अफगाणी लष्कराच्या कारवाईत २४ तासात अडीचशे तालिबानी ठार – अफगाणी संरक्षण मंत्रालयाची माहिती

अफगाणी लष्कराच्या कारवाईत २४ तासात अडीचशे तालिबानी ठार – अफगाणी संरक्षण मंत्रालयाची माहिती

काबुल/वॉशिंग्टन – अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील मुलींच्या शाळेजवळ दहशतवाद्यांनी घडविलेल्या बॉम्बस्फोटात १५ जणांचा बळी गेला. तर अफगाण लष्कर आणि तालिबानमध्ये गेल्या चोवीस तासात पेटलेल्या आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या संघर्षात २५० तालिबानी ठार झाले. यात १६ अफगाणी जवानांचा बळी गेला आहे. या कारवाईत तालिबानचा मोठा कमांडर मारल्याची घोषणा अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने केली. तसेच तालिबानविरोधी संघर्षात स्थानिकांनी देखील शस्त्रे हाती घेतल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

रक्तपात घडवून अफगाणिस्तानची सत्ता काबीज करण्याचा तालिबानचा हेतू नाही, असे दोहा येथील चर्चेत सहभागी झालेला तालिबानचा वरिष्ठ कमांडर शेर मोहम्मद अब्बास स्तानिकझाई याने म्हटले आहे. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, स्वीडन, नॉर्वे आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रतिनिधींबरोबर शनिवारी झालेल्या व्हर्च्युअल बैठकीत स्तानिकझाई याने ही गोष्ट स्पष्ट केली. पण अफगाणिस्तानमध्ये इस्लामी राजवट प्रस्थापित करणे आवश्यक आहे. राष्ट्राध्यक्ष गनी यांच्यासोबत आघाडी सरकार स्थापन करून ते शक्य होणार नसल्याचे सांगून स्तानिकझाई याने अफगाण सरकारशी वाटाघाटी शक्य नसल्याचे पुन्हा एकदा सांगितले.

तालिबानच्या कमांडरने महिला-मुलींनाही समान अधिकार दिले जातील, असे आश्‍वासन या बैठकीत दिले आहे. पण या बैठकीला काही तास उलटत नाही तोच शनिवारी राजधानी काबुलमधील सईद अल-शुहादा या मुलींच्या शाळेजवळ मोठा स्फोट झाला. या बॉम्बस्फोटात १५ जणांचा बळी गेला तर २० जण जखमी झाल्याची माहिती अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने दिली. या हल्ल्याची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. पण या हल्ल्यासाठी तालिबान जबाबदार असल्याचा दावा अफगाणी माध्यमे करीत आहेत.

अफगाणिस्तानच्या लष्कराने गेल्या चोवीस तासात नांगरहार, लघमान, गझनी, कंदाहर, उरूझ्गन, हेरात, फराह, हेल्मंड आणि बाघलान या प्रांतात केलेल्या कारवाईत २५० तालिबानी ठार केले. या हल्ल्यात १०६ जण जखमी झाल्याची माहिती अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली. त्याचबरोबर बाघलान प्रांतातील दहाना-ए-घौरी जिल्हा तालिबानच्या ताब्यातून सोडविण्यात अफगाणी लष्कराला यश मिळाले आहे.

बाघलान येथील कारवाईत ३१ तालिबानी ठार झाले असून यामध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांचाही समावेश असल्याचे अफगाणी संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले. बाघलान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबानच्या विरोधातील कारवाईसाठी आणि अफगाणी लष्कराला सहाय्य म्हणून स्थानिकांनी देखील शस्त्रे हाती घेतली आहेत. त्यामुळे येत्या काळात अफगाणिस्तानातील तालिबानविरोधी संघर्ष तीव्र होण्याची शक्यता वाढली आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानातून आपल्या जवानांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अमेरिकेने अतिरिक्त विमाने रवाना केली आहेत. यामध्ये ‘एफ-१८’ लढाऊ विमानांचा समावेश आहे. तर अमेरिकेचे वरिष्ठ सिनेटर मिश मॅक्कॉनेल यांनी अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीवर चिंता व्यक्त केली आहे. या वर्षअखेरीपर्यंत तालिबान अफगाणिस्तानचा ताबा घेतील, असे मॅक्कॉनेल म्हणाले. तर अमेरिकेने अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीचा वेग कमी करावा, असे आवाहन युरोपिय देशांनी केले आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info