तालिबान ताजिकिस्तानच्या सीमेवर आत्मघाती दहशतवादी तैनात करणार – रशियाकडून ताजिकिस्तान, तालिबानला संघर्ष टाळण्याचे आवाहन

काबुल/मॉस्को – ‘अफगाणिस्तानच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी लवकरच या ठिकाणी आत्मघाती हल्लेखोर तैनात केले जातील. प्रामुख्याने अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील ताजिकिस्तानच्या सीमेजवळील बडाखशान भागात आत्मघाती हल्लेखोर मोठ्या संख्येने तैनात असतील’, अशी घोषणा तालिबानने केली. तालिबानला मान्यता नाकारणार्‍या ताजिकिस्तानला धडा शिकविण्यासाठी ही तैनाती असल्याचा दावा केला जातो. ताजिकिस्तानने देखील हा धोका ओळखून सीमेवरील तैनाती वाढविली आहे. यावर रशियाने चिंता व्यक्त केली असून ताजिकिस्तान आणि तालिबानला संघर्ष टाळण्याचे आवाहन केले आहे.

आत्मघाती

काबुलमध्ये तालिबानची राजवट आल्यानंतर भूमिगत झालेल्या अफगाणिस्तानच्या आधीच्या सरकारचा भाग असलेल्या काही नेत्यांनी निर्वासित सरकार चालविण्याची तयारी केली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह हे या निर्वासित सरकारचे प्रमुख असतील, असे या अफगाणी नेत्यांनी स्वित्झर्लंडमधील अफगाणी दूतावासाद्वारे घोषित केले. सालेह यांच्या नेतृत्वाखाली निर्वासित सरकारची स्थापना म्हणजे तालिबानच्या राजवटीला आव्हान असल्याचा दावा विश्‍लेषकांनी केला होता.

तालिबानने निर्वासितांचे हे सरकार बेकायदेशीर असल्याचे सांगून त्यांना फारसे महत्त्व देत नसल्याचे म्हटले होते. पण या निर्वासित सरकारची घोषणा झाल्यापासून तालिबानची अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळे सालेह आणि इतर अफगाणी नेत्यांना आश्रय देणार्‍या ताजिकिस्तानला धडा शिकविण्याची धमकी तालिबानने दिली होती. यासाठी तालिबानने ताजिकिस्तानच्या सीमेवर दहशतवादी तैनात केल्याचे समोर येत आहे.

आत्मघाती

अफगाणिस्तानच्या ईशान्येकडील बडाखशान प्रांताचा उप गव्हर्नर मुल्ला निसार अहमद अहमदी याने या तैनातीबाबत सांगताना मोठी माहिती उघड केली. तालिबानकडे आत्मघाती हल्लेखोरांचे बटालियन असल्याचे अहमदीने म्हटले आहे. या आत्मघाती दहशतवाद्यांना अफगाणिस्तानच्या सर्व सीमांवर तैनात करणार असून ताजिकिस्तानजवळील बडाखशानच्या सीमेवर त्यांची तैनाती अधिक प्रमाणात असेल, असे अहमदी म्हणाला. तालिबानमधील ‘लश्कर-ए-मन्सूरी’ अर्थात ‘मन्सूर आर्मी’ या दहशतवादी गटाचे हे आत्मघाती बटालिन आहे. याच आत्मघाती हल्लेखोरांमुळे अमेरिकेचा अफगाणिस्तानात पराभव शक्य झाल्याचा दावा अहमदी याने केला.

अफगाणिस्तानच्या शेजारी देशांच्या सीमेवर आत्मघाती दहशतवाद्यांना तैनात करण्याची तालिबानची घोषणा भुवया उंचावणारी आहे. तालिबानने दहशतवाद सोडून दिल्याचे दावे त्यांचे समर्थक करीत आहेत. अशा कट्टरवादी गटांना आपल्यापासून वेगळे केल्याचा दावा तालिबानने केला होता. पण ‘मन्सूर आर्मी’ व ‘बद्री ३१३’ हे गट अजूनही तालिबानचाच भाग असल्याचे समोर येत आहे. अशा आत्मघाती हल्ले चढविण्यासाठी बदनाम असलेल्या गटांमधील दहशतवाद्यांची सीमेच्या सुरक्षेसाठी तालिबानने केलेली तैनाती, हा आंतरराष्ट्रीय समुदायाच्या चिंतेचा विषय ठरू शकतो.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info