रशियावर नवे निर्बंध अमेरिकेची घोडचूक ठरेल

- राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा सज्जड इशारा

मॉस्को/वॉशिंग्टन – युक्रेनच्या मुद्यावरून अमेरिकेने रशियावर नवे निर्बंध लादल्यास ती अमेरिकेची घोडचूक ठरेल व त्यामुळे दोन देशांमधील संबंध कायमचे बिघडतील, असा खरमरीत इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिला. तर रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यास अमेरिका व सहकारी देश रशियाला निर्णायक प्रत्युत्तर देतील, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी बजावले आहे. अमेरिका व रशियाचे नेते चर्चा करीत असतानाच अमेरिकी हवाईदलाने रशियानजिकच्या क्षेत्रात ‘स्पाय प्लेन` पाठविल्याची माहिती उघड झाली आहे.

रशियावर नवे निर्बंध

गुरुवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यात फोनवरून 50 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती दोन्ही देशांनी दिली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी बायडेन यांच्याबरोबर थेट फोनवरून चर्चेची मागणी केली होती, असे व्हाईट हाऊसने जाहीर केले होते. या महिन्याच्या सुरुवातीला रशिया व अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांदरम्यान व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून चर्चा झाली होती. यात युक्रेनमधील तणावासह अनेक मुद्यांचा समावेश होता.

या चर्चेनंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी अमेरिकेसह पाश्‍चात्य देशांसमोर ‘सिक्युरिटी पॅक्ट`चा प्रस्ताव देऊन त्याला लवकरात लवकर प्रतिसाद द्यावा अशी मागणीही केली होती. त्यावर अमेरिकेने चर्चेची तयारी दर्शविली होती. युक्रेनच्या मुद्यावर 10 जानेवारी रोजी दोन देशांमध्ये चर्चा होईल, असे वृत्तही प्रसिद्ध झाले होते. त्यापूर्वी दोन राष्ट्राध्यक्षांमध्ये फोनवरून झालेली चर्चा आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधून घेणारी ठरते. फोनवरील चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचा दावा या दोन्ही देशांच्या माध्यमांनी तसेच अधिकाऱ्यांनी देखील केला आहे.

रशियावर नवे निर्बंध

अमेरिकेने युक्रेनच्या मुद्यावर रशियाविरोधात जबर निर्बंध लादले जातील, असा इशारा दिला आहे. यावर रशियन राष्ट्राध्यक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. अमेरिकेने पुन्हा रशियावर निर्बंध लादल्यास ती अमेरिकेची घोडचूक ठरेल व त्याचे परिणाम अमेरिका व रशियामधील संंबंध कायमस्वरुपी बिघडण्यावर होऊ शकतो, असे पुतिन यांनी बजावले. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनीही अमेरिक व नाटोला गंभीर परिणामांचा इशारा दिला. रशियाच्या मागण्यांना अमेरिका व नाटोने प्रतिसाद दिला नाही, तर आपल्याविरोधातील धोका संपविण्यासाठी रशियाला टोकाची पावले उचलावीच लागतील, असे परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी म्हटले आहे.

युक्रेन आणि जॉर्जिया या रशियाच्या प्रभावक्षेत्रातील देशांना नाटोत सहभागी करून घेऊ नये, ही रशियाची प्रमुख मागणी आहे. नाटोचे सदस्य बनल्यास युक्रेन व जॉर्जियामध्ये अमेरिकेची क्षेपणास्त्रे उघडपणे तैनात केली जातील. याचा रशियाच्या सुरक्षेवर थेट परिणाम होईल व कुठल्याही परिस्थितीत रशिया आपल्या सुरक्षेबाबत तडजोड करणार नाही, अशी भूमिका रशियन नेत्यांनी स्वीकारली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास अमेरिकेसह नाटोच्या इतर सदस्यदेशांना याची भयंकर किंमत मोजायला लावू, असे रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषित केले आहे. पण अमेरिका व नाटो रशियाच्या या मागण्या मान्य करण्यास तयार नाही. नाटोचे सदस्य असलेल्या युरोपिय देशांनी अशा मागण्या विजेता देशच करू शकतो, असे सांगून रशियाच्या मागण्या मान्य करता येण्याजोग्या नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info