अरेबियाच्या येमेनवरील कारवाईवर बारीक नजर ठेवली होती. याचा लाभ हौथी बंडखोरांना मिळत असल्याचा आरोप सौदी अरेबियाने केला होता. अशा जहाजावर हल्ला चढवून इस्रायलने इराणबरोबरच इराणसमर्थक हौथी बंडखोरांना धक्का दिला आहे. याचा लाभ सौदी अरेबियाला मिळू शकेल.

या घटनेनंतर इराण आणि इस्रायलमधले छुपे युद्ध तीव्र होईल. हल्ले, प्रतिहल्ल्यांचे प्रमाण वाढून आखाती क्षेत्रातील परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाण्याची शक्यता बळावल्याचा इशारा विश्‍लेषक देत आहेत.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info