अमेरिकेची ‘लेथल वेपन्स’ युक्रेनमध्ये दाखल

‘लेथल वेपन्स’

वॉशिंग्टन/किव्ह/मॉस्को – अमेरिकेकडून युक्रेनला देण्यात येणार्‍या संरक्षणसहाय्याच्या अंतर्गत ‘लेथल वेपन्स’चा साठा शनिवारी युक्रेनमध्ये दाखल झाला. ही शस्त्रे युक्रेन-रशिया सीमेवरील युक्रेनच्या लष्करी तुकड्यांना देण्यात येतील, असे संकेत देण्यात आले आहेत. या शस्त्रसाठ्याव्यतिरिक्त पुढील काही दिवसांमध्ये युक्रेनला २० कोटी डॉलर्सचे अतिरिक्त संरक्षणसहाय्य पुरविण्यात येणार असल्याची माहिती अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी दिली आहे. अमेरिका युक्रेनला रशियन बनावटीची पाच ‘एमआय-१७’ हेलिकॉप्टर्सही देणार असल्याचे व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आले.

युक्रेन मुद्यावरून रशिया व पाश्‍चात्य देशांमधील तणाव चिघळत असतानाच पाश्‍चात्य देशांनी युक्रेनच्या संरक्षणसज्जतेसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्याअंतर्गत युक्रेनला मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे पुरविण्यात येत आहेत. अमेरिका २०१४ सालापासून युक्रेनला संरक्षणसहाय्य पुरवित असून आतापर्यंत सुमारे अडीच अब्ज डॉलर्सहून अधिक किमतीची शस्त्रास्त्रे व संरक्षणयंत्रणा पुरविल्या आहेत. याच संरक्षणसहाय्याअंतर्गत शनिवारी युक्रेनमध्ये अमेरिकेचा नवा शस्त्रसाठा दाखल झाल्याचे सांगण्यात येते. अमेरिकेपूर्वी ब्रिटननेही युक्रेनला शस्त्रपुरवठा केला असून नाटो सदस्य देशांनीही युक्रेनला शस्त्रसाठा देण्याचे जाहीर केले आहे.

‘लेथल वेपन्स’

शनिवारी दाखल झालेल्या शस्त्रसाठ्याव्यतिरिक्त अमेरिका युक्रेनला २० कोटी डॉलर्सचे अतिरिक्त संरक्षणसहाय्य पुरविणार आहे. त्यात ‘जॅव्हेलिन मिसाईल्स’, ‘स्टिंगर मिसाईल्स’ व छोट्या शस्त्रांचा समावेश असेल, असे सांगण्यात येते. त्याचवेळी युक्रेनला रशियन बनावटीची पाच ‘एमआय-१७’ हेलिकॉप्टर्सही देण्यात येणार आहेत. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या जेन साकि यांनी ही माहिती दिली. युक्रेनने गेल्या वर्षी अमेरिकेकडे त्याची मागणी केली होती.

‘लेथल वेपन्स’

दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन युक्रेनमध्ये रशियासमर्थक कळसूत्री सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोप ब्रिटनने केला आहे. युक्रेनमधील माजी संसद सदस्य येवहेन मुरायेव्ह यांना हाताशी धरून युक्रेनमधील सध्याचे सरकार उलथण्याच्या हालचाली सुरू असल्याचे ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणांना या योजनेची माहिती मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. ब्रिटनला मिळालेली माहिती रशियाकडून युक्रेनच्या विघटनासाठी सुरू असलेल्या हालचालींची व्याप्ती दाखविणारी ठरते, असे ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री लिझ ट्रुस यांनी म्हटले आहे.

ब्रिटनने केलेले दावे रशियाने स्पष्ट शब्दात फेटाळून लावले आहेत. ब्रिटनकडून प्रसिद्ध झालेली माहिती पाश्‍चात्य देश युक्रेनमध्ये कशा प्रकारे अपप्रचार करीत आहेत, याचे उदाहरण ठरते, असा ठपका रशियन प्रवक्त्यांनी ठेवला.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info