न्यूयॉर्क – कोरोनापेक्षाही अधिक घातक व भयावह साथ येण्याची शक्यता असून जग त्यासाठी अद्यापही तयार नाही, असा इशारा अमेरिकेतील अब्जाधीश गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी आण्विक, रासायनिक, जैविक हल्ल्यांसह सायबरक्षेत्रातील हल्ल्यांपासून असलेल्या धोक्यांचाही उल्लेख केला. मात्र या हल्ल्यांपासून असणारे धोके व शक्यता यांची काही प्रमाणात तरी कल्पना आहे, पण नव्या साथीबाबत असे काहीच सांगता येणार नाही, असे बफे यांनी बजावले.
जगभरात कोरोनाच्या साथीने उडविलेला हाहाकार अद्यापही कायम असून या साथीमुळे सुमारे 40 लाख जणांचा बळी गेला आहे. कोरोनाव्हायरसचे नवनवीन ‘स्ट्रेन्स’ (प्रकार) समोर येत असून त्यामुळे साथीची तीव्रता अधिकाधिक वाढताना दिसत आहे. अनेक देशांमध्ये दुसरी व तिसरी लाट सुरू असून चौथ्या लाटेचीही भीती व्यक्त करण्यात येते. कोरोनामुळे निर्माण झालेली भयावह स्थिती कायम असतानाच जगातील विविध तज्ज्ञ, विश्लेषक, राजकीय नेते तसेच उद्योजकांकडून कोरोनापेक्षाही अधिक घातक व व्यापक परिणाम असणार्या साथींबाबत सातत्याने सावधगिरीचे इशारे दिले जात आहेत.
वॉरेन बफे यांचे वक्तव्य त्याचाच भाग आहे. ‘सीएनबीसी’ या वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमादरम्यान बफे यांनी नव्या साथीबाबत इशारा दिला. कोरोनासारख्या रोगाची साथ येणार असेल, तर त्याची माहिती मिळू शकते. ‘कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती सर्वात वाईट आहे, अस समजू नका. तर त्याच्याहून अधिक भयावह साथ येऊ शकते व त्याची पूर्वतयारी करण्यासाठी जगाकडे फारसा वेळ नाही’, असे बफे यांनी बजावले.
यावेळी बफे यांनी कोरोनाची साथ अद्याप संपलेली नसल्याचे व त्याबाबत अनिश्चितता असल्याकडेही लक्ष वेधले. कोरोनाच्या साथीमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याचेही बफे यांनी सांगितले. कोरोनाच्या काळात हजारो छोट्या उद्योगांना मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचेही बफे यांनी नमूद केले. बफे यांच्यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेचे (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) प्रमुख डॉ. टेड्रॉस घेब्रेयेसूस तसेच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही नव्या रोगाच्या साथीबाबत इशारा दिला आहे.
कोरोनाव्हायरसहून अधिक घातक व वेगाने फैलावणारा विषाणू समोर येऊ शकतो. हा विषाणू जगात नव्या साथीला निमंत्रण देणारा ठरेल’, असा गंभीर इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) प्रमुख डॉ. टेड्रॉस घेब्रेयेसूस यांनी दिला होता. तर येत्या दशकभरात जगाला नव्या रोगाच्या साथीचा फटका बसू शकतो, असे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी बजावले होते.
दरम्यान, फ्रान्समध्ये कोरोनाच्या साथीची चौथी लाट येऊ शकते, असा इशारा सरकारकडून देण्यात आला आहे. ‘गेल्या आठवड्याभरात रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. नव्या रुग्णांमध्ये डेल्टा व्हेरिअंटचे रुग्ण 30 टक्क्यांहून अधिक आहेत. या पार्श्वभूमीवर जुलै महिन्याच्या अखेरीस कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता आहे’, असे फ्रेंच सरकारचे प्रवक्ते गॅब्रिअल अटल यांनी म्हंटले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |