हेग – दहशतवादी संघटनांनी 2020 मध्ये फैलावलेल्या कोरोना साथीचा फायदा उचलून द्वेषपूर्ण प्रचार करीत भीती व अविश्वासाचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न केले, असा दावा ‘युरोपोल’च्या अहवालात करण्यात आला आहे. कोरोनाची साथ रोखण्यासाठी लागू केलेला लॉकडाऊन व इतर उपाययोजनांमुळे निर्माण झालेल्या नाराजीचा वापर करण्याचा प्रयत्न दहशतवादी संघटना व त्याच्याशी निगडीत सदस्यांनी केला, असेही युरोपोलच्या अहवालात सांगण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात युरोपात 10 हून अधिक दहशतवादी हल्ले झाले असून त्यात 21 जणांचा बळी गेला होता.
युरोपिय महासंघाचे पोलीसदल म्हणून ओळखण्यात येणार्या ‘युरोपोल’ने मंगळवारी ‘टेररिझम सिच्युएशन अॅण्ड ट्रेंड रिपोर्ट’ प्रसिद्ध केला. यात कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी संघटना व कट्टरपंथिय त्यांच्या प्रभाव वाढविण्यासाठी कसे प्रयत्न करीत होते, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. साथीच्या काळात डिजिटल तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावाचा फायदा कट्टरपंथियांनीही उचलला व ऑनलाईन माध्यमांमधून द्वेष तसेच हिंसक विचारसरणीचा मोठ्या प्रमाणात प्रचार केला, असे ‘युरोपोल’च्या प्रमुख कॅथरीन डे बोल यांनी बजावले.
गेल्या काही वर्षात युरोपिय देशांमध्ये होणार्या राजकीय स्थित्यंतरांचा उल्लेख अहवालात करण्यात आला असून, त्यामुळे समाजात ध्रुवीकरण सुरू असल्याची जाणीव या अहवालाने करुन दिली आहे. दहशतवादी संघटनांनी समाजातील या धु्रवीकरणारचा गैरफायदा घेत हिंसक विचारसरणीच्या बळावर समाजातील वातावरण बिघडविले, असा आरोप ‘युरोपोल’ने केला. कट्टरपंथिय व दहशतवाद्यांनी आपल्या विचारसणीचा प्रसार करण्यासाठी समाजातील असंतोषाचा वापर केला आणि त्यासाठी खोट्या माहितीचा वापर केला, असा दावा ‘टेररिझम सिच्युएशन अॅण्ड ट्रेंड रिपोर्ट’मध्ये करण्यात आला आहे.
युरोपोलच्या अहवालात गेल्या वर्षभरात युरोपात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचीही माहिती देण्यात आली आहे. गेल्या वर्षी युरोपात 11 दहशतवादी हल्ले झाले असून त्यात 21 जणांचा बळी गेला होता. बहुतांश हल्ले ‘लोन वुल्फ’ प्रकारातील होते, याकडे अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे. युरोपियन यंत्रणांनी 40हून अधिक दहशतवादी हल्ले व कट उधळून लावले आणि 400 हून अधिक संशयितांना ताब्यात घेतल्याचेही सांगण्यात आले. दहशतवादी हल्ल्यांमागे ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे आढळल्याचा उल्लेखही अहवालात करण्यात आला आहे.
इटलीत डाव्या विचारसरणीच्या व अराजकवादी संघटनांच्या सदस्यांनी केलेल्या 24 हल्ल्यांची नोंद झाल्याचे ‘युरोपोल’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |