पूर्व युक्रेनमधील डोनेत्स्क प्रांताचा 50 टक्के भाग रशियाच्या नियंत्रणाखाली

- रशियन अधिकाऱ्यांचा दावा

मॉस्को/किव्ह – युक्रेनमधील आघाडीच्या प्रांतांपैकी एक म्हणून ओळखण्यात येणाऱ्या डोनेत्स्क प्रांतातील 50 टक्के भागावर रशियाने नियंत्रण मिळविले असल्याचा दावा रशियन अधिकाऱ्यांनी केला. डोनेत्स्क हा पूर्व युक्रेनमधील डोन्बास क्षेत्राचा हिस्सा असून या क्षेत्रातील लुहान्स्क प्रांतावर रशियाने यापूर्वीच ताबा मिळविला होता. डोनेत्स्क प्रांतातील मोक्याच्या जागांवर ताबा मिळविण्यासाठी प्रखर संघर्ष सुरू असून रशियाने मेरिन्का नावाच्या शहराला वेढा घातल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, झॅपोरिझिआ प्रांतातील मेलिटपोल शहरातील एक महत्वाचा पूल युक्र्रेनने उद्ध्वस्त केल्याचे समोर आले असून यामुळे खेर्सन व क्रिमिआमधील वाहतूक तसेच पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची शक्यता वर्तविली जाते.

50 टक्के

रशिया व युक्रेनच्या फौजांमध्ये सध्या जोरदार संघर्ष सुरू असून डोन्बास क्षेत्र या संघर्षाचे केंद्र बनल्याचे दिसत आहे. रशियन फौजांकडून डोनेत्स्क प्रांतातील मोक्याच्या जागांवर ताबा मिळविण्यासाठी जोरदार मारा सुरू आहे. गेले 48 तासांमध्ये रशियाने केलेल्या माऱ्यात युक्रेनचे जवळपास दीडशे जवान ठार झाल्याची माहिती रशियाने दिली. त्याचवेळी डोनेत्स्क व लुहान्स्कला जोडणाऱ्या महत्त्वाच्या महामार्गावर रशियाने नियंत्रण मिळविले असून बाखमत व मेरिन्का या दोन शहरांना वेढा घालण्यात यश मिळविले आहे.

50 टक्के

डोनेत्स्क प्रांतातील रशियन नेते डेनिस पुशिलिन यांनी, डोनेत्स्कमधील 50 टक्क्यांहून अधिक भाग रशियाच्या नियंत्रणाखाली आला असल्याची माहिती दिली. तर रशियन लष्कर टप्प्याटप्प्याने युक्रेनी फौजांना मागे लोटत असल्याचा दावा चेचेन नेते रमजान कादिरोव्ह यांनी केला.

बाखमत व ॲव्हडिव्हका या दोन शहरांवर रशियाकडून तोफा व रॉकेट्सचा मारा सुरू आहे. मेरिन्का शहरात रशियाने प्रवेश केला असून शहराच्या ताब्यासाठी जबरदस्त लढाई सुरू असल्याचे रशियाने म्हटले आहे.

50 टक्के

दुसऱ्या बाजूला युक्रेनने खेर्सन व झॅपोरिझिआ भागातील रशियन नियंत्रित भागांवर हल्ले करण्याचे सत्र सुरू ठेवले आहे. गेल्या काही दिवसात मेलिटपोल शहराला सातत्याने लक्ष्य करण्यात येत आहे. गेल्याच आठवड्यात या शहरातील रशियन लष्कराच्या बरॅक्सवर हल्ला झाला होता. त्यानंतर आता शहरातील एक महत्त्वाचा पूल उद्ध्वस्त करण्यात युक्रेनला यश मिळाल्याचे सांगण्यात येते. याचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध करण्यात आले आहेत. पुलाचे मोठे नुकसान झाले असून हा पूल खेर्सन व क्रिमिआ या दोन प्रांतांमधील वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जातो. या पुलावर झालेल्या हल्ल्यावर रशियन सोशल मीडियात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

दरम्यान, युक्रेनला नवे लष्करी तसेच अर्थविषयक सहाय्य पुरविण्याचे संकेत पाश्चिमात्य देशांनी दिले आहेत. युरोपिय देशांनी युक्रेनला तब्बल दोन अब्ज युरोच्या अर्थसहाय्याचे आश्वासन दिले आहे. तर अमेरिकेने युक्रेनला हवाईसुरक्षा यंत्रणा देण्यासाठी वेगाने पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. यासंदर्भात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती माध्यमांनी दिली.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info