ऑस्ट्रेलियाच्या चीनविरोधी अपप्रचाराचा संबंधांवर परिणाम होईल – चीनच्या राजदूतांचा इशारा

ऑस्ट्रेलियाच्या चीनविरोधी अपप्रचाराचा संबंधांवर परिणाम होईल – चीनच्या राजदूतांचा इशारा

बीजिंग/कॅनबेरा – युद्धाच्या नगार्‍यांचा ध्वनी स्पष्टपणे कानावर येत आहे, ऑस्ट्रेलियाने युद्धासाठी तयार रहावे, असे सांगून या देशाच्या अंतर्गत सुरक्षा विभागाचे सचिव माईक पेझुलो यांनी चीनचा धोका अधोरेखित केला होता. त्यांचे हे उद्गार चीनला चांगलेच झोंबले आहेत. ऑस्ट्रेलियातील काहीजण वैयक्तीक स्वार्थासाठी चीनपासून धोका असल्याचे खोटेनाटे चित्र उभे करून चीनविरोधात अपप्रचार करीत आहे, अशी टीका चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली. तर ऑस्ट्रेलियातील चीनचे राजदूत चेंग जिन्गाय यांनी चीनवरील या टीकेचा द्विपक्षीय संबंधांवर परिणाम झाल्याखेरीज राहणार नाही, असा इशारा दिला आहे.

माईक पेझुलो यांनी ऑस्ट्रेलियाला चीनच्या आक्रमणाचा सामना करावा लागू शकतो, ही बाब नेमक्या शब्दात मांडली होती. त्यावर ऑस्ट्रेलियात मोठी चर्चा सुरू झाली असून काहीजणांनी त्यांचे हे उद्गार अवास्तव असल्याचा आरोप केला आहे. मात्र काही जबाबदार विश्‍लेषकांनी चीनच्या आक्रमक कारवायांचा दाखला देऊन पेझुलो यांचा इशारा अगदी खरा असल्याचे बजावले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये चीन राजकीय हस्तक्षेप करून त्याचा पुरेपूर लाभ उचलत असल्याचे वारंवार उघड झाले होेते. त्यामुळे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना परकीय हस्तक्षेपाच्या विरोधात कायदे मंजूर करावे लागले. इतकेच नाही तर इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या कारवाया ऑस्ट्रेलियाच्या सुरक्षेसाठी घातक असल्याचे विश्‍लेषक सातत्याने सांगत आहेत. या पार्श्‍वभूमीवर, भारत, अमेरिका व जपान या देशांच्या क्वाड संघटनेत ऑस्ट्रेलिया सक्रीय सहभाग घेतला आहे.

यावर चीनकडून प्रतिक्रिया आली असून चीनने ऑस्ट्रेलियावर व्यापारी निर्बंध टाकले आहेत. तसेच कोरोनाच्या साथीचा चीनमध्ये कशारितीने उगम झाला, याची आंतरराष्ट्रीय चौकशी व्हावी, अशी मागणी ऑस्ट्रेलियाने केली होती. त्यावर चीन संताप व्यक्त करीत आहे. अशा परिस्थितीत पेझुलो यांचे उद्गार चीनच्या संतापात भर टाकत आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी पेझुलो यांची ही विधाने बेजबादार असल्याचा आरोप केला. ऑस्ट्रेलियातील काहीजण राजकीय स्वार्थ साधण्यासाठी चीनला बदनाम करीत आहेत, अशी टीका लिजिआन यांनी केली. अशा बेजबाबदार मंडळींनी शीतयुद्धाच्या काळातील मानसिकतेतून बाहेर पडावे, असा सल्लाही चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिला.

तर चीनला अशारितीने लक्ष्य करणे ऑस्ट्रेलियामध्ये राजकीयदृष्ट्या अचूक ठरू लागले आहे, असा शेरा ऑस्ट्रेलियातील चीनचे राजदूत चेंग जिन्गाय यांनी मारला. चीनने कुणालाही चिथावणी देणार्‍या कारवाया केलेल्या नसताना, अशारितीने चीनकडे धोका म्हणून पाहण्याचे विपरित परिणाम द्विपक्षीय संबंधांवर झाल्यावाचून राहणार नाही, असा इशारा चीनच्या राजदूतांनी दिला आहे. ऑस्ट्रेलिया-चायना बिझनेस कौन्सिलच्या ऑनलाईन कार्यक्रमातच चीनच्या राजदूतांनी हा इशारा दिला. त्यामुळे पेझुलो यांच्या विधानांकडे चीन अत्यंत गंभीरपणे पाहत असल्याचे समोर येत आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info