आफ्रिकेत दहशतवादाचा वणवा पेटला आहे – अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांचा इशारा

मोरोक्को – आफ्रिकेतील ‘साहेल’ क्षेत्रापासून ते ‘हॉर्न ऑफ आफ्रिका’ म्हणून ओळखण्यात येणार्‍या भागापर्यंत दहशतवादाचा वणवा पेटला आहे, असा गंभीर इशारा अमेरिकेच्या आफ्रिका कमांडचे प्रमुख जनरल स्टीफन जे. टाऊनसेंड यांनी दिला आहे. अल कायदा, आयएस व अल शबाबसारख्या दहशतवादी संघटना सातत्याने हल्ले करीत असून आंतरराष्ट्रीय समुदायाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे, असेही जनरल टाऊनसेंड यांनी बजावले.
दहशतवादाचा वणवा
‘आफ्रिकन क्षेत्रातील सुरक्षेबाबत मला तीव्र चिंता वाटते. साहेल क्षेत्रापासून ते हॉर्न ऑफ आफ्रिका भागापर्यंत सर्व ठिकाणी दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ होत आहे. अल कायदा, आयएस व अल शबाबसारख्या दहशतवादी संघटना एकापाठोपाठ हल्ले चढवित आपला प्रभाव बळकट करीत पुढे चालल्या आहेत. आफ्रिका खंडाच्या या भागात दहशतवादाचा वणवा पेटला आहे’, असा इशारा जनरल टाऊनसेंड यांनी दिला. आफ्रिकेतील दहशतवाद रोखण्यासाठी या खंडातील देश परस्परांना सहाय्य करीत असले, तरी हे प्रयत्न पुरेसे नसल्याचेही अमेरिकी अधिकार्‍यांनी बजावले.
दहशतवादाचा वणवा
गेल्या काही वर्षात ‘साहेल रिजन’ व ‘हॉर्न ऑफ आफ्रिका’ म्हणून ओळखण्यात येणार्‍या भागात दहशतवादी संघटनांच्या कारवाया मोठ्या प्रमाणात वाढल्या असून, आफ्रिकी देश त्याचा मुकाबला करण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. या देशांमध्ये माली, नायजर, बुर्किना फासो, चाड, नायजेरिया, सोमालिया, केनिया या देशांचा समावेश आहे. अल शबाब व बोको हराम या दहशतवादी संघटनांबरोबरच अल कायदा व आयएसही आफ्रिकेत आपला प्रभाव वाढवित असल्याचे समोर येत आहे.
मालीसह ‘साहेल रिजन’मधील दहशतवाद कमी करण्यासाठी फ्रान्सने या भागात आपले पाच हजार जवान तैनात केले होते. आफ्रिकी देशांसह ‘ऑपरेशन बर्खाने’ नावाची स्वतंत्र मोहीमही आखण्यात आली होती. मात्र २०१३ सालापासून सुरू असणार्‍या या मोहिमेला अद्यापही अपेक्षित यश मिळालेले नाही. त्याचवेळी दुसर्‍या बाजूला सोमलियात ‘आफ्रिकन युनियन’ व अमेरिकेकडून दहशतवादाविरोधात मोहीम सुरू आहे. पण ड्रोन हल्ले व मोठ्या कारवायांनंतरही दहशतवादी संघटना अधिक प्रबळ होत असल्याचे चित्र समोर आले आहे. या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेच्या ‘आफ्रिका कमांड’च्या प्रमुखांनी दहशतवादी कारवायांची तुलना वणव्याशी करणे लक्ष वेधून घेणारे ठरत आहे.

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info