इस्रायल व अमेरिका देखील इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखू शकत नाहीत – इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी

तेहरान – ‘इराणला अण्वस्त्रांमध्ये रस नाही. पण जर इराणने अण्वस्त्रसज्ज व्हायचे ठरवले तर इस्रायल व इस्रायलपेक्षा सामर्थ्यशाली देशही इराणला रोखू शकत नाहीत’, अशी घोषणा इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांनी केली. त्याचबरोबर कुणाच्याही दबावाखाली इराण आपला अणुकार्यक्रम बंद करणार नसून युरेनियमचे संवर्धन ६० टक्क्यांपर्यंत नेण्यात येईल, असे खामेनी यांनी ठासून सांगितले. खामेनी यांच्याकडे इराणचे सर्वाधिकार आहेत. त्यामुळे त्यांनी केलेली घोषणा २०१५ साली झालेल्या अणुकराराचे आणखी एक उल्लंघन ठरते.

गेल्या आठवड्यात अमेरिकेने इराणबरोबर २०१५ सालचा अणुकरार पुनर्जिवित करण्याची तयारी व्यक्त केली होती. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी अमेरिकेच्या या घोषणवर आक्षेप घेतला होता. तसेच काहीही झाले तरी इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नसल्याचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी जाहीर केले होते. यावर इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला अली खामेनी यांनी सोशल मीडियातून दिलेल्या प्रत्युत्तरामध्ये इस्रायल व अमेरिकेवर निशाणा साधला.

‘आपल्या देशाच्या गरजा लक्षात घेता इराण आण्विक क्षमता प्राप्त करण्यासाठी दृढ आहे. म्हणूनच इराणचे युरेनियम संवर्धन २० टक्क्यांपर्यंत मर्यादित राहू शकत नाही. आवश्यक असेल तर इराण युरेनियमचे संवर्धन ६० टक्क्यांपर्यंतही नेईल. पण याचा अर्थ इराणला अण्वस्त्रसज्ज व्हायचे आहे, असा होत नाही. ज्यांच्याकडे अण्वस्त्रे आहेत, त्या अमेरिकेने या अण्वस्त्रांचा वापर करून जवळपास दोन लाख वीस हजार जणांचा बळी घेतला’, अशी टीका खामेनी यांनी केली. तसेच अणुकार्यक्रमाचा वेग अधिक तीव्र करण्याचे ठणकावले.

या व्यतिरिक्त, ‘इस्रायल म्हणे इराणला अणुबॉम्बची निर्मिती करू देणार नाही. सर्वप्रथम इराणने अण्वस्त्रनिर्मिती करण्याचे निश्‍चित केले तर इस्रायल आणि त्याहून अधिक सामर्थ्यशाली देश देखील इराणला अडवू शकत नाही’, असे खामेनी यांनी जाहीर केले. इराणने सध्या युरेनियमचे संवर्धन २० टक्क्यांपर्यंत नेले आहे. नागरी वापरासाठी अणुकार्यक्रमाचा वापर करणार्‍या इराणला एवढ्या मोठ्या प्रमाणात युरेनियमचे संवर्धन करण्याची आवश्यकताच काय? असा सवाल इस्रायलचे लष्करी अधिकारी विचारत आहेत.

त्याचबरोबर निर्बंधित अणुप्रकल्पात सेंट्रिफ्यूजेसची जोडणी सुरू करून पाच वर्षांपूर्वीच्या अणुकराराचे मोठे उल्लंघन केले आहे. त्यामुळे इराण अण्वस्त्रनिर्मितीच्या प्रयत्नात असल्याचा आरोप इस्रायल करीत आहे. या व्यतिरिक्त इराणने आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या निरिक्षकांना निर्बंधित अणुप्रकल्पांना भेट देण्यावरही बंदी टाकल्याची बातमी इराणच्या वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केली आहे. इराणची ही कारवाई अण्वस्त्रप्रसारबंदी कराराचे उल्लंघन असल्याची टीकाही होत आहे.

दरम्यान, इराणबरोबर अणुकरार करण्यासाठी अमेरिकेने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी इराणवरील निर्बंध काढून टाकण्याची तयारी केल्याचे दावेही केले जातात. अशा परिस्थितीत इराणच्या सर्वोच्च नेत्यांनी केलेली घोषणा महत्त्वाची ठरते.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info