जगभरात तैनात असलेल्या अण्वस्त्रांच्या संख्येत वाढ – स्वीडिश अभ्यासगट ‘सिप्री’चा अहवाल

जगभरात तैनात असलेल्या अण्वस्त्रांच्या संख्येत वाढ – स्वीडिश अभ्यासगट ‘सिप्री’चा अहवाल

अण्वस्त्रांच्या संख्येत वाढस्टॉकहोम – जगभरातील नऊ अण्वस्त्रसज्ज देशांकडून तैनात करण्यात आलेल्या अण्वस्त्रांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’(सिप्री) या अभ्यासगटाने दिली. सोमवारी ‘सिप्री’ने ‘आर्मामेंट्स, डिसआर्मामेंट अ‍ॅण्ड इंटरनॅशनल सिक्युरिटी’ नावाचा अहवाल प्रकाशित केला. या अहवालानुसार, 2021 सालाच्या सुरुवातीला जगभरात तैनात असलेल्या अण्वस्त्रांची संख्या 3,825 वर गेली आहे. गेल्या वर्षी ही संख्या 3,720 इतकी होती. अमेरिका व रशियाने आपल्या अण्वस्त्रांपैकी जवळपास 2,000 अण्वस्त्रे ‘हाय ऑपरेशनल अ‍ॅलर्ट’ स्थितीत ठेवल्याची माहितीही ‘सिप्री’च्या अहवालात नोंदविण्यात आली आहे.

अण्वस्त्रांच्या संख्येत वाढ

जगभरात सध्या नऊ देश अण्वस्त्रसज्ज असून, त्यात अमेरिका व रशियासह ब्रिटन, फ्रान्स, चीन, भारत, इस्रायल, पाकिस्तान व उत्तर कोरियाचा समावेश आहे. या नऊ देशांकडे जानेवारी 2021मध्ये 13,080 अण्वस्त्रे असल्याचे ‘सिप्री’ने म्हटले आहे. रशियाकडे सर्वाधिक 6,375 अण्वस्त्रे असून अमेरिकेकडील अण्वस्त्रांची संख्या 5,800 इतकी आहे. अमेरिका व रशिया त्यांच्यातील करारानुसार, दरवर्षी अण्वस्त्रांची संख्या कमी करीत असले तरी तैनात करण्यात आलेल्या अण्वस्त्रांच्या संख्येत भर पडते आहे, याकडे ‘सिप्री’ने लक्ष वेधले.

अण्वस्त्रांच्या संख्येत वाढ

अमेरिका व रशियापाठोपाठ चीनकडे सर्वाधिक म्हणजे 350 अण्वस्त्रे असल्याचे स्वीडिश अभ्यासगटाने म्हटले आहे. मात्र चीनने तैनात केलेल्या अण्वस्त्रांची संख्या उघड करण्यात आलेली नाही. त्याचवेळी चीन आपल्या अण्वस्त्रांच्या साठ्यात वेगाने वाढ करीत असून आधुनिकीकरणाची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती ‘सिप्री’च्या या अहवालात देण्यात आलेली आहे. चीनबरोबरच ब्रिटननेही आपल्या अण्वस्त्रांच्या संख्येत वाढ करण्याचे तसेच आधुनिकीकरणाचे संकेत दिले आहेत. ब्रिटनकडे सध्या 225 अण्वस्त्रे असून नव्या धोरणानुसार, त्यांची संख्या 260पर्यंत नेण्यात येणार आहे.

भारत, पाकिस्तान तसेच उत्तर कोरिया हे देशही अण्वस्त्रांच्या साठ्यात भर टाकण्याच्या हालचाली करीत असल्याचे ‘सिप्री’ने आपल्या अहवालात नमूद केले आहे. उत्तर कोरियाकडे सध्या 40 ते 50च्या दरम्यान अण्वस्त्रे असल्याचे सांगण्यात येते. गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या अहवालात ‘सिप्री’ने उत्तर कोरियाने 10 नवी अण्वस्त्रे तयार केल्याचा दावा केला होता.

शीतयुद्धाच्या काळानंतर गेल्या काही वर्षांमध्ये अण्वस्त्रांची संख्या घटविण्याचे दावे केले जात होते. मात्र नव्या माहितीनुसार, अण्वस्त्रांची संख्या वाढविण्याकडे देशांचा कल दिसत असून ही चिंतेची बाब ठरते, असे ‘सिप्री’चे वरिष्ठ अधिकारी हॅन्स एम. क्रिस्टनसन यांनी बजावले आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info