चीनच्या विमानांच्या घुसखोरीनंतर तैवानने हवाई सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली

चीनच्या विमानांच्या घुसखोरीनंतर तैवानने हवाई सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली

तैपेई – चीनच्या लष्करी विमानांनी सलग दुसर्‍या दिवशी तैवानच्या हवाईहद्दीत घुसखोरी केली. या घुसखोरीला प्रत्युत्तर देण्यासाठी तैवानने हवाई सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करून चीनच्या विमानांना पिटाळून लावले, अशी माहिती तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली. आठवडाभरात चिनी विमानांची तैवानच्या हद्दीतील ही चौथी घुसखोरी ठरते.

तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून चीनच्या ‘पिपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्स’च्या विमानांनी तैवानच्या दक्षिण हवाई हद्दीत घुसखोरी केली. गुरुवारी दुपारी ‘वाय-८’ या पाणबुडीभेदी विमानांनी तर शुक्रवारी याच श्रेणीतील दोन विमानांनी तैवानच्या हवाईहद्दीचा भंग केला होता.

या दोन्ही वेळा तैवानने लढाऊ विमाने रवाना केली होती. तसेच रेडिओद्वारे चीनच्या विमानांना हवाईहद्दीतून निघून जाण्याचा इशारा दिला. तरीही चिनी विमानांची घुसखोरी सुरू राहिल्यानंतर तैवानने हवाई सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली आणि त्यानंतर चिनी विमानांनी माघार घेतली, अशी माहिती तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली.

गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यापासून चीनच्या लढाऊ, टेहळणी आणि लष्करी विमानांनी तैवानच्या हवाईहद्दीत घुसखोरी सुरू ठेवली होती. बायडेन प्रशासनाने अमेरिकेची सत्तासूत्रे हातात घेतल्यापासून चीनच्या या घुसखोरीमध्ये वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात एकाच दिवशी चीनच्या २३ विमानांनी तैवानच्या हद्दीत घुसखोरी केली होती.

चीनपासून तैवानच्या सुरक्षेला असलेला धोका वाढत असल्याचे इशारे आंतरराष्ट्रीय नेते व विश्‍लेषक देत आहेत. येत्या काही वर्षांमध्ये चीन लष्करी कारवाईद्वारे तैवानचा घास गिळेल, असा दावा हे नेते व विश्‍लेषक करीत आहेत. अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडचे तत्कालिन प्रमुख ऍडमिरल फिलिप डेव्हिडसन यांनी देखील काही आठवड्यांपूर्वी अमेरिकन सिनेटच्या समितीसमोर बोलताना, चीन तैवानवर हल्ला चढवू शकतो, असा इशारा दिला होता. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील तशी भीती व्यक्त केली होती.

पण चीनपासून तैवानच्या सुरक्षेला फक्त लष्करीच नाही तर, आर्थिक आणि राजनैतिक आघाडीवरही धोका असल्याचा दावा तैवानचे नेते, अधिकारी व जनता करीत आहेत. चीन तैवानबाबत अपप्रचार, हायब्रिड युद्धतंत्र आणि ग्रे झोन युद्धतंत्राचा वापर करीत असल्याचा आरोप तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वू यांनी गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियन वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला होता.

तैवानच्या सत्ताधारी ‘डेमोक्रॅटिक प्रोगे्रसिव्ह पार्टी’चे वरिष्ठ नेते आणि संसदेतील परराष्ट्र धोरण व राष्ट्रीय सुरक्षा समितीचे उपाध्यक्ष वँग टिंग-यू यांनी देखील चीनबाबत मोठे विधान केले होते. ‘राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना आपल्या नेतृत्त्वाचा मोठेपणा चिनी जनतेसमोर सिद्ध करायचा आहे. त्यासाठी तैवानवर हल्ला चढविणे हा एक पर्याय असू शकतो. चीनकडे मोठे युद्ध छेडण्याची क्षमताही आहे, पण ते युद्ध आपण जिंकू शकतो, असा आत्मविश्‍वास चीनकडे नाही’, असा टोला वँग टिंग-यू यांनी लगावला होता. म्हणूनच तैवानविरोधी युद्ध जिंकण्यासाठी चीन निरनिराळ्या मार्गांचा अवलंब करीत असल्याचे वँग म्हणाले होते.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info