अमेरिका-जपान संरक्षणकरारात अंतराळातील धोक्याचाही समावेश होणार

- अमेरिका-जपानच्या संयुक्त निवेदनात घोषणा

वॉशिंग्टन/टोकिओ – चीनकडून अंतराळात सुरू असणाऱ्या वाढत्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर अंतराळातून होणाऱ्या तसेच अंतराळात होणाऱ्या हल्ल्यांपासून असलेल्या धोक्यांचा अमेरिका व जपानच्या संरक्षणकरारात समावेश करण्यात आला आहे. बुधवारी अमेरिकेत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर याची घोषणा करण्यात आली. जपानचे संरक्षण तसेच परराष्ट्रमंत्री अमेरिकेच्या दौऱ्यावर असून यावेळी झालेल्या बैठकीत अमेरिकेने जपानमधील आपल्या तैनातीत मोठे फेरबदल करण्याचेही जाहीर केले. चीनकडून सुरू असलेल्या आक्रमक कारवायांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात येत असल्याचे अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी सांगितले.

संरक्षणकरारात

इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या आक्रमक लष्करी हालचाली या गेल्या काही महिन्यांपासून चिंतेचा विषय ठरत आहेत. काही आठवड्यांपूर्वी ईस्ट चायना सीच्या क्षेत्रात चीनच्या विनाशिकांनी जपानच्या सेंकाकू आणि ओकिनावा बेटांच्या हद्दीजवळून प्रवास केला होता. गेल्याच महिन्यात चीनच्या नौदलाने जपानच्या सागरी क्षेत्रात युद्धसरावाचे आयोजन केले होते. चीनच्या विमानवाहू युद्धनौकेने जपाननजिकच्या क्षेत्रातून प्रवास केल्याची घटनाही समोर आली होती.

संरक्षणकरारात

ईस्ट व साऊथ चायना सीबरोबरच चीनने तैवानच्या आखातातही दादागिरी वाढविल्याचा आरोप अमेरिका व जपान करीत आहे. गेल्या महिन्यात चीनच्या विनाशिकांनी तैवानच्या आखातात लाईव्ह फायरिंगचा सराव केला होता. तसेच तैवानवर ताबा मिळविण्याचा अभ्यास करून चीनने जाहीररित्या तैवानला धमकावले होते. चीनच्या या लष्करी हालचाली क्षेत्रीय देशांबरोबरच इंडो-पॅसिफिक क्षेत्रात अस्थैर्य निर्माण करीत असल्याचा ठपका अमेरिका व जपानने ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर, जपान सरकारने अधिक आक्रमक धोरण स्वीकारले असून काही दिवसांपूर्वीच ‘नॅशनल सिक्युरिटी स्ट्रॅटेजी’ तसेच मोठ्या संरक्षणखर्चाची घोषणा केली होती.

जपानच्या संरक्षण व परराष्ट्रमंत्र्यांचा अमेरिका दौराही चीनविरोधातील सज्जता अधिक व्यापक करण्याच्या प्रयत्नांचा भाग मानला जातो. याच मुद्यावर जपानचे संरक्षणमंत्री हमादा यासुकाझू व परराष्ट्रमंत्री हयाशी योशिमासा यांनी अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन व परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकारपरिषदेत अमेरिकेने काही महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा केली.

संरक्षणकरारात

त्यात जपानच्या ओकिनावा बेटावर तैनात असलेल्या ‘12 मरिन रेजिमेंट’ची फेररचना करण्यात येणार असून त्याचे रुपांतर ‘12 मरिन लिटोरल रेजिमेंट’मध्ये करण्यात येणार आहे. नव्या रेजिमेंटकडे जहाजविरोधी क्षेपणास्त्रांचा मारा करण्याच्या क्षमतेसह ‘ॲडव्हान्स्ड् इंटेलिजन्स’ व प्रगत टेहळणी यंत्रणा असेल, अशी माहिती अमेरिकी अधिकाऱ्यांनी दिली. ही रेजिमेंट चीनच्या धोक्याविरोधात ‘फॉरवर्ड फोर्स’ म्हणून कार्य करील, असे संकेतही देण्यात आले आहेत. त्याचवेळी अमेरिका ईस्ट चायना सीमधील टेहळणीसाठी ‘एमक्यू-9 रिपर ड्रोन्स’ तैनात करणार आहे.

अमेरिका व जपानमध्ये गेल्या शतकात झालेल्या संरक्षण करारात यापुढे अंतराळक्षेत्रातील धोक्यांचाही समावेश करण्यात येणार आहे. यासंदर्भातील करारावर येत्या काही दिवसांमध्ये स्वाक्षऱ्या करण्यात येतील, अशी माहिती अमेरिका व जपान या दोन्ही देशांच्या सूत्रांनी दिली. यापूर्वी 2019 साली द्विपक्षीय संरक्षण करारात सायबरक्षेत्र व सायबरहल्ल्यांच्या समावेश करण्यात आला होता. त्यानंतर आता चीनच्या अंतराळातील वाढत्या कारवाया लक्षात घेऊन या क्षेत्रातील धोक्याचाही समावेश करण्यात येत असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी सांगितले.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info