वॉशिंग्टन – चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने २०१५ सालीच, कोरोनाव्हायरसचा तिसर्या महायुद्धात जैविक शस्त्रासारखा वापर करण्याचे महाभयंकर कारस्थान आखले होते. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने मिळविलेल्या कागदपत्रांमधून हा हादरविणारा गौप्यस्फोट करण्यात आला. ऑस्ट्रेलियातील आघाडीच्या दैनिकाने याची बातमी दिली. बुधवारी ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष जेर बोल्सोनारो यांनीही, कोरोनाव्हायरस म्हणजे चीनच्या जैविक युद्धाचा भाग असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यापूर्वी इस्रायलच्या माजी गुप्तचर अधिकार्यांनी कोरोना हे जैविक शस्त्र असल्याचा दावा केला होता.
२०१५ साली चीनच्या लष्करी संशोधक व आरोग्यतज्ज्ञांनी रिसर्च पेपर प्रसिद्ध केला होता. ‘द अननॅचरल ओरिजिन ऑफ सार्स ऍण्ड न्यू स्पेसीज् ऑफ मॅनमेड व्हायरसेस ऍज जेनेटिक बायोवेपन्स’ असे या पेपरचे शीर्षक होते. यात तिसरे महायुद्ध जैविक शस्त्रांच्या सहाय्याने लढता येईल, असा निष्कर्ष नोंदविण्यात आला होता. ‘सार्स कोरोनाव्हायरस’ प्रकारातील विषाणू हे जनुकीय शस्त्रांच्या नव्या युगाची सुरुवात ठरेल, असा दावा चिनी संशोधकांनी केला होता.
‘कोरोनाव्हायरस प्रकारातील विषाणू कृत्रिमरित्या हाताळून मानवी आजार असल्याचे दाखविता येईल. त्यानंतर त्याचा शस्त्रासारखा वापर करून जगभरात फैलाव करता येईल. अशा जैविक शस्त्राच्या हल्ल्यातून शत्रू देशाची आरोग्यव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्तही करता येऊ शकते’, अशा शब्दात चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने जैविक युद्धाची योजना आखल्याचे उघड झाले आहे. याच डॉक्युमेंटमध्ये जैविक घटकांचा योग्य साठा करून मग ते हवेत फैलावण्याच्या तंत्राचाही उल्लेख करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियातील ‘द ऑस्ट्रेलियन’ या आघाडीच्या दैनिकाने याबाबतची बातमी प्रसिद्ध केली आहे. यात ऑस्ट्रेलियन संशोधकांकडून या विषयावर एक पुस्तक प्रकाशित करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने मिळविलेल्या कागदपत्रांची सत्यता पडताळून पाहण्यात आल्याचा दावाही या बातमीत करण्यात आला आहे.
२०१९ साली कोरोनाव्हायरसची सुरुवात झाल्यापासून चीनची याबाबतची भूमिका संशयास्पद राहिली आहे. आपल्यावर होणारे आरोप टाळण्यासाठी चीनने कोरोनाव्हायरसची माहिती सातत्याने दडपली. तसेच त्याचा उगम इतर देशांमध्ये झाल्याचे बेताल दावेही चीनने केले. कोरोनाच्या साथीबाबत बोलणार्या चिनी संशोधकांची गळचेपी करण्यात आली. तसेच अनेक पत्रकारांनाही गायब करण्यात आले होते. काही संशोधकांनी जीवाच्या भीतीने चीन सोडून दुसर्या देशात आश्रय घेतला होता. या संशोधकांनीही चीनकडून सुरू असलेल्या जैविक शस्त्रांच्या कार्यक्रमाची माहिती उघड केली होती.
दरम्यान, अमेरिकेतील संसद सदस्यांनी, कोरोनाव्हायरस चीनच्या वुहान प्रयोगशाळेतून पसरला, या दाव्याची अमेरिकेने चौकशी करावी तसेच त्यासंदर्भातील सर्व कागदपत्रे संसदेसमोर खुली करावीत, अशी आग्रही मागणी केली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना साथीचा उगम चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतून झाला, असा आरोप केला होता. कोरोनाच्या विषाणूचा उल्लेख डोनाल्ड ट्रम्प ‘वुहान व्हायरस’ असाच करीत होते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |