वॉशिंग्टन – आपल्या लष्करी आक्रमकतेने इंडो-पसिफिक क्षेत्रात तणाव निर्माण करणार्या चीनने अण्वस्त्रवाहू आंतरखंडीय क्षेपणास्त्रांच्या तैनातीसाठी ११९ सायलो उभारल्याचे गेल्या आठवड्यात उघड झाले. चीनच्या या आण्विक हालचाली चिंताजनक असून यामुळे कम्युनिस्ट पक्षाच्या हेतूवर शंका उपस्थित होत असल्याचे ताशेरे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने ओढले. चीनच्या कम्युनिस्ट राजवटीच्या मुखपत्राकडून यावर प्रतिक्रिया उमटली आहे. ‘तैवानच्या मुद्यावरुन लष्करी संघर्ष पेटलाच तर हीच अण्वस्त्रे अमेरिकेला रोखण्याचे काम करतील. त्यामुळे अमेरिकेने कितीही हातपाय आपटले तरी चीनने आपली अण्वस्त्रसज्जता सोडू नये’, असा इशारा चीनच्या सरकारी मुखपत्राने दिला आहे.
गेल्या आठवड्यात चीनने गान्सू प्रांताच्या युमेन भागात अण्वस्त्रवाहू आंतरखंडीय क्षेपणास्त्रांच्या तैनातीसाठी ११९ सायलो उभारल्याची माहिती समोर आली. अमेरिकेच्या ‘जेम्स मार्टिन सेंटर फॉर नॉनप्रोलिफरेशन स्टडिज्’ या अभ्यासगटाने याचे सॅटेलाईट फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले. यामध्ये अमेरिकेपर्यंत मारा करण्याची क्षमता असलेल्या डीएफ-४१ क्षेपणास्त्रांचा समावेश होता, असे सदर अभ्यासगटाने म्हटले होते. या आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची तैनाती करून चीन आपल्या विरोधकांना धमकावत असल्याची टीका अमेरिकेच्या आघाडीच्या वर्तमानपत्राने केली होती. पुढच्या काही तासात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यक्रमात बोलताना आपल्या विरोधकांना धमकावले होते.
चीनच्या या तैनाती व धमकीवर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने चिंता व्यक्त केली. ‘चीनने अण्वस्त्रवाहू आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची वाढविलेली हालचाल अतिशय चिंताजनक असून यामुळे चीनच्या हेतूवर शंका उपस्थित होत आहे. हा आण्विक धोका कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे महत्त्व अधिकच वाढले आहे’, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने बजावले. त्याचबरोबर चीनची अण्वस्त्रसज्जता गृहित धरली होती, त्यापेक्षा अधिक वेगाने आणि संख्येने वाढत आहे, अशी चिंता अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी व्यक्त केली.
काही दिवसांपूर्वी सिप्री या अभ्यासगटाने चीनकडे ३५० अण्वस्त्रे असल्याचे आपल्या अहवालात म्हटले होते. पण अपारदर्शकतेसाठी कुख्यात असलेल्या चीनकडे याहून किततीर अधिक प्रमाणात अण्वस्त्रे असल्याचा दावा केला जातो. या पार्श्वभूमीवर, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते प्राईस यांनी, रशियाप्रमाणे चीनच्याही अण्वस्त्रांची संख्या मर्यादित करण्याचा मुद्दा उपस्थित केला. त्याचबरोबर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या विरोधकांना दिलेल्या धमकीची अमेरिकेने गंभीर दखल घेतल्याचे प्राईस म्हणाले.
अमेरिकेच्या या भूमिकेवर चीनच्या मुखपत्राची प्रतिक्रिया आली. अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांचे गट वर्षाच्या सुरुवातीपासून चीनच्या अण्वस्त्रांना लक्ष्य करीत असल्याचा आरोप चिनी मुखपत्राने केला. चीनची आण्विक क्षमता प्रभावित करण्यासाठी अमेरिका व मित्रदेशांचे प्रयत्न सुरू आहे खरी, पण यात त्यांना यश मिळणार नसल्याचा दावा या मुखपत्राने केला. चीनला आपल्या नियंत्रणात ठेवणे ही अमेरिकेची सामरिक महत्त्वाकांक्षा आहे, पण चीनची अण्वस्त्रसज्जता ही अमेरिकेच्या मर्यादेशी बांधील नाही, अशी टीका या मुखपत्राने केली. त्याचबरोबर अमेरिका व पाश्चिमात्य देशांच्या दबावासमोर झुकून चीन आपल्या अण्वस्त्रांची संख्या नियंत्रित करणार नसल्याचे चिनी मुखपत्राने बजावले आहे.
त्याचबरोबर ‘तैवानच्या मुद्यावरुन संघर्ष पेटलाच तर हीच अण्वस्त्रे अमेरिकेला रोखतील. त्यामुळे अमेरिकेने कितीही हातपाय आपटले तरी चीनने आपली अण्वस्त्रसज्जता सोडू नये’, असे चिनी मुखपत्राने कम्युनिस्ट राजवटीला सुचविले आहे. तर चीनने अमेरिकेच्या विरोधात सेकंड स्ट्राईक क्षमता विकसित करावी व यासाठी अण्वस्त्रांचा पुरेसा साठा करून ठेवावा, असेही या मुखपत्राने म्हटले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |