इस्रायलने इराणच्या अणुप्रकल्पावर हल्ल्याचा दिवस निश्‍चित केला

- इस्रायली माध्यमांचा दावा

जेरूसलेम – इराणच्या अणुकार्यक्रमावरील हल्ल्याचा दिवस इस्रायलने निश्‍चित केला आहे. इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी गेल्या आठवड्यातील आपल्या अमेरिकेच्या दौर्‍यात याची माहिती अमेरिकी अधिकार्‍यांनी दिली. इस्रायलच्या हल्ल्याबाबत ही माहिती मिळाल्यानंतरही अमेरिकेने त्याला विरोध केलेला नाही, असा दावा इस्रायली माध्यमे करीत आहे. इराणच्या अणुकार्यक्रमावर वाटाघाटी सुरू असताना प्रसिद्ध झालेली ही बातमी इराणच्या आक्रमकतेत अधिकच भर घालणारी ठरू शकते. भीतीने ग्रासल्यानेच इस्रायल इराणवर हल्ल्याच्या धमक्या देत असल्याचे इराणच्या रिव्होल्युनशनरी गार्डस्च्या वरिष्ठ अधिकार्‍याने म्हटले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून इस्रायल इराणच्या अणुप्रकल्पावर हल्ला चढविण्याच्या घोषणा करीत आहे. इस्रायलच्या संरक्षणदलप्रमुखांनी लष्कराला इराणवर हल्ल्याचा सराव करण्याचे आदेश दिले होते. तर इस्रायलच्या सरकारने देखील अमेरिकेला व्हिएन्ना येथील अणुकराराबाबतची चर्चा सोडून इराणवर लष्करी व आर्थिक कारवाईच्या पर्यायाचा विचार करा, अशी मागणी केली होती. या पार्श्‍वभूमीवर, इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी गेल्या आठवड्यात अमेरिकेचा दौरा करून संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन आणि पररष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांची भेट घेतली.

या भेटीत संरक्षणमंत्री गांत्झ यांनी अमेरिकी अधिकार्‍यांसमोर इराणवरील हल्ल्याचा दिवस निश्‍चित केल्याचे सांगितले. इस्रायलच्या लष्कराला इराणवर हल्ला चढविण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. ही तयारी कधीपर्यंत पूर्ण होईल, याबाबत इस्रायल व अमेरिकेच्या अधिकार्‍यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती इस्रायली माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिली. इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी ही माहिती उघड केल्यानंतर अमेरिकेच्या अधिकार्‍यांनी त्याला विरोध केला नाही, असे वरिष्ठ राजनैतिक सूत्राच्या हवाल्याने इस्रायली वर्तमानपत्राने म्हटले आहे.

व्हिएन्ना येथे इराणबरोबरील अणुकराराची चर्चा सुरू असताना, इस्रायलच्या माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या या बातमीवर इराणमधून प्रतिक्रिया येत आहे. भीतीपोटी इस्रायल अशा पोकळ धमक्या देत असल्याचे, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या लष्कराचे प्रमुख मेजर जनरल अब्दुलरहीम मोसावी यांनी म्हटले आहे. तर इराणवर हल्ल्याचा विचार करणार्‍या इस्रायलला याची फार मोठी किंमत मोजावी लागेल, असे व्हिएन्ना येथील चर्चेत सहभागी झालेले इराणचे प्रतिनिधी अली बाघेरी कानी यांनी धमकावले.

दरम्यान, इस्रायलने इराणच्या अणुप्रकल्पावर हल्ल्याचा दिवस निश्‍चित केल्याच्या बातमीवर पाकिस्तानातून चिंता व्यक्त होत आहे. इस्रायलने इराणवर हल्ला चढविलाच तर अमेरिका इस्रायलला साथ दिल्यावाचून राहणार नाही. अशा परिस्थितीत, पाकिस्तानची कोंडी होऊ शकते. इराण हा पाकिस्तानचा शेजारी देश असल्यामुळे इस्रायल-अमेरिकेच्या या कारवाईपासून पाकिस्तानने दूर रहावे, असे पाकिस्तानी विश्‍लेषक सुचवित आहेत. पण इस्रायलने इराणवर हल्ला चढविलाच तर पाकिस्तान देखील या संघर्षापासून फार काळ दूर राहू शकत नाही. यामुळे तिसरे महायुद्ध भडकेल, अशी भीती पाकिस्तानी पत्रकार व्यक्त करीत आहेत.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info