बीजिंग – ‘अमेरिकेच्या लष्करी सहाय्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या जपानकडे चीनचा एकट्याने सामना करण्याची हिंमत नाही. त्यामुळे तैवानच्या समस्येत लष्करी हस्तक्षेप करून जपान आपलीच कबर खणेल’, अशी धमकी चीनच्या सरकारी मुखपत्राने दिली. चीनने तैवानवर हल्ला चढविला तर अमेरिकेसह जपान देखील या संघर्षात उडी घेईल, असे चार दिवसांपूर्वी जपानचे उपपंतप्रधान तारो आसो यांनी घोषित केले होते. त्यावर चीनही ही खरी प्रतिक्रिया आल्याचे दिसत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून चीनने तैवानबाबत अतिशय आक्रमक लष्करी हालचाली सुरू केल्या आहेत. गेल्या महिन्यात चीनच्या 23 विमानांनी एकाच दिवसात तैवानच्या हवाईहद्दीत घुसखोरी केली होती. तर चीनच्या विमानवाहू युद्धनौका आणि विनाशिकांनी तैवानच्या सागरी हद्दीजवळील आपल्या हालचाली वाढविल्या आहेत. याशिवाय चीनच्या लष्कराने तैवानच्या पश्चिम किनारपट्टीसमोर आपली क्षेपणास्त्रे तैनात केल्याच्या बातम्या आल्या होत्या. चीनच्या या लष्करी हालचाली म्हणजे तैवान गिळंकृत करण्याची तयारी असल्याची चिंता व्यक्त केली जाते.
यावर जगभरातील आघाडीचे लोकशाही देश चिंता व्यक्त करीत आहेत. तैवानचा शेजारी असलेल्या जपानमधूनही यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. गेल्या काही आठवड्यांमध्ये जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा, संरक्षणमंत्री नोबुआ किशी, उपसंरक्षणमंत्री नाकायामा यांनी वारंवार तैवानचा मुद्दा उपस्थित करून लोकशाही देशांना एकजूट होण्याचे आवाहन केले. जपानचे उपपंतप्रधान तारो आसो यांनी देखील आपल्या देशाची सुरक्षा तैवानशी जोडलेली असल्याचे जाहीर केले.
‘येत्या काळात तैवानवर हल्ला झाला तर त्यामुळे जपानच्या अस्तित्वाला धोका संभवेल. कारण तैवानवरील हल्ल्यानंतर जपान पुढचे लक्ष्य ठरेल. असे झाले तर तैवानच्या संरक्षणासाठी जपान अमेरिकेसह या संघर्षात उडी घेईल’, अशी घोषणा जपानच्या उपपंतप्रधानांनी केली होती. त्यावर संतापलेल्या चीनने असो यांची विधाने चीनबरोबरच्या संबंधांसाठी मारक ठरतील व जपानने इतिहासातून धडा घ्यावा, असा सल्ला चीनने दिला होता.
पण आता ‘ग्लोबल टाईम्स’ या सरकारी मुखपत्राद्वारे चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने जपानला उघडपणे धमकावले आहे. ‘स्वत:चे संरक्षण धोरण नसलेला जपान पूर्णपणे अमेरिकेवर अवलंबून आहे. त्यामुळे जपानचे लष्कर निकामी करणे चीनच्या लष्करासाठी अधिक सोपे आहे. चीनच्या लष्करासमोर जपान शक्तीहिन आहे’, असे चिनी लष्करी विश्लेषक साँग झाँगपिंग यांनी या मुखपत्रातील आपल्या लेखात म्हटले आहे.
त्याचबरोबर तैवान ही चीनची रेडलाईन असून जपानच्या लष्कराने ती ओलांडली तर जपान चीनचे कायदेशीर लक्ष्य ठरेल, असे चीनच्या मुखपत्राने धमकावले. तैवानबरोबरच सेंकाकू बेटाप्रश्नी जपानला चीनच्या लष्करी कारवाईचा सामना करावा लागेल, असेही चीनच्या मुखपत्राने बजावले.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |