- एका रात्रीत गाझावर हजार तोफगोळे दागले
- हमास, इस्लामिक जिहादचे १०० हून अधिक दहशतवादी ठार
- हमासचा ऍश्खेलॉन इंधनप्रकल्पावर ड्रोनद्वारे हल्ला
- लेबेनॉनच्या सीमेतून निदर्शकांनी घुसखोरी केल्याचा दावा
- जॉर्डनमधील निदर्शकांकडूनही वेस्ट बँकमध्ये घुसखोरीचा प्रयत्न
- जर्मनीच्या चॅन्सेलर मर्केल यांची इस्रायलविरोधी निदर्शनांवर टीका
जेरूसलेम – इस्रायल आणि हमास यांच्यातील सुरू असलेला संघर्ष अधिकाधिक भीषण स्वरुप धारण करू लागला आहे. गाझातील हमास व ‘इस्लामिक जिहाद’ने इस्रायलवर तब्बल १८०० हून अधिक रॉकेट्स व क्षेपणास्त्रांचा मारा केला. तर इस्रायलने गाझातील ६५० ठिकाणांवर हवाई हल्ले चढवून त्याला प्रत्युत्तर दिले. इस्रायलच्या हल्ल्यात ११९ पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. यामध्ये हमास व इस्लामिक जिहादचे शंभराहून अधिक दहशतवाद्यांचा समावेश असल्याचा दावा इस्रायली संरक्षणदलाने केला आहे.
इस्रायल व हमासमध्ये सुरू असलेला हा रक्तपात थांबविण्यासाठी मध्यस्थी करणारे इजिप्तचे अधिकारी इस्रायलच्या तेल अविवमध्ये दाखल झाले. पण त्यांच्या तीन दिवसांच्या प्रयत्नांना अपयश आल्याने इजिप्तचे हे अधिकारी मायदेशी परतले आहेत. त्यामुळे इस्रायल व हमास यापैकी कुणीही माघार घ्यायला तयार नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. प्रत्येक दिवसागणिक या संघर्षाची तीव्रता अधिकाधिक वाढत चालली आहे. त्यामुळे आता हा संघर्ष राहिलेला नसून इस्रायल व पॅलेस्टिनी संघटनांमध्ये युद्धालाच तोंड फुटल्याची भीती आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त केली जात आहे.
गेल्या चोवीस तासात इस्रायलने गाझावरील हल्ल्यांची तीव्रता वाढविली आहे. सीमेवर तैनात इस्रायलच्या तोफा आणि रणगाड्यांनी गाझावर हजाराहून अधिक तोफगोळे डागल्याची माहिती इस्रायली लष्कराने दिली. गाझापट्टीच्या उत्तर आणि पूर्वेकडील भागांमध्ये तैनात हमास व इस्लामिक जिहादच्या रॉकेट लॉंचर्सच्या ठिकाणांना लक्ष्य केल्याचा दावा इस्रायली लष्कर करीत आहे.
आपल्या कारवाईत काही पॅलेस्टिनी नागरिकांचा बळी गेल्याचे इस्रायली लष्कराने मान्य केले. पण हल्ल्याआधीच इस्रायलने पॅलेस्टिनींना सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्याचे आवाहन केले होते. मात्र हमास व इस्लामिक जिहादने पॅलेस्टिनींना अडवून ठेवल्यामुळे आपल्या कारवाईत निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे. हमास व इस्लामिक जिहादचे दहशतवादी पॅलेस्टिनी जनतेचा मानवी ढाल म्हणून वापर करीत असल्याचा आरोप इस्रायलने याआधी अनेकवार केला होता. त्यामुळे हमास व इस्लामिक जिहादवर हल्ला चढविल्यानंतर, त्यात पॅलेस्टिनी नागरिकांचा बळी जातो. त्याचा वापर आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्रायलविरोधातील प्रचारासाठी करण्याच्या भयंकर कट हमासने आखल्याचे इस्रायलचे राजनैतिक अधिकारी सांगत आहेत.
हमास व इस्लामिक जिहादने इस्रायलच्या तेल अविव, ऍश्खेलॉन, अश्दोद या प्रत्येक शहरावर शंभराहून अधिक रॉकेट्सचे हल्ले सुरू ठेवले आहेत. हमासने ऍश्खेलॉन येथील इस्रायलच्या अतिमहत्त्वाच्या इंधनप्रकल्पावर ड्रोन हल्ला चढवून मोठे नुकसान केले आहे. याचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले आहेत. याशिवाय गाझाजवळच्या निर ओझ या शहरातील रासायनिक प्रकल्पावर देखील ड्रोन हल्ला केल्याचा दावा हमासच्या ‘अल-कासम ब्रिगेड’ने केला आहे. पण इस्रायली लष्कराने हमासच्या या दाव्याला पुष्टी दिलेली नाही. काही तासांपूर्वी हमासने इस्रायलच्या दिमोना अणुप्रकल्पाजवळील भागात १५ रॉकेट डागले होते.
सध्या लेबेनॉन, जॉर्डन, तुर्की, इराण या देशांमध्ये इस्रायलविरोधात व पॅलेस्टिनींच्या बाजूने जोरदार निदर्शने सुरू झाली आहेत. लेबेनॉन व जॉर्डनमध्ये आक्रमक झालेल्या निदर्शकांनी सीमारेषा ओलांडण्याचा प्रयत्न करून पाहिला. लेबेनीज निदर्शकांनी इस्रायलच्या सीमेत घुसखोरी केली होती. तसेच सीमेजवळ जाळपोळ केल्याचे वृत्त आहे. पण इस्रायली लष्कराने वेळीच कारवाई करून या निदर्शकांना पुन्हा लेबेनॉनमध्ये पिटाळले. तर सीमेवर तैनात जॉर्डनच्या लष्कराने या निदर्शकांना चोप देऊन माघारी पाठविल्याच्या बातम्या आहेत.
दरम्यान, जर्मनीत ज्यूद्वेषातून केली जाणारी निदर्शने खपवून घेणार नाही, असे जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी स्पष्ट केले. तसेच इस्रायलवर रॉकेट्सचा मारा म्हणजे हमासचे दहशतवादी हल्लेच असल्याची टीका मर्केल यांनी केली. तर फ्रान्सने देखील इस्रायलला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच फ्रान्सने आपल्या देशात इस्रायलच्या विरोधातील निदर्शनांवर बंदी टाकली आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |