युक्रेनच्या लष्कराकडून लुहान्स्क व खेर्सन प्रांतात मोठे हल्ले

- राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याकडून रशियाशी चर्चा न करण्याचा वटहुकूम जारी

खेर्सन

किव्ह/मॉस्को – खार्किव्ह व लिमनमधील रशियन सैन्याच्या माघारीनंतर युक्रेनचे लष्कर अधिकच आक्रमक झाल्याचे संकेत मिळाले आहेत. गेल्या 24 तासांमध्ये युक्रेनच्या लष्कराने डोन्बास क्षेत्रासह दक्षिणेकडील खेर्सन तसेच झॅपोरिझिआ प्रांतात जोरदार हल्ले चढविले आहेत. खेर्सनमधील झोलोटा बाल्का शहरासह काही गावे युक्रेनच्या लष्कराने ताब्यात घेतली असून रशियाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी त्याला दुजोरा दिला. रशियाचा संपूर्ण ताबा असलेल्या लुहान्स्कच्या आघाडीवरही युक्रेनचे हल्ले सुरू असून या भागात तीव्र संघर्षाला तोंड फुटल्याची माहिती रशिया समर्थक दलांनी दिली आहे. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी एक वटहुकूम जारी करीत रशियाबरोबरील चर्चेची शक्यता संपुष्टात आल्याचा इशारा दिला.

खेर्सन

गेल्याच आठवड्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमधील चार प्रांतांच्या विलिनीकरणाची घोषणा केली होती. यासंदर्भातील प्रस्तावाला रशियाच्या संसदेनेही मान्यता दिली आहे. या घटनेला 24 तास पूर्ण होत असतानाच युक्रेनने डोनेत्स्क प्रांतातील सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर असलेल्या लिमनमधून रशियन लष्कराला माघार घेण्यास भाग पाडल्याचे वृत्त समोर आले होते. त्यापूर्वी गेल्या महिन्यात रशियाला ईशान्य युक्रेनमधील खार्किव्ह शहरासह प्रांतातून माघार घेणे भाग पडले होते. रशियन लष्कराला एकापाठोपाठ मागे जाण्यास भाग पाडल्यानंतर युक्रेनी लष्कर अधिकच आक्रमक झाल्याचे दिसत आहे.

खेर्सन

रशियाने विलिनीकरण केलेल्या चारही प्रांतांवर युक्रेनच्या लष्कराने हल्ले सुरू केले आहेत. त्यातील खेर्सन प्रांतात युक्रेनी फौजांना यश मिळाल्याचे समोर आले. खेर्सनमधील झोलोटा बाल्का शहरासह दोन गावे ताब्यात घेतल्याचे युक्रेनकडून सांगण्यात आले. खेर्सनमधील रशियाच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. युक्रेनी लष्कर व रशियन फौजांमध्ये डिनिप्रो नदीच्या जवळच्या क्षेत्रांमध्ये संघर्ष सुरू असल्याचे दावे करण्यात आले आहेत.

त्याचवेळी डोन्बास क्षेत्रातील लुहान्स्क व डोनेत्स्क प्रांतातही युक्रेनने मोठे हल्ले सुरू केले आहेत. डोनेत्स्कमध्ये लिमन शहरानंतर पुढील काही भाग युक्रेनी लष्कराच्या ताब्यात आला असून लुहान्स्क प्रांताची सीमा असलेल्या भागात घनघोर संघर्ष चालू आहे. या भागातील रशिया समर्थक दलांनी युक्रेनी लष्कराला मागे लोटण्यात येत असून शेकडो जवान मारल्याचा दावा केला आहे. या तीव्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी चर्चेचे मार्ग बंद करण्याचे संकेत दिले आहेत.

हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info