चीनच्या ‘रिअल इस्टेट’ क्षेत्रातील संकटाचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तीव्र पडसाद

अर्थव्यवस्थेला धक्का बसण्याची भीती

‘रिअल इस्टेट’

बीजिंग/वॉशिंग्टन – चीनच्या ‘रिअल इस्टेट’ क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या ‘एव्हरग्रॅन्ड’चे शेअर्स १० टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. या कंपनीपाठोपाठ चीनच्या रिअल इस्टेट तसेच बॅकिंग क्षेत्राच्या शेअर्समध्ये होणार्‍या घसरणीचे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीय शेअरबाजारांमध्ये उमटले असून, अमेरिकेतील आघाडीचा ‘डो जोन्स निर्देशांक’ ५०० हून अधिक अंकांनी घसरला आहे. अमेरिकेबरोबरच युरोप तसेच आशियातील शेअरबाजारांनाही मोठा फटका बसला आहे. ‘एव्हरग्रॅन्ड’च्या घसरणीचा धक्का चीनमधील इतर क्षेत्रांबरोबरच जागतिक अर्थव्यवस्थेलाही बसू शकतो, अशी भीती विश्‍लेषकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेच्या ‘द स्ट्रीट’ या वेबसाईटने ‘एव्हरग्रॅन्ड’चे संकट चीनसाठी ‘लेहमन मुमेन्ट’ ठरु शकते, असे बजावले आहे.

गेल्या काही आठवड्यात चीनच्या मालमत्ता व बांधकाम क्षेत्रातील आघाडीची कंपनी असणारी ‘एव्हरग्रॅन्ड’ सातत्याने अडचणीत येत आहे. परदेशी वित्तसंस्थांनी या कंपनीचे रेटिंग कमी केले असून चीनमधील बँकांनीही कंपनीला नवे कर्ज देण्यात हात आखडता घेतल्याचे सांगण्यात येते. या कंपनीवर तब्बल ३०५ अब्ज डॉलर्सची कर्जे असून ती फेडण्यास कंपनी सक्षम नसल्याचे दावे करण्यात येत आहेत. या आठवड्यात कंपनीला सुमारे १५ कोटी डॉलर्सच्या कर्जरोख्यांची देणी चुकती करायची आहेत. मात्र त्यासाठी कंपनीकडे पैसे नसल्याचे वृत्त समोर आल्याने सोमवारी कंपनीचे शेअर तब्बल १० टक्क्यांनी घसरले.

‘रिअल इस्टेट’

‘एव्हरग्रॅन्ड’च्या शेअर्सचे मूल्य ११ वर्षातील नीचांकावर पोहोचले असून गेल्या आठ महिन्यात कंपनीचे मूल्य तब्बल ८५ टक्क्यांनी खाली आले आहे. याचा फटका चीनच्या रिअल इस्टेट, बॅकिंग, ऊर्जा तसेच विमा क्षेत्रातील कंपन्यांना बसला आहे. हॉंगकॉंगमधील शेअर निर्देशांक तब्बल ३.३ टक्क्यांनी घसरला असून गेल्या काही महिन्यातील सर्वात मोठी घसरण ठरली आहे. या घसरणीमुळे चीनमधील ‘सिनिक होल्डिंग्ज् ग्रुप’ या आघाडीच्या रिअल इस्टेट कंपनीला तब्बल एक अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

‘रिअल इस्टेट’

चीनच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील संकटाचे पडसाद जागतिक स्तरावरही उमटण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिका तसेच युरोपातील शेअर निर्देशांकांमध्ये मोठी घसरण झाली आहे. अमेरिकेतील आघाडीचा ‘डो जोन्स’ निर्देशांक ५०० अंकांहून अधिक खाली आला आहे. ब्रिटन, फ्रान्स, जर्मनीतील शेअर निर्देशांकांना दीड ते तीन टक्क्यांचा फटका बसला आहे. चीनमधील रिअल इस्टेट क्षेत्रात आलेल्या संकटाचे अमेरिकेतील पोलाद कंपन्यां तसेच युरोपातील बँकिंग क्षेत्रात पडसाद उमटतील, असे संकेत विश्‍लेषकांनी दिले आहेत.

‘अलायन्स बर्नस्टेन’ या वित्त क्षेत्रातील कंपनीच्या प्रमुख अधिकारी जेनी झेंग यांनी ‘एव्हरग्रॅन्ड’च्या घसरणीचा फटका चीनच्या रिअल इस्टेट क्षेत्रासह इतर क्षेत्रांनाही बसू शकतो, असे बजावले आहे. गेल्या काही महिन्यात चीनच्या अर्थव्यवस्थेला सातत्याने धक्के बसत असून ‘एव्हरग्रॅन्ड’चे संकट या धक्क्यांची तीव्रता वाढवू शकते, असा इशाराही झेंग यांनी दिला.

अमेरिकेच्या ‘द स्ट्रीट’ या वेबसाईटने ‘एव्हरग्रॅन्ड’च्या संकटाची तुलना अमेरिकेतील ‘लेहमन ब्रदर्स’च्या अपयशाशी केली आहे. अमेरिकेच्या गुंतवणूक क्षेत्रातील ही आघाडीची कंपनी ’सबप्राईम क्रायसिस’मुळे दिवाळखोरीत गेली होती. ही दिवाळखोरी २००८-०९ साली आलेल्या मंदीचे प्रमुख कारण ठरले होते.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info