मॉस्को – रशियन लढाऊ विमानांनी सिरियाच्या पालमिरामध्ये चढविलेल्या हवाई हल्ल्यात किमान २०० दहशतवाद्यांना ठार केले. पुढच्या महिन्यात सिरियामध्ये होणार्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीच्या काळात हल्ले चढविण्याची योजना या दहशतवाद्यांनी आखली होती. म्हणून ही कारवाई करावी लागल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले. त्याचबरोबर अमेरिकी लष्कराचे नियंत्रण असलेल्या भागात दहशतवाद्यांनी तळ ठोकले होते, अशी माहिती रशियन लष्कराने दिली आहे.
सिरियाच्या होम्स प्रांतातील पालमिरा या प्रसिद्ध शहरात दहशतवाद्यांनी दोन अड्डे तयार केल्याची माहिती रशियन गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. रशियाच्या एरोस्पेस फोर्सेसने या माहितीच्या आधारावर सोमवारी दुपारी अल-तन्फ येथील या अड्ड्यांवर भीषण हवाई हल्ले चढविले. यामध्ये दहशतवाद्यांचे मोठी हानी झाली असून किमान २०० दहशतवादी ठार झाल्याची शक्यता रशियन लष्कराने वर्तविली आहे. मशिनगनने सज्ज २४ वाहने व ५०० किलो इतकी स्फोटके देखील नष्ट झाली, असे सिरियातील रशियन लष्कराचे उपप्रमुख रिअर ऍडमिरल अलेक्झांडर कार्पोव्ह यांनी म्हटले आहे.
पुढच्या महिन्यात २६ मे रोजी सिरियामध्ये निवडणूक होणार आहे. २०११ साली अस्साद राजवटीच्या विरोधात पेटलेल्या गृहयुद्धानंतर सिरियामध्ये होणारी ही दुसरी निवडणूक ठरते. सिरियातील काही गटांना ही निवडणूक मान्य नाही. असे असले तरी या निवडणुकीतही राष्ट्राध्यक्ष अस्साद विजयी होणार असल्याचा दावा केला जातो. या पार्श्वभूमीवर, ‘सिरियामध्ये दहशतवादी हल्ले चढवून पुन्हा अस्थैर्य माजविण्याची योजना या दहशतवाद्यांनी आखली होती. यासाठी अल-तन्फच्या कॅम्पमध्ये ‘आयईडी’ स्फोटके बनविण्याचे काम सुरू होते’, असे कार्पोव्ह म्हणाले.
पालमिरातील अल-तन्फ या भागावर सिरियन सरकार किंवा लष्कराचे नियंत्रण नाही. गेल्या काही वर्षांपासून या भागावर अमेरिकेच्या लष्कराचे नियंत्रण आहे. २०१६ साली अमेरिकेच्या लष्कराने सदर भागाचा ताबा घेतला होता. याच भागात दहशतवाद्यांचे अड्डे होते, याकडे रशियन लष्कर लक्ष वेधत आहे. मात्र रशियाच्या हवाई हल्ल्यात ठार झालेले दहशतवादी कुठल्या संघटनेचे होते, ते रशियाने स्पष्ट केलेले नाही.
सिरियामध्ये लष्कर घुसविणार्या अमेरिका व इतर देशांनी सिरियाच्या सार्वभौमत्वाचा आदर करावा आणि सिरियातून सैन्य मागे घ्यावे, असे आवाहन रशियाकडून केले जात आहे. सिरियामध्ये रशियाचे सैन्य तैनात आहे, पण त्यासाठी सिरियन सरकारने रशियाला विनंती केली होती, याकडे रशिया लक्ष वेधत आहे. पण अमेरिका तुर्की व इराणने देखील सिरियातील आपले लष्कर अवैधरित्या तैनात ठेवलेले आहे, असे सांगून रशिया या देशांना लष्कर माघारी घेण्याचे आवाहन करीत आहे. पण या तीनही देशांनी रशियाच्या आवाहनाला दुर्लक्षित केले आहे. तर इस्रायलसारखा देश सिरियातील इराणच्या लष्करी तळ व ठिकाणांवर हवाई हल्ले चढवित असून त्यावरही रशिया नाराजी व्यक्त करीत आहे.
गेल्या नऊ वर्षांपासून सिरियात सुरू असलेल्या संघर्षात तीन लाख ८८ हजाराहून अधिक जणांचा बळी गेल्याचा दावा केला जातो. विस्थापित झालेल्या सिरियन्सची संख्या फार मोठी असल्याचे सांगितले जाते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |