वॉशिंग्टन – ‘इस्रायलच्या सुरक्षेबाबतची अमेरिकेची बांधिलकी पोलादासारखी मजबूत आहे. मी सत्तेवर असेपर्यंत इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नाही’, असे आश्वासन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिले. इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष रिव्हलिन यांची व्हाईट हाऊस येथे घेतलेल्या भेटीत राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी ही घोषणा केली. त्याचबरोबर अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले चढविणार्या इराण संलग्न दहशतवाद्यांवर इराक व सिरियात हल्ले चढविण्याचे आदेश आपणच दिले होते, अशी माहिती बायडेन यांनी यावेळी दिली.
पाच महिन्यांपूर्वी बायडेन यांनी अमेरिकेची सूत्रे हातात घेतल्यापासून अमेरिका आणि इस्रायलमध्ये मतभेद निर्माण झाले होते. बायडेन इराणबाबत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचेच राबवित असून हे प्रशासन ओबामा २.० असल्याची टीका सुरू झाली होती. इस्रायलचे नवे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी अमेरिका व इस्रायलमध्ये चर्चेचे नवे पर्व सुरू होऊ शकते, असे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर, काही तासांपूर्वी इटलीमध्ये अमेरिका व इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक पार पडली. तर सोमवारी इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष रिव्हलिन यांनी व्हाईट हाऊस येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची भेट घेतली. या दोन्ही भेटींमध्ये इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नसल्याचे आश्वासन अमेरिकेने इस्रायलला दिले.
लवकरच इस्रायलचे पंतप्रधान बेनेट यांची आपण व्हाईट हाऊसमध्ये भेट घेणार असल्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून बायडेन प्रशासनाने इराणबाबतचे धोरण कठोर बनल्याचे संकेत दिले आहेत. इराणमध्ये रईसी हे जहालमतवादी नेते राष्ट्राध्यक्षपदावर येत असून त्यांनी इराणचा अणुकार्यक्रम अधिक आक्रमकपणे पुढे नेण्याची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेच्या इराणविषयक धोरणात बदल झाल्याचे दिसत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |