अमेरिकेने अफगाणिस्तानातील माघारीच्या परिणामांसाठी तयार रहावे – अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन

अमेरिकेने अफगाणिस्तानातील माघारीच्या परिणामांसाठी तयार रहावे – अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन

वॉशिंग्टन/काबुल – ‘अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानातून माघार घेतली की तालिबान या देशाची सत्ता हस्तगत करील. त्यानंतर अफगाणी निर्वासितांची समस्या भयंकर स्वरुप धारण करील. तेव्हा अफगाणिस्तानातील या सैन्यमाघारीच्या भयंकर परिणामांसाठी अमेरिकेने तयार राहिलेले बरे’, असा खरमरीत इशारा माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी दिला आहे. अमेरिकेच्या सैन्यमाघारीची प्रक्रिया सुरू असताना, माजी परराष्ट्रमंत्री क्लिंटन यांनी दिलेला हा इशारा बायडेन प्रशासनाची झोप उडविणारा ठरू शकतो.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी ११ सप्टेंबरपर्यंत संपूर्ण सैन्यमाघारीची घोषणा केल्यानंतरही तालिबानचे त्यावर समाधान झालेले नाही. अमेरिकेच्या सैन्यमाघारीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही गेल्या २४ तासात तालिबानने अफगाणिस्तानात १४१ हल्ले चढविले असून यामध्ये २० जणांचा बळी गेल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे माघार घेत असलेले अमेरिकेचे सैन्य सुरक्षित राहिलेले नाहीत. या सैनिकांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेला नवी तैनाती करावी लागली होती. यामुळे तालिबानचे इरादे जगजाहीर झाले आहेत.

अफगाणी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यातच तालिबानने अफगाणिस्तानात १९० बॉम्ब हल्ले चढविले होते. यामध्ये अफगाणी सुरक्षादलांच्या ४३८ जवानांचा बळी गेला तर पाचशेहून अधिक जखमी झाले. अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर अवघ्या चोवीस तासात तालिबानच्या हल्ल्यांमध्ये झालेली वाढ चिंताजनक असल्याचे अफगाणी माध्यमांचे म्हणणे आहे. माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी देखील अमेरिकी वृत्तवाहिनीशी बोलताना अफगाणिस्तानातील भीषण परिस्थितीबाबत इशारा दिला.

‘अफगाणिस्तान सैन्य तैनात ठेवणे किंवा माघार यावर निर्णय घेणे ही नेहमीच भयंकर समस्या ठरत होती. पण आता याचा निर्णय झाला असून त्याच्या दोन भयंकर परिणामांसाठी अमेरिकेने तयार रहावे’, असे क्लिंटन यांनी बजावले. ‘या सैन्यमाघारीनंतर अफगाणिस्तानच्या वेगवेगळ्या प्रांतात गृहयुद्ध भडकेल. या गृहयुद्धाने अफगाणिस्तानातील सरकार कोसळेल आणि तालिबान या देशाची सत्ता काबीज करील. येथील बहुतांश भागावर तालिबानचे वर्चस्व असेल. याबरोबर निर्वासितांची दुसरी मोठी समस्या देखील ओढावेल’, असे क्लिंटन म्हणाल्या.

तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता ताब्यात घेतल्यानंतर अल कायदा आणि आयएस या दहशतवादी संघटनांच्या हालचाली पुन्हा एकदा तीव्र होतील. तेव्हा या माघारीबरोबर अमेरिकेने याच्या नव्या परिणामांसाठीही तयार रहावे, असे क्लिंटन यांनी बजावले. गेल्या आठवड्यात, अफगाणिस्तानातून सैन्यमाघारीची प्रक्रिया सुरू होण्याच्या काही तास आधी अमेरिकन कॉंग्रेसच्या फॉरिन अफेअर्स कमिटीसमोर बोलतानाही, क्लिंटन आणि अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री कॉंडोलिझा राईस यांनी सदर सैन्यमाघारीच्या निर्णयावर कोरडे ओढले होते. राईस यांनी तर अफगाणिस्तानात पुन्हा सैन्यतैनातीची आवश्यकता निर्माण होईल, असे बजावले होते.

दरम्यान, अफगाणी लष्कराकडून तालिबानच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले जात आहे. गेल्या २४ तासांच्या कारवाईत शंभरहून अधिक तालिबानी दहशतवाद्यांना ठार केल्याची घोषणा अफगाणी संरक्षण मंत्रालयाने केली आहे. असे असले तरी, तालिबानच्या हल्ल्यांमध्ये वाढ होत असून दोन लष्करी तळांवर हल्ले झाल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. या हल्ल्यांमध्ये अमेरिकन लष्कराचे नुकसान झालेले नाही, असे जाहीर करण्यात आले आहे. मात्र या हल्ल्यांद्वारे तालिबानने आपली क्षमता दाखवून दिल्याचे दिसत आहे. त्याचवेळी तालिबानच्या नव्या हल्ल्याची शक्यताही बळावली आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info