इस्रायलने लेझरद्वारे ड्रोन्स भेदले – गाझाजवळ लेझर तैनात करण्याचे इस्रायलचे संकेत

लेझर तैनात

तेल अविव – गेल्या महिन्यात इस्रायलने हमासवर केलेली कारवाई जगातील पहिले ‘एआय युद्ध’ होते, अशी माहिती इस्रायली अधिकार्‍यांनी गेल्या महिन्यात दिली होती. हमासबरोबरचा हा संघर्ष इस्रायलच्या मोहिमेचा पहिला टप्पा होता आणि परिस्थिती बिघडली तर येत्या काळात संघर्षाचा पुढचा टप्पा सुरू होऊ शकतो, असा इशारा इस्रायलच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍याने दिला होता. यामुळे इस्रायलच्या प्रगत लष्करी तंत्रज्ञानाची ओळख जगाला झाली होती. त्यातच इस्रायलने विमानात बसविलेल्या लेझरने ड्रोन्स भेदण्याची चाचणी घेतल्याचे जाहीर केले आहे. अशी क्षमता असणारा इस्रायल पहिला देश असू शकतो, असा दावा इस्रायली अधिकारी करीत आहे. तसेच गाझाजवळ लेझर तैनात करण्याबाबत विचार सुरू असल्याचे इस्रायली अधिकार्‍याने म्हटले आहे.

लेझर तैनात

इस्रायलच्या वायुसेनेतील ‘यानत’ मिसाईल टेस्ट युनिट, तसेच ‘डायरेक्टोरेट ऑफ डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ आणि संरक्षणसाहित्यांची निर्मिती करणार्‍या ‘एल्बिट सिस्टिम्स’ या कंपनीने लेझरची चाचणी घेतली. गेल्या आठवड्यात घेतलेल्या या चाचणीचा व्हिडिओ इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने सोमवारी प्रसिद्ध केला. एल्बिट सिस्टिमने तयार केलेली लेझर यंत्रणा ‘सेसना’ या प्रवासी विमानामध्ये बसवून तिचा वापर इस्रायलच्या सागरी क्षेत्रावरुन गस्त घालणार्‍या वेगवेगळ्या ड्रोन्सवर करण्यात आला.

सुमारे १०० किलोवॅट क्षमतेच्या ऊर्जेचा मारा करणार्‍या या लेझरच्या हल्ल्यात सर्व ड्रोन्स नष्ट झाले. इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये लेझरने ड्रोन्समध्ये छिद्र केल्याचे व काही सेकंदातच पेट घेतल्याचे दिसत आहे. सदर लेझर यंत्रणा ड्रोन्सबरोबर इतर हवाई लक्ष्य देखील भेदू शकते, असे इस्रायली संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. किमान २० किलोमीटर अंतरावरील लक्ष्य भेदण्याची क्षमता या लेझरमध्ये असल्याचे इस्रायलच्या संशोधन आणि विकास मंत्रालयाचे अधिकारी ब्रिगेडिअर जनरल यानिव रोतेम यांनी सांगितले. ड्रोन्सचा माग काढून ही लेझर यंत्रणा अवघ्या काही सेकंदात ते नष्ट करू शकते, असे ब्रिगेडिअर जनरल रोतेम म्हणाले.

लेझर तैनात

‘या चाचणीद्वारे इस्रायलने तंत्रज्ञान क्षेत्रात ऐतिहासिक यश मिळविले आहे. आमच्या माहितीप्रमाणे, अशी चाचणी घेणारा इस्रायल पहिला देश असू शकतो. किंवा इस्रायल असे तंत्रज्ञान असलेल्या काही मोजक्या देशांपैकी एक असेल’, असा दावा रोतेम यांनी केला. त्याचबरोबर या लेझरचा वापर गाझाजवळच्या भागात करण्यावर इस्रायलचे संरक्षण मंत्रालय विचार करीत असल्याची माहिती ब्रिगेडिअर जनरल रोतेम यांनी दिली.

याशिवाय लष्करी वाहनावर लेझर तैनात करण्यावरही इस्रायलचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. पण वादळी हवामानात जमिनीवरुन हवेत लेझरचा मारा कमी प्रभावी ठरतो. या तुलनेत विमानात तैनात केलेले लेझर जास्त प्रभावी ठरतात, असा दावा केला जातो. त्यामुळे इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने घेतलेल्या या चाचणीचे महत्त्व वाढले आहे.

दरम्यान, सदर यंत्रणा गाझाजवळ तैनात करण्याबाबत इस्रायलच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांनी दिलेली माहिती गाझातील हमास व इतर दहशतवादी संघटनांना धडकी भरविणारी ठरू शकते. या यंत्रणेमुळे इस्रायलला गाझातील दहशतवादी ठिकाणांवर नेमके हल्ले चढविणे अधिक सोपे जाऊ शकते.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info