युक्रेनमधील अमेरिकेचे रणगाडे भस्मसात करून टाकू

- रशियाचा खणखणीत इशारा

मॉस्को/किव्ह/बर्लिन – युक्रेनला पाठविण्यात येणाऱ्या अमेरिकी रणगाड्यांबद्दल अवास्तव दावे करण्यात येत आहेत. मात्र युक्रेनमधील इतर यंत्रणांप्रमाणेच अमेरिकेचे रणगाडे देखील भस्मसात करून टाकू, असा इशारा रशियन सरकारचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी दिला. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या वादविवादांच्या पार्श्वभूमीवर अमेरिका व जर्मनी या दोन्ही देशांनी युक्रेनला रणगाडे पुरविण्याची घोषणा केली आहे. या घोषणेवर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून पाश्चिमात्य रणगाड्यांची तैनाती रशिया-युक्रेन संघर्ष वेगळ्या स्तरावर नेणारी ठरेल, असे रशियाने बजावले आहे.

गेल्या महिन्याभरात रशियाकडून युक्रेनमधील हल्ले अधिकाधिक प्रखर होत चालले आहेत. युक्रेनी नेत्यांसह लष्करी अधिकाऱ्यांकडूनही याची कबुली देण्यात आली आहे. पूर्व युक्रेनमधील बाखमत शहरासाठी रशिया व युक्रेनमध्ये रक्तरंजित संघर्ष सुरू असून युक्रेनच्या फौजांना टिकाव धरणे कठीण बनल्याचे दावे समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर रशियावर नवे प्रतिहल्ले चढवून रशियन फौजांना माघार घेण्याची योजना युक्रेनकडून आखण्यात येत आहे. त्यासाठी पाश्चिमात्य देशांकडे सातत्याने प्रगत शस्त्रे व संरक्षणयंत्रणांची मागणी करण्यात येत आहे. रशियन लष्कराला मागे रेटून युद्धाचे पारडे फिरविण्यासाठी रणगाड्यांची आवश्यकता असल्याचे युक्रेनकडून सांगितले जात आहे.

मात्र या मुद्यावर पाश्चिमात्य आघाडीत तीव्र मतभेद निर्माण झाल्याचे समोर आले होते. अमेरिकेसह युरोपिय देशांनी जर्मनीवर याप्रकरणी दडपण आणले होते. मात्र जर्मनीने अमेरिकेकडे बोट दाखवून निर्णय एका देशाकडून घेण्यात येणार नाही, अशी भूमिका घेतली होती. यावर गेल्या अनेक दिवसांपासून बैठका व चर्चा सुरू होत्या. अखेर जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांनी बुधवारी ‘लिओपार्ड2’ हे रणगाडे पुरविण्याची घोषणा केली. जर्मन सरकारकडून देण्यात आलेल्या निवेदनात, युक्रेनला 14 रणगाडे देण्याचे जाहीर करण्यात आले. याव्यतिरिक्त इतर युरोपिय देशांनाही ‘लिओपार्ड 2’ पुरविण्याची परवानगी देण्यात येईल, असे जर्मनीकडून सांगण्यात आले.

जर्मनीबरोबरच अमेरिकेनेही ‘एम1 अब्राम्स’ हे रणगाडे पुरविण्याचे जाहीर केले. अमेरिकेकडून 30 अब्राम्स रणगाडे देण्यात येतील, असे अमेरिकी सूत्रांकडून सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने ‘पॅट्रिऑट’ ही क्षेपणास्त्र यंत्रणा तसेच ‘ब्रॅडले’ रणगाडे पुरविण्याची घोषणा केली होती. क्षेपणास्त्रे व रणगाड्यांपाठोपाठ आता युक्रेनने लढाऊ विमानांची मागणीही पुढे रेटण्यास सुरुवात केली आहे. युक्रेनमधील सूत्रांनी युरोपिय देशांकडून ‘एफ-16’ या लढाऊ विमानांची मागणी केली आहे. अमेरिका व युरोपिय देशांकडून पुरविण्यात येणाऱ्या या प्रगत शस्त्रांच्या पार्श्वभूमीवर रशियातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

रशियन सरकारचे प्रवक्ते पेस्कोव्ह यांनी रणगाड्यांची राख होण्याचा इशारा दिल्यानंतर अमेरिकेतील रशियन राजदूतांनाही आक्रमक शब्दात बजावले आहे. अमेरिकेची शस्त्रास्त्रे बचावात्मक राहिलेली नसून रशियाला उघड चिथावणी देणारी व संघर्षाचा भडका अधिकच तीव्र करणारी ठरत आहेत, असे रशियन राजदूत ॲनातोली ॲन्टानोव्ह यांनी म्हटले आहे.

 मराठी    English

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info