जेरूसलेम – ‘गाझातील हमासबरोबरच्या संघर्षात इस्रायलच्या लष्कराने आर्टिफिशल इंटेलिजन्स-एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सुपरकॉम्प्युटिंगचा वापर केला. हमासच्या हजारो रॉकेट्सच्या विरोधात इस्रायलच्या लष्कराने लढलेले हे पहिले एआय युद्ध होते व हे तंत्रज्ञान इस्रायली लष्कराच्या सामर्थ्यात गुणात्मक वाढ करणारे ठरले’, अशी घोषणा इस्रायलच्या लष्करी अधिकार्यांनी केली. त्याचबरोबर संघर्षबंदी जाहीर झाली असली तरी ती फार काळ टिकणार नाही व यापुढील संघर्षासाठी इस्रायल पूर्णपणे तयार असल्याचा इशाराही या लष्करी अधिकार्यांनी दिला.
11 दिवसांच्या घनघोर संघर्षात हमासला मोठे हादरे दिल्याचा दावा इस्रायली लष्कर करीत आहे. या संघर्षात हमासचे वरिष्ठ नेते, कमांडर्स मोठ्या संख्येने ठार झाले. यापैकी काही नेते व कमांडर्सची जागा घेणारे दुसरे कमांडर्स हमासकडे नसल्याचे बोलले जाते. त्याचबरोबर हमासने गाझात उभारलेले भुयारीमार्गांचे नेटवर्क आणि नौदलाचे तळ बर्याच प्रमाणात नष्ट केल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले होते. हमास व इस्लामिक जिहादचे दहशतवादी दरदिवशी शेकडोंनी रॉकेट्स डागत असताना, इस्रायलच्या लष्कराला मिळालेल्या यशाचे श्रेय एआयवर आधारीत तंत्रज्ञानला जाते, अशी माहिती लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्यांनी स्थानिक माध्यमांना दिली.
‘इस्रायली लष्करासाठी एआयवर आधारलेली ही पहिलीच मोहीम होती. यामुळे हमास आणि इस्लामिक जिहादचे नेते, वरिष्ठ कमांडर्स व दहशतवादी लपलेल्या ठिकाणी अचूक हल्ले चढविणे तसेच या दहशतवादी संघटनांची ठिकाणे नष्ट करणे सोपे गेले’, असे इस्रायली लष्कराच्या अधिकार्यांनी स्पष्ट केले. यासाठी या अधिकार्यांनी एआयचा वापर करून हमासचा वरिष्ठ नेता बासेम इस्सा व इस्लामिक जिहादचा वरिष्ठ कमांडर हसन अबू हरबिद याच्यावर केलेल्या कारवाईचा दाखला दिला.
इस्रायलचे हवाई हल्ले सुरू असताना, हमासचा नेता इस्सा हा भुयारीमार्गामध्ये आपल्या साथीदारासह लपलेला होता. सहा शाळा आणि रुग्णालयाने वेढलेल्या या भुयारीमार्गात बरोबर इस्सा लपलेल्या ठिकाणीच इस्रायलने हल्ले केले. यामध्ये इस्सा व त्याच्यासोबत असलेला हमासच्या सायबर व क्षेपणास्त्र कमांडचा प्रमुख व इतर दहशतवादी ठार झाले. तर नागरी इमारतीत, आपल्या मित्राच्या घरी पण स्वतंत्र खोलीत बसलेल्या हरबिदवर देखील एआयच्या सहाय्याने हल्ला चढविण्यात आला. या हल्ल्यात फक्त हरबिद ठार झाला, पण त्या घराचे नुकसान झाले नाही. या दोन्ही कारवाईत दहशतवादी वगळता पॅलेस्टिनी नागरिकांची हानी झाली नाही, असे दावे इस्रायली अधिकार्यांनी केले आहेत.
याशिवाय इतर कारवाईत एआयचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याचे इस्रायली लष्कराच्या अधिकार्यांनी उघड केले. पण हमासबरोबरच्या या संघर्षात उतरण्याच्या आधी इस्रायली लष्कराने सलग दोन वर्षे गाझापट्टी, हमास व इतर दहशतवादी संघटनांची ठिकाणे, भुयारीमार्ग याची सखोल माहिती मिळविलेली होती. यामध्ये ‘सिग्नल इंटेलिजन्स’, ‘व्हिज्युअल इंटेलिजन्स’, ‘जिऑग्राफिकल इंटेलिजन्स’ व हेरखात्याची माहिती आणि इतर गोष्टींचाही समावेश होता.
याच्या आधारावर इस्रायली लष्कराच्या विशेष गुप्तचर विभागाने ‘एलकेमिस्ट’, ‘गॉस्पेल’, आणि ‘डेप्थ ऑफ विस्डम’ असे प्रोग्राम्स तयार केले होते. या प्रोग्राम्स तसेच ‘एआय’चा वापर हमासविरोधी युद्धामध्ये करण्यात आला. गॉस्पेलने एआयच्या माहितीचा वापर करून इस्रायली हवाईदलाला हमासच्या ठिकाणांची ताजी माहिती पुरविली. यामुळे तेल अविव व जेरूसलेमवरील बरेचसे हल्ले टाळता आले. तर एलकेमिस्टने एआयच्या साथीने पुरविलेल्या माहितीमुळे, इस्रायली लष्कर व अतिसंवेदनशील ठिकाणांवरील हमासच्या हल्ल्यांची माहिती फार आधीच मिळणे सोपे झाले. यामुळे लष्कराचे मोठे नुकसान टळले, अशी माहिती इस्रायली लष्कराच्या अधिकार्यांनी दिली.
दरम्यान, जगभरातील आघाडीचे देश एआयवर आधारीत ड्रोन्स, विमाने, जहाजे, लष्करी वाहने, रणगाडे, रोबोट्सची निर्मिती करू लागल्याच्या तर काही देश एआय नियंत्रित शस्त्रांची चाचणी घेत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी काही वर्षांपूर्वी ‘एआय’ अर्थात आर्टिफिशल इंटेलिजन्समध्ये सर्वाधिक प्रगती करणारा देश जगावर राज्य करील, असे विधाने केले होते.
अशा अतिप्रगत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील आपण खूप पुढे आहोत, हे इस्रायलने दाखवून दिले आहे. 11 दिवसाच्या संघर्षात आपण इस्रायलवर मात केल्याचे दावे करून हमास व इस्लामिक जिहाद या संघटना गाझामध्ये विजय साजरा करीत आहेत. 11 दिवसांचा संघर्ष म्हणजे हमासने छेडलेले युद्ध नव्हतेच, तर तो युद्धाचा सराव होता, आमची क्षमता याहूनही कितीतरी अधिक आहे, असे दावे हमासने ठोकले होते. जगभरातील इस्रायलद्वेष्टे देखील यावर समाधान व्यक्त करीत आहेत. अशा परिस्थितीत इस्रायलच्या लष्करी अधिकार्यांनी एआयबाबत दिलेली माहिती सर्वांना चकीत करणारी ठरते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |