काबुल – अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्यमाघार सुरू केली असली तरी दहशतवादविरोधातील कारवाई रोखलेली नाही. अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी हेल्मंड प्रांतात तालिबानच्या ठिकाणांवर जबरदस्त हवाई हल्ले चढविल्याची माहिती अमेरिकी अधिकार्याने दिली. या कारवाईमुळे तालिबानची आगेकूच थांबली आणि अफगाण लष्कराला मोठे सहाय्य मिळाल्याचा दावा केला जातो. पण अफगाणिस्तानच्या इतर भागात तालिबानने आपले हल्ले तीव्र केले आहेत. तालिबानने अफगाणिस्तानातील मोठे धरण ताब्यात घेतले. त्याचबरोबर लोगार प्रांतातील मुलींची शाळा तालिबानने बंद केल्याची बातमी आहे.
गेल्या चोवीस तासात अफगाणी लष्कराने देशाच्या सात प्रांतांमध्ये केलेल्या कारवाईत १७९ तालिबानी दहशतवादी ठार केले. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली. कंदाहर, बदघीस, बलख, फराह, हेल्मंड, तखर आणि कुंदूझ या प्रांतांमध्ये केलेल्या कारवाईत ९१ तालिबानी जखमीही झाले. यापैकी हेल्मंड प्रांतातील कारवाईचा अफगाणी संरक्षण मंत्रालयाने विशेष उल्लेख केला. एकट्या हेल्मंडमधील कारवाईत ४३ तालिबानी ठार झाले आहेत.
अमेरिकेच्या लष्करी अधिकार्याने अमेरिकी वृत्तवाहिनीशी बोलताना देखील हेल्मंड प्रांतातील कारवाईचा उल्लेख केला. हेल्मंडच्या लश्कर गह या भागाचा ताबा घेण्यासाठी तालिबानने अफगाणी लष्करावर हल्ले चढविले होते. लश्कर गह तालिबानच्या ताब्यात जाऊ नये, यासाठी अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी तालिबानवर जोरदार हवाई हल्ले चढविल्याची माहिती संबंधित अमेरिकी अधिकार्याने दिली. काही दिवसांपूर्वी हे हल्ले चढविण्यात आले होते, असे या अधिकार्याने सांगितले.
स्थानिक अफगाणी अधिकारी अतिकुल्लाहने देखील अमेरिकेने जबरदस्त हल्ले चढविल्याचे म्हटले आहे. गेल्या कित्येक वर्षांमध्ये आपण कधीही इतके तीव्र हल्ले पाहिले नसल्याची माहिती अतिकुल्लाह यांनी दिली. अमेरिकेने या हवाई हल्ल्यांसाठी अफगाणिस्तानातील हवाई तळाचा वापर केला का, हे स्पष्ट झालेले नाही. पण पर्शियन आखातात तैनात ‘युएसएस आयसेनहॉवर’ या विमानवाहू युद्धनौकेवरील लढाऊ विमानांनी ही कारवाई केल्याचे दावे काहीजणांनी केले आहेत.
हेल्मंड प्रांतातून पिछेहाट झाली असली तरी गेल्या चोवीस तासात अफगाणिस्तानच्या इतर भागात तालिबानने आपले हल्ले तीव्र केल्याच्या बातम्या येत आहेत. अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील बघलान प्रांतातील दोन जिल्ह्यांचा तालिबानने ताबा घेतला आहे. तर पाकतिका प्रांतातील पोलीस प्रमुखाला ठार केले आहे. तर कंदाहर प्रांतात तालिबानने अफगाणिस्तानातील प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या पत्रकाराची गोळी घालून हत्या केल्याची घटनाही घडली आहे.
याच कंदाहर प्रांतातील ‘दाहला’ धरणावर तालिबानने ताबा मिळविला आहे. दाहला धरण अफगाणिस्तानातील दुसर्या क्रमांकाचे मोठे धरण म्हणून ओळखले जाते. या धरणाचा ताबा घेतल्यामुळे तालिबान अफगाणिस्तान सरकार आणि जनतेला वेठीस धरू शकतो, अशी चिंता स्थानिक अधिकारी व्यक्त करीत आहेत. तर लोगार प्रांतातील मुलींच्या माध्यमिक शाळेला तालिबानने कुलूप ठोकले आहे.
दरम्यान, अमेरिकेच्या माघारीनंतर तालिबान अफगाणिस्तानच्या सत्तेवर आल्यास, या देशातील महिला-मुलींचे अधिकार काढून घेतले जातील, अशी भीती आंतरराष्ट्रीय स्तरातून व्यक्त केली जात होती. लोगार प्रांतातील तालिबानच्या कारवाईनंतर ही भीती प्रत्यक्षात उतरू लागल्याचे दिसत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |