जेरूसलेम – ‘अमेरिकेच्या साथीने किंवा अमेरिकेच्या सहकार्याखेरीज, इस्रायल इराणला अण्वस्त्रसज्ज होण्यापासून रोखल्यावाचून राहणार नाही. कारण अण्वस्त्रसज्ज इराण हा इस्रायलच्या अस्तित्त्वासाठी धोकादायक ठरेल’, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी पुन्हा एकदा दिला. त्याचबरोबर ‘इस्रायलचे अस्तित्व मान्य केल्याशिवाय या क्षेत्रात शांती प्रस्थापित होऊ शकत नाही, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी केलेले विधान पूर्णपणे योग्य आहे’, असे पंतप्रधान नेत्यान्याहू पुढे म्हणाले. अमेरिका अणुकरार करीत असलेल्या इराणने इस्रायलचे अस्तित्त्व कधीही स्वीकारले नव्हते. त्यामुळे बायडेन यांनी केलेले दावे व त्यांच्या धोरणातील विरोधाभास इस्रायली पंतप्रधानांनी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांबरोबरील पत्रकार परिषदेत नेमक्या शब्दात मांडला.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन मंगळवारी इस्रायलमध्ये दाखल झाले. इस्रायल आणि हमासमध्ये लागू झालेल्या संघर्षबंदीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचेफ़ परराष्ट्रमंत्री इस्रायल व पॅलेस्टाईनच्या दौर्यावर आले आहेत. परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांची भेट घेतली. ‘इस्रायलला स्वसंरक्षणाचा पूर्ण अधिकार आहे व अमेरिका इस्रायलच्या पाठिशी आहे. अमेरिकेने पॅलेस्टिनींसाठी आर्थिक सहाय्य घोषित केले असले तरी ते हमासच्या हाती पडणार नाही, याची काळजी घेतली जाईल’, अशी ग्वाही अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिली. तसेच व्हिएन्ना येथे इराणबरोबर सुरू असलेल्या अणुकरारावरील वाटाघाटींबाबतही इस्रायलच्या पंतप्रधानांशी चर्चा झाल्याचे ब्लिंकन म्हणाले.
तर इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी अमेरिकेने दिलेल्या या पाठिंब्याचे स्वागत केले. मात्र येत्या काळात हमासने संघर्षबंदी मोडून पुन्हा रॉकेट हल्ले सुरू केले तर त्याला अधिक जोरदार उत्तर मिळेल, असे नेत्यान्याहू यांनी बजावले. हमास पुन्हा शस्त्रसज्ज होऊ नये, यासाठी इस्रायल अमेरिकेबरोबर सहकार्य करणार असल्याची माहिती पंतप्रधान नेत्यान्याहू यांनीी दिली. इराणच्या मुद्यावर बोलताना इस्रायलच्या पंतप्रधानांनी अधिक आक्रमक सूर लावला.
‘2015 साली झालेल्या अणुकराराची अमेरिका पुनरावृत्ती करणार नाही, अशी अपेक्षा आहे. कारण तो करार, इराणच्या अण्वस्त्रसज्जतेला आंतरराष्ट्रीय मान्यता देणारा होता. पण व्हिएन्ना येथील चर्चेत काहीही झाले, तरी इस्रायलला त्याची पर्वा नाही. कारण अमेरिकेच्या साथीने किंवा अमेरिकेच्या सहकार्याखेरीज, अशा कुठल्याही स्थितीत इस्रायल इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नाही. कारण अण्वस्त्रसज्ज इराण हा इस्रायलच्या अस्तित्वासाठी धोकादायक ठरेल’, असे नेत्यान्याहू म्हणाले.
त्याचबरोबर इस्रायल आणि अरब-इस्लामी देशांमध्ये सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेने इस्रायलला सहाय्य करावे, असे आवाहन पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी केले. तसेच ‘इस्रायलचे अस्तित्व मान्य केल्याशिवाय या क्षेत्रात शांती प्रस्थापित होऊच शकत नाही’, राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी केलेल्या विधानाची आठवण इस्रायलच्या पंतप्रधानांनी करून दिली. हा मुद्दा या क्षेत्रातील शांततेची किल्ली ठरेल, असे नेत्यान्याहू यांनी ठासून सांगितले.
दरम्यान, बायडेन यांचे प्रशासन ज्या देशाबरोबर अणुकरार करण्यासाठी उत्सुक आहेत, त्या इराणनेच आत्तापर्यंत इस्रायलचे अस्तित्व मान्य केलेले नाही. उलट इराण आजही इस्रायलच्या विनाशाच्या तसेच इस्रायलला जगाच्या नकाशावरुन पुसून टाकण्याच्या धमक्या देत आहे. इस्रायलवर हजारो रॉकेट्सचे हल्ले चढविणार्या हमासला इराणनेच शस्त्रसज्ज केले होते. यापुढेही हमासला लष्करी सहाय्य करण्याचे इराणने जाहीर केले आहे.
अशा परिस्थितीत इस्रायलला मान्यता दिल्याखेरीज या क्षेत्रात शांतता प्रस्थापित होणार नाही, असे दावे करणारे बायडेन, इस्रायलचे अस्तित्त्व संपविण्याच्या धमक्या देणार्या इराणशी सहकार्य करीत आहेत, हा फार मोठा विरोधाभास ठरतो. त्यावर इस्रायली पंतप्रधानांनी बोट ठेवल्याचे दिसत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |