रशियाने युक्रेनवर घातक शस्त्रास्त्रांचे हल्ले सुरू केले

- युक्रेन तसेच ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाचा आरोप

मॉस्को/किव्ह – रशियाने युक्रेनवर अतिशय घातक शस्त्रास्त्रांचे प्रहार सुरू केले आहेत. रशिया आपल्या ताफ्यातील जहाजभेदी क्षेपणास्त्रे ‘केएच-22′ युक्रेनच्या भूभागातील लक्ष्य टिपण्यासाठी वापरत आहे, असा आरोप युक्रेनने तसेच ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने केला. रशिया युक्रेनवरील हल्ले तीव्र करीत असताना, आपल्या देशाला अधिक शस्त्रास्त्रांची गरज असल्याचे आवाहन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी पाश्चिमात्य देशांना म्हटले आहे. पण पाश्चिमात्यांची शस्त्रे मिळाली, तरी कच खात असलेले युक्रेनचे लष्कर रशियन सैन्याची मुंसडी रोखण्याची फारशी शक्यता नसल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.

युक्रेनच्या डोंबास प्रांतात रशियन सैन्य वर्चस्व गाजवित आहे. या क्षेत्रात रशियन सैन्याच्या माऱ्यामुळे युक्रेनला दिवसाकाठी सुमारे दोनशे जवान गमवावे लागत आहे. मारिओपोल शहरानंतर रशियाने सेव्हेरोडोनेत्स्क हे शहर देखील युक्रेनी लष्कराकडून हिरावून घेतले. आता स्लोव्हिआन्स्कवर रशियन सैन्याने हल्ले सुरू केले आहेत. युक्रेनचे लष्कर रशियन सैन्याला फार मोठा प्रतिकार करीत असल्याचे दावे केले जात आहेत खरे. पण प्रत्यक्षात युक्रेनच्या लष्कराचा रशियन सैन्यासमोर निभाव लागत नसून इथली परिस्थिती युक्रेनी लष्करासाठी अधिकाधिक बिकट बनत चालली आहे. अशा परिस्थितीत युक्रेन व ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने रशियावर नव्या आरोपाचे सत्र सुरू केले.

रशिया युक्रेनच्या भूभागावरील लक्ष्य टिपण्यासाठी युद्धनौकाभेदी क्षेपणास्त्र ‘केएच-22’चा मारा करीत असल्याचा आरोप ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने केला. युक्रेनने देखील रशिया या क्षेपणास्त्रासह इतर घातक शस्त्रांद्वारे आपल्यावर हल्ले चढवित असल्याचे म्हटले आहे. अशा परिस्थितीत रशियाचा मुकाबला करण्यासाठी युक्रेनला अधिक प्रभावी शस्त्रास्त्रांची गरज असल्याचे आवाहन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केले. याआधी अमेरिका व युरोपिय देशांनी युक्रेनला अत्याधुनिक शस्त्रे पुरविण्याचे मान्य केले होते. पण रशियावर हल्ले चढविता येईल, इतकी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे युक्रेनला पुरविली जाणार नाहीत, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी स्पष्ट केले होते.

या मर्यादेचा अपवाद वगळता, युक्रेनसाठी अब्जावधी डॉलर्सची शस्त्रास्त्रे पुरविण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. पण काही झाले तरी युक्रेनला ही शस्त्रे मिळू देणार नाही, असे रशियाने बजावले आहे. त्यामुळे पाश्चिमात्यांची शस्त्रे युक्रेनपर्यंत पोहोचली, तरी युक्रेनचे लष्कर त्याचा वापर करण्याच्या स्थितीत असू शकेल का, हा नवा प्रश्न समोर येत आहे.

दरम्यान, युक्रेनचे युद्ध थांबविण्यासाठी पाश्चिमात्यांशी चर्चा करण्यासाठी रशिया तयार आहे, पण पाश्चिमात्य रशियाला प्रतिसाद द्यायला तयार नाही, असे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी म्हटले आहे. दोघांनी मिळूनच टँगो नृत्य करता येते, पण पाश्चिमात्य एकट्याने ब्रेक डान्स करीत आहेत, असे सांगून पाश्चिमात्यांना चर्चेद्वारे ही समस्या सोडविण्यात स्वारस्य नसल्याची जाणीव परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी करून दिली.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info